Friday, 5 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.08.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  05 August 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ ऑगस्ट २०२   सायंकाळी ६.१०

****

·      खासदारांना संसद सत्रादरम्यानही ईडीचं समन्स टाळता येणार नाही-उपराष्ट्रपतींची स्पष्टोक्ती.

·      उपराष्ट्रपतिपदासाठी उद्या संसद भवनात मतदान; सायंकाळी मतमोजणी.

·      खाद्य तेलाच्या कमाल किरकोळ किंमतीत १५ रुपये प्रति लीटर कपातीचे खाद्यतेल संघटनांना निर्देश.

आणि

·      महागाई तसंच बेरोजगारीसह विविध मुद्यांवर काँग्रेसची निदर्शनं.

****

संसद सत्रादरम्यान किंवा इतरही सामान्य दिवसांत सक्तवसुली संचालनालयाचं समन्स खासदारांना टाळता येणार नाही, असं उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना काल ईडीने चौकशीसाठी बोलावल्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्यसभेचं कामकाज सकाळच्या सत्रात स्थगित होऊन पुन्हा सुरू झाल्यावर नायडू यांनी ही बाब स्पष्ट केली. सर्वोच्च न्यायालय आणि राज्यसभेच्या विविध निर्णयांचा दाखला देत, आपराधिक प्रकरणांच्या चौकशीसाठी खासदार आणि सामान्य नागरिक यांच्यात भेदभाव करता येत नसल्याचं नमूद केलं. खासदार असल्याचं कारण देत, अशी चौकशी टