Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 August
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०४ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
·
राज्यातील शिवसेनेच्या ठाकरे
तसंच शिंदे
गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर
सर्वोच्च न्यायालयात आजही सुनावणी
सुरु राहणार
·
निवडणूक काळात मोफत वाटल्या
जाणाऱ्या वस्तू तसंच दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत तज्ज्ञ समिती गठीत करण्यासंदर्भात,
केंद्र सरकार आणि निवडणूक
आयोगाला सूचना करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
· राज्यातील महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, लोकसंख्येनुसार सदस्य संख्या निश्चित
· जिल्हा परिषद सदस्यांच्याही किमान आणि कमाल संख्येवर मर्यादा
·
ऊसाला तीन हजार ५० रुपये प्रति टन दर देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
·
राज्यात कोविड संसर्गाचे नवे १ हजार ९३२ रुग्ण मराठवाड्यात १०३ बाधित
आणि
·
राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवशी
भारताला एक रौप्य आणि तीन कांस्य पदक
****
राज्यातील शिवसेनेच्या ठाकरे
तसंच शिंदे
गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर
सर्वोच्च न्यायालयात आजही सुनावणी
सुरु राहणार आहे. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत
सरन्यायाधीश एन व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती
हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठासमोर, ठाकरे गटाच्या बाजूने कपिल
सिब्बल, तर शिंदे गटाच्या बाजूने हरीश साळवे यांनी युक्तिवाद
केला. महाधिवक्ता तुषार मेहता यांनी राज्यपालांची बाजू मांडली.
शिंदे सरकारच्या वैधतेला, विधानसभा अध्यक्षांच्या वैधतेला आव्हान
देणाऱ्या याचिका आणि शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत विधानसभा
उपाध्यक्षांनी दिलेल्या नोटिशींना आव्हान देणाऱ्या याचिकांवर काल एकत्रित सुनावणी पार पडली. याप्रकरणी न्यायालयात सादर केलेलं
प्रतिज्ञापत्र अधिक स्पष्टता येण्यासाठी उद्यापर्यंत पुन्हा नव्यानं सादर करण्याचे
आदेश, खंडपीठानं एकनाथ शिंदे गटाचे वकील हरीष साळवे यांना
दिले आहे. शिंदे गट पक्षात असल्याचा दावा करत असला तरी त्यांची वागणूक पक्ष
सोडल्यासारखीच आहे, असा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकील कपिल
सिब्बल यांनी केला. मात्र ही पक्षात फूट नसून, पक्ष
नेतृत्वासंदर्भातला वाद आहे, हे पक्षाचं अंतर्गत प्रकरण
असल्यानं पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदी याला लावता येणार नाहीत, असा दावा शिंदे गटाचे वकील साळवे यांनी केला. शिंदे गट निवडणूक आयोगाकडे
का गेला असा सवाल न्यायालयानं विचारला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा
राजीनामा दिल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ
आली आहे. ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर
नव्या सरकारचा शपथविधी झाल्याचा दावा, शिंदे गटाकडून वकील
महेश जेठमलानी यांनी केला. पक्षातल्या बहुतांश सदस्यांचा आवाज दाबण्यासाठी
संविधानाच्या १० व्या सूचीचा दुरुपयोग करता येऊ शकतो का, यावर
न्यायालयानं विचार करावा अशी विनंती राज्यपालांकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता
यांनी केली.
****
निवडणूक काळात मोफत वाटल्या जाणाऱ्या
वस्तू तसंच दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत तज्ज्ञ समिती गठीत करण्यासंदर्भात, सर्वोच्च
न्यायालयानं केंद्र सरकार तसंच निवडणूक आयोगाकडून सूचना मागवल्या आहेत. यासाठी आठवडाभराची
मुदत देण्यात आली आहे. या संदर्भातल्या एका सुनावणीदरम्यान न्यायालयानं, ज्येष्ठ विधीज्ञ
कपिल सिब्बल तसंच याचिकाकर्त्यांनाही आपली मतं सादर करण्यास सांगितलं आहे. निवडणूक
काळात राजकीय पक्षांकडून मोफत वाटल्या जाणाऱ्या वस्तू तसंच सेवा उपलब्धतेबाबत दिल्या
जाणाऱ्या आश्वासनांविरोधात, ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या आश्वासनांचा अर्थव्यवस्थेवर
मोठा परिणाम होत असल्यानं, त्यांच्या फायद्या तोट्यावर विचार करण्याची आवश्यकता असल्याचं
निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं नोंदवलं
आहे.
