Wednesday, 3 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.08.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  03 August  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ ऑगस्ट २०२   सायंकाळी ६.१०

****

·      निवडणूक काळात मोफत वस्तू वाटप तसंच सेवांबाबत सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार तसंच निवडणूक आयोगाला मत मांडण्याची सूचना.

·      शिक्षक पात्रता परीक्षेत माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करण्यासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदत.

·      गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची चौकशी एटीएसकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश.

·      औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना विनापरवानगी मुख्यालयी येण्यास निर्बंध.

आणि

·      राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात लवप्रीतसिंगला कांस्यपदक.

****

निवडणूक काळात मोफत वाटल्या जाणाऱ्या वस्तू तसंच दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत तज्ज्ञ समिती गठीत करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार तसंच निवडणूक आयोगाकडून सूचना मागवल्या आहेत. यासाठी आठवडाभराची मुदत देण्यात आली आहे. या संदर्भातल्या एका सुनावणीदरम्यान, न्यायालयाने ज्येष्ठ विधीज्ञ कपित सिब्बल तसंच याचिकाकर्त्यांनाही सूचना आपली मतं सादर करण्यास सांगितलं आहे. निवडणूक काळात राजकीय पक्षांकडून मोफत वाटल्या जाणाऱ्या वस्तू तसंच सेवा उपलब्धतेबाबत दिल्या जाणाऱ्या आश्वासनांविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या आश्वासनांचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्यानं, त्यांच्या फायद्या तोट्यावर विचार करण्याची आवश्यकता असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं नोंदवलं आहे.

****

शिवसेना हा मूळ पक्ष आपलाच असल्याच्या ठाकरे तसंच शिंदे गटांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठासमोर ठाकरे गटाच्या बाजूने कपिल सिबल तर शिंदे गटाच्या बाजूने हरीश साळवे युक्तिवाद केला. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्यपालांची बाजू मांडली. पुढची सुनावणी उद्या होणार आहे.

****

राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी मध्ये माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करण्यासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासोबतच नावातील अक्षर किंवा जात संवर्ग याबाबतही या मुदतीत दुरुस्ती करता येणार आहे. राज्य परीक्षा आयुक्त शैलजा दराडे यांनी ही माहिती दिली.

शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या ३० जून २०२२ च्या निर्णयानुसार राज्यातील माजी सैनिक, हुतात्मा सैनिक पत्नी तसंच कुटुंबीयांना शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ मध्ये १५ टक्के गुणांची सवलत देण्यात आली आहे. प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार करून परीक्षेचा निकाल लवकरच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असंही परीक्षा परिषदेनं स्पष्ट केलं आहे.

****

मुंबई महानगरपालिका तसंच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त ७५ करण्यासाठी जिल्हा परिषद अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०४ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत या मोहिमेत २०४ कोटी ८४ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.

****

देशातंर्गत डिजिटल व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. २०२१-२२ दरम्यान, आठ हजार ८०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे व्यवहार डिजिटल माध्यमातून झाल्याचं चंद्रशेखर यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षात २४ जुलैपर्यंत तीन हजार तीनशे कोटी रुपयांचे व्यवहार डिजिटल माध्यमातून झाल्याची माहिती चंद्रशेखर यांनी दिली.

****

संसदेत आज राज्यसभेत डोपिंगरोधी विधेयकावर चर्चा सुरू आहे. खेळाडू तसंच अन्य व्यक्तींकडून मादक पदार्थांचा दुरुपयोग रोखण्याची तरतूद या विधेयकात आहे.

लोकसभेत आज केंद्रीय विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर झालं. दरम्यान, केंद्रीय यंत्रणांकडून होत असलेल्या छापेमारीविरोधात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आज अनेक वेळा बाधित झालं.

****

काळा पैसा वैध केल्या प्रकरणी महाराष्ट्रातले दोन बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि संजय छाबडिया यांची सुमारे ४१५ कोटी रुपयांची संपत्ती सक्तवसुली संचालनालय - ईडीनं जप्त केली. येस बँक - एचडीएफएल बँक कर्ज गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत एक हजार ८२७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली असून, हे दोन्ही बांधकाम व्यावसायिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

****

कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडे सोपवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. पानसरे कुटुंबीयांच्या विनंतीवरून न्यायालयाने हे निर्देश दिले. पानसरे यांच्या हत्येच्या कारस्थानामागच्या सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत नसल्यामुळे, हा तपास अन्य यंत्रणेकडे सोपवावा, अशी मागणी पानसरे कुटुंबियांनी केली होती. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी पानसरे यांची हत्या झाली होती, महाराष्ट्र पोलीस विभागाची विशेष तपास समिती या प्रकरणाची तपासणी करत होती.

****

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना विनापरवानगी जिल्हा किंवा तालुका मुख्यालयात येण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी जिल्ह्यातल्या सर्व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत एक पत्र जारी केलं आहे. जिल्हा मुख्यालयातील दैनंदिन कामकाजासाठी एका कर्मचाऱ्याची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करावी. याव्यतिरिक्त काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या किंवा तालुक्याच्या मुख्यालयात यायचं असेल, तर त्यांनी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांची पूर्वपरवानगी घ्यावी आणि मुख्यालयात आल्यानंतर पूर्वपरवानगीचे पत्र दर्शवून अभिप्राय पुस्तिकेत तशी नोंद करावी, असं या पत्रात नमूद आहे. याव्यतिरिक्त इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जिल्हा परिषदेच्या किंवा तालुक्याच्या मुख्यालयात आढळून आल्यास त्या शाळेच्या मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांना जबाबदार धरण्यात येईल याची गांभीर्यानं नोंद घेण्याचे शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

दरम्यान, राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे यांनी याबाबत बोलताना, शिक्षकांना मुख्यालयी हेलपाटे का मारावे लागतात याचं, प्रशासनानं आत्मचिंतन करावं, असं म्हटलं आहे.

****

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार घरोघरी तिरंगा हा उपक्रम राज्यात उत्साहानं राबवला जात आहे. अहमदनगर जिल्ह्यात ८ लाख ९९ हजारांहून अधिक घरांवर तिरंगा फडकणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी सांगितलं.

****

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात १०९ किलो वजनी गटात लवप्रीतसिंग याने कांस्यपदक पटकावलं. स्नॅच प्रकारात १६३ किलो तर क्लिन ॲण्ड जर्क प्रकारात १८५ किलो असं एकूण ३५५ किलो वजन उचलून लवप्रीतने कांस्यपदक मिळवलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे.

****

औरंगाबाद इथल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. धरणाचे सहा दरवाजे आज सकाळी दहा वाजता बंद करण्यात आले. सध्या धरणाच्या दोन दारातून गोदावरी नदीपात्रात एक हजार ४८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं तर जलविद्यूत केंद्रातून एक हजार ५८९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणाचा पाणीसाठा सध्या ९० टक्के असल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे.

****

No comments:

Post a Comment