Friday, 5 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.08.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 August 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात अर्धा टक्क्याने वाढ केली असून, रेपो दर पाच पूर्णांक चार टक्के इतका झाला आहे. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पत धोरण आढाव्यात रेपो दरात वाढ केल्याचं जाहीर केलं. २०२२-२३ या वित्तीय वर्षात महागाई दर सहा पूर्णाक २३ शतांश टक्के तर आर्थिक विकास वाढीचा दर सात पूर्णांक दोन दशांश टक्के राहण्याचा अंदाज दास यांनी वर्तवला आहे.

****

लोकसभेत आज कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी विविध मुद्यांवरुन केलेल्या गदारोळामुळे कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं. राज्यसभेतही तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करुन विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे कामकाज काही वेळासाठी स्थगित झालं होतं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर सभापतींनी मंजुरी दिलेल्या मुद्द्यांवर चर्चा सुरू करण्यात आली.

****

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. संसद भवनात सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत जगदीप धनखड हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे, तर मार्गारेट अल्वा या विरोधी पक्षांच्या उमेदवार आहेत. मतदानानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे.

****

महागाईच्या विरोधात काँग्रेसच्या वतीनं आज देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. नवी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात संसद ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्यात येत असताना, पोलिसांनी आंदोलनकतर्त्यांना ताब्यात घेतलं. तत्पूर्वी वार्ताहरांशी बोलताना राहुल गांधी यांनी, देशात हुकुमशाही सुरु झाली असून, लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप केला.

महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीनं मुबंईत महागाई विरोधात राजभवन परिसरात आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, यांच्यासह काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

****

राज्यात १५ जिल्ह्यांतल्या २३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे. या ग्रामपंचायतींमध्ये काल सरासरी ७८ टक्के मतदान झालं.

****

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारताचा गौरव असणारा तिरंगा ध्वज अंतराळात फडकवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्त्रो येत्या रविवारी सात ऑगस्टला एक व्यावसायिक प्रक्षेपण यान अंतराळात सोडणार आहे. श्रीहरी कोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी नऊ वाजून १८ मिनिटांनी हे प्रक्षेपण केलं जाणार आहे. या लघुग्रह प्रक्षेपणाबरोबरच देशातल्या ७५ ग्रामीण विद्यालयातल्या ७५० विद्यर्थिनींनी तयार केलेल्या, आजादी सॅट हा छोटा उपग्रह देखील अंतराळात सोडला जाणार आहे.

****

नांदेड इथं गुरुद्वारा सचखंड दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीबरोबर नांदेडकरांना अत्यावश्यक असलेली विमान सेवा सप्टेंबर अखेर सुरू होईल, यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती, गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासकीय अध्यक्ष तथा माजी पोलीस महासंचालक डॉ. परविंदरसिंघ पसरीचा यांनी दिली. ते काल नांदेड इथं बोलत होते. गुरुद्वारा बोर्डाच्या कामकाजात सुसूत्रता आणून गुरुद्वाराच्या माध्यमातून परिसर आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

खरीप हंगामातल्या पेरणी झालेल्या पिकांचा ई-पीक पाहणी कार्यक्रम एक ऑगस्टपासून सुरू झाला असून, चालू खरीप हंगामातल्या पिकांची नोंद शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणीमध्ये करण्याचं आवाहन, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केलं आहे. ई-पीक पहाणीमध्ये नोंदीसाठी ई पीक पहाणी `मोबाईल ॲप व्हर्जन-2` या ॲपची निर्मिती करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

दक्षिण मध्य रेल्वे नांदेड ते  हुबळी, आणि नांदेड ते तिरुपती दरम्यान दोन विशेष साप्ताहिक रेल्वे सोडणार आहे. नांदेड -हुबळी ही विशेष रेल्वे उद्यापासून प्रत्येक शनिवारी दुपारी दोन वाजून १० मिनिटांनी नांदेडहून सुटेल, तर हुबळी इथं दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता पोहचेल. नांदेड - तिरुपती विशेष साप्ताहिक रेल्वे उद्यापासून दर शनिवारी दुपारी बारा वाजता नांदेडहून सुटेल, आणि तिरुपती इथं दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी तिरुपती इथून रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी सुटेल.

****

बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकूल क्रिडा स्पर्धेत कुस्तीमध्ये आज बजरंग पुनिया, दीपक पुनिया, मोहित ग्रेवाल, साक्षी मलिक, अंशु मलिक आणि दिव्या काकरन आपापले सामने खेळणार आहेत.

ॲथलेटिक्समध्ये महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत हिमा दास उपान्त्य फेरीत सहभागी होणार आहे. तर महिला हॉकीमध्ये उपान्त्य फेरीत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे.

//**********//

 

No comments:

Post a Comment