****
मुंबई महानगरपालिका तसंच अन्य
महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या
बैठकीत घेण्यात आला. तीन लाख ते सहा लाख लोकसंख्येसाठी, किमान सदस्य संख्या ६५ तर कमाल
संख्या ८५ असेल. सहा लाख ते १२ लाखांसाठी सदस्य संख्येची मर्यादा, किमान ८५ तर कमाल
११५ असेल. १२ लाख ते २४ लाखांसाठी, किमान ११५ तर कमाल १५१ सदस्य, २४ लाख ते ३० लाखांसाठी,
किमान १५१ तर कमाल १६१ सदस्य, तर ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिकेत,
किमान सदस्य १६१ तर कमाल सदस्य संख्येची मर्यादा १७५ इतकी असेल.
जिल्हा परिषद सदस्यांची संख्या
कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त ७५ करण्यासाठी, जिल्हा परिषद अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा
करण्याचा निर्णयही, कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ
अधिनियम २०१६ मध्ये सुधारणा करण्यास देखील या बैठकीत मान्यत देण्यात आली. यामुळे नवीन
महाविद्यालयं तसंच परिसंस्था सुरु करणं, नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा अतिरिक्त
तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्रं सुरु करण्यासाठी, १७ ऑगस्ट २०२२ पूर्वी इरादापत्र देता
येईल.
व्यापाऱ्यांना वस्तू आणि सेवा
कर विवरण पत्रं भरताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी, महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर
अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
आगामी गळीत
हंगामाकरता केंद्र सरकारनं ऊसाला तीन हजार ५० रुपये प्रति
टन रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपी
देण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षीच्या तुलनेत या दरात प्रतिटन १५० रुपये वाढ केली
आहे. ही दरवाढ सध्याच्या
दराच्या दोन पूर्णांक सहा टक्के जास्त आहे. केंद्र
सरकारच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याला मान्यता दिली. सव्वा १० टक्के
रिकव्हरी साठी ही किंमत निश्चित करण्यात आली आहे. रिकव्हरी
वाढली तर त्यात वाढ होईल, आणि रिकव्हरी कमी झाली तर त्यात घट
होईल, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या निर्णयाचा लाभ पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होईल, शिवाय साखर उद्योगात
कार्यरत पाच लाख कर्मचाऱ्यांना देखील होणार आहे.
****
नॅशनल हेरॉल्डशी संबंधीत आर्थिक
गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय-ईडीनं, यंग इंडियन लिमिटेडच्या कार्यालयाला
काल टाळं ठोकलं. यंग इंडियन कंपनीने नॅशनल हेरॉल्ड संचालित करणाऱ्या असोसिएट जर्नल्स
लिमीटेडचं अधिग्रहण केलं आहे. ईडीने मंगळवारी नॅशनल हेराल्ड कार्यालयासह देशभरात १२
ठिकाणी छापे टाकले होते. यंग इंडियनने असोसिएट जर्नल्सच्या ८०० कोटींहून अधिक संपत्तीमध्ये
फेरफार केला, असा ईडीचा दावा आहे.
****
काळा पैसा वैध केल्या प्रकरणी
महाराष्ट्रातले दोन बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि संजय छाबडिया यांची सुमारे
४१५ कोटी रुपयांची संपत्ती सक्तवसुली संचालनालय - ईडीने जप्त केली. येस बँक- एचडीएफएल
बँक कर्ज गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत
एक हजार ८२७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली असून, हे दोन्ही बांधकाम व्यावसायिक
सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
****
राज्यात काल
कोविड संसर्ग झालेले नवे १ हजार ९३२ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ५२ हजार १०३ झाली आहे. काल या संसर्गानं सात रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या
रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार ११७ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश
टक्के आहे. काल दोन हजार १८७ रुग्ण बरे झाले. राज्यात
आतापर्यंत, ७८ लाख ९१ हजार ६६५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा
दर ९८ पूर्णांक शून्य एक शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १२ हजार ३२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल १०३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ३३, लातूर २४, बीड २१, औरंगाबाद १३, नांदेड आठ, तर
जालना जिल्ह्यातल्या चार रुग्णांचा समावेश आहे.
