Thursday, 4 August 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.08.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०४ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी हो आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांच्यासह कृष्णा मुरारी आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी न्यायालयात सादर केलेलं प्रतिज्ञापत्र अधिक स्पष्टता येण्यासाठी उद्यापर्यंत पुन्हा नव्यानं सादर करण्याचे आदेश, खंडपीठानं एकनाथ शिंदे गटाचे वकील हरीष साळवे यांना दिले.

****

डोपिंगरोधी विधेयक संसदेत मंजूर झालं. काल राज्यसभेत हे विधेयक कोणत्याही विरोधाविना संमत झालं, लोकसभेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे. खेळाडू तसंच अन्य व्यक्तींकडून मादक पदार्थांचा दुरुपयोग रोखण्याची तरतूद या विधेयकात आहे. केंद्रीय विद्यापीठे सुधारणा विधेयक २०२२ काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं. २००९ चा केंद्रीय विद्यापीठे कायदा सुधारून आता विविध राज्यात केंद्रीय विद्यापीठे स्थापण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे.

****

चालू साखर हंगामात ९९ लाख ३० हजार मेट्रिक टन साखर निर्यात करण्यात आल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली. साखरेची उपलब्धता, विक्री आणि निर्यात यावर सरकार लक्ष ठेऊन आहे, असंही त्या म्हणाल्या.

****

देशातल्या विद्यापीठांमधली संशोधन क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं काल विद्यापीठ संशोधन सर्वोत्कृष्टता योजनेचा आरंभ केला. सरकारी तसंच खाजगी विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये सुनियोजित पद्धतीने उत्कृष्ट संशोधन आणि विकास यंत्रणा उभारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

****

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाच्यावतीनं हर घर तिरंगा झेंडा जनजागृती मोहिम १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केलं आहे.

****

मराठवाड्यात काल १०३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या १३ रुग्णांचा समावेश आहे.

//**********//

No comments:

Post a Comment