Thursday, 4 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.08.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 August 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यातल्या सत्ता संघर्षावर र्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगानं कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश आज न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिला आहे. हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या पीठाकडे सोपवण्यासंदर्भात न्यायालय येत्या सोमवारपर्यंत निर्णय घेईल, असंही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं.

आजच्या सुनावणी दरम्यान शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी, १० व्या सूचीचा मुद्दा उपस्थित केला. पक्षांतरबंदी कायदा हा असंतोष विरोधी कायदा असू शकत नाही, असा युक्तिवाद साळवे यांनी केला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी, हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची गरज नाही, असं मत व्यक्त केलं.

****

नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राच्या कार्यालयावर सक्तवसुली संचालनालय - ईडीनं छापा टाकल्याच्या मुद्यावरुन काँग्रेस पक्ष सदस्यांनी आजही लोकसभेत गदारोळ केला. त्यामुळे सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

राज्यसभेत कामकाज सुरु होताच विरोधी पक्षांनी तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी, सरकार विरोधकांना दाबण्यासाठी जाणुनबुजून तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप केला. यावरुन गदारोळ झाल्यानं राज्यसभेचं कामकाज १२ वजोपर्यंत स्थगित झालं होतं.

****

सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यांनी केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे ही शिफारस केली आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमणा या महिन्यात निवृत्त होत आहेत.

****

देशभरातली संरक्षित ऐतिहासिक वारसा स्थळं उद्यापासून १५ तारखेपर्यंत विनाशुल्क पाहता येणार आहेत. केंद्रीय पर्यटन मंत्री जी.कृष्णन रेड्डी यांनी आपल्या ट्विटर संदेशात ही माहिती दिली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवच्या निमित्तानं वारसा स्थळं पाहण्यासाठी पर्यटकांना प्रवेश शुल्क माफ करण्यात आलं आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३८ लाख २० हजार ६७६ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०५ कोटी २२ लाख ५१ हजार ४०८ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या १हजार ८९३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ५३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर २० हजार ४१९ रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख ३हजार ४७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

देशातल्या विद्यापीठांमधली संशोधन क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं काल विद्यापीठ संशोधन सर्वोत्कृष्टता योजनेचा आरंभ केला आहे. सरकारी तसंच खाजगी विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये सुनियोजित पद्धतीने उत्कृष्ट संशोधन आणि विकास यंत्रणा उभारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या नव्या योजनेमुळे विद्यापीठांना संशोधनाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यात मदत मिळेल तसंच युवा प्राध्यापक वर्गाला अत्याधुनिक संशोधनात सहभागी होता येईल असं विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. स्रीवरी चंद्रशेखर यांनी सांगितलं. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनीही या योजनेबद्दल समाधान व्यक्त केलं असून संशोधन प्रकल्पांचं लेखन, सादरीकरण, आर्थिक सहाय्य आणि व्यवस्थापन यांचं प्रशिक्षण प्राध्यापकांना दिलं जावं अशी अपेक्षा व्यक्त केली.

****

वाहनांची वाहतूक सुरळीतपणे होण्याची खात्री म्हणून पथकर नाक्यांवर नवं तंत्रज्ञान लागू करण्यावर केंद्र सरकार विचार करत आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नीतीन गडकरी यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली. ही नवी यंत्रणा पुढील सहा महिन्यांमध्ये कार्यान्वित करण्यात येईल, यासाठी दोन पर्यायांवर विचार सुरु असल्याचं गडकरी म्हणाले. उपग्रहावर आधारित पथकर यंत्रणेमध्ये जीपीएस यंत्रणेद्वारे पथकर आकारून ते वाहनधारकाच्या बँक खात्यातून थेट वजा केला जाईल, दुसरा पर्याय वाहनांच्या क्रमांकाद्वारे पथकर आकारण्याचा आहे. पथकर वसुलीसाठी उपग्रहावर आधारित यंत्रणा वापरताना फास्टॅग ऐवजी जीपीएस यंत्रणा लागू करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

****

बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन मध्ये भारताच्या गुरदीप सिंह यांनी कांस्य पदक पटकावलं. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी गुरदीपचं अभिनंदन केलं आहे.

****

हवामान -

कोकणात सर्वत्र पुढील चार दिवसात मुसळधार पाउस पडेल तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. राज्यभर बहुतांश भागात पुन्हा जोरदार पाऊस पडेल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. नांदेड शहरात आज पहाटे मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

//**********//

 

No comments:

Post a Comment