****
राज्यातली
शिक्षक पात्रता परीक्षा - टीईटी मध्ये माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करण्यासाठी
१० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासोबतच नावातील अक्षर किंवा जात संवर्ग
याबाबतही या मुदतीत दुरुस्ती करता येणार आहे. राज्य परीक्षा आयुक्त शैलजा दराडे
यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, शिक्षक
पात्रता परिक्षा २०१९-२० मध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी बनावट प्रमाणपत्रे
तयार करुन नोकऱ्या मिळवणाऱ्या २९३
शिक्षकांना बडतर्फ करण्यात आलं, तर सात हजार ८८० उमेदवारांना
टीईटीसाठी कायमस्वरुपी अपात्र ठरवण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य परिक्षा
परिषदेनं काल हा निर्णय घेतला.
****
शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते
उदय सामंत यांच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला प्रकरणातल्या पाच आरोपींना, न्यायालयानं
सहा ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सामंत हे मुख्यमंत्र्यांसोबत पुणे दौऱ्यावर
असताना, कात्रज भागात त्यांच्या वाहनावर हल्ला झाला होता. या आरोपीमध्ये शिवसेना शहरप्रमुखाचा
सामावेश आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी कालही काही जणांना अटक केल्याचं वृत्त
आहे.
****
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत
महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाच्यावतीनं हर घर तिरंगा झेंडा जनजागृती मोहिम १३
१५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राबवण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी
या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी विजयकुमार ढगे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केलं आहे.
****
राष्ट्रकूल
क्रीडा स्पर्धेत काल सहाव्या दिवशी भारतानं एक रौप्य,
तर तीन कांस्य पदकांची कमाई केली.
ज्युदोमध्ये
तुलिका मान हिनं ७८ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावलं. काल झालेल्या अंतिम फेरीत तुलिकाला
स्कॉटलंडच्या खेळाडुकडून पराभव पत्करावा लागला.
स्क्वॅश मध्ये भारताच्या सौरभ
घोषालनं कांस्य पदक जिंकलं. त्याने इंग्लडच्या जेम्स विलस्ट्रॉपचा ११-६, ११-१, ११-४
असा पराभव केला.
भारोत्तोलनात
१०९ किलो वजनी गटात लवप्रीत सिंग यानं कांस्य पदक पटकावलं. स्नॅच प्रकारात १६३ किलो
तर क्लिन ॲण्ड जर्क प्रकारात १८५ किलो असं एकूण ३५५ किलो वजन उचलून त्यानं नवा
राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.
ॲथलेटिक्समध्ये उंच उडी प्रकारात
तेजस्विन शंकरनं देखील कांस्य पदक जिंकलं.
भारतीय महिला
हॉकी संघानं कॅनडाला ३-२ असं नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष हॉकी
संघानंही कॅनडाला ८-० असं पराभूत केलं. मुष्टीयोद्धे निखत झरीन,
नितू सिंग आणि हुसम उद्दिन मोहम्मद उपांत्य फेरीत गेले आहेत.
या स्पर्धेत भारत पाच सुवर्ण,
सहा रौप्य आणि सात कांस्य पदकांसह एकूण १८ पदक जिंकून पदक तालिकेत सहाव्या स्थानावर
आहे.
****
देशभरातली संरक्षित
ऐतिहासिक वारसा स्थळं उद्यापासून १५
तारखेपर्यंत विनाशुल्क पाहता येणार आहेत. केंद्रीय पर्यटन मंत्री जी.कृष्णन रेड्डी
यांनी आपल्या ट्विटर संदेशात ही माहिती दिली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवच्या
निमित्तानं वारसा स्थळं पाहण्यासाठी पर्यटकांना प्रवेश शुल्क माफ करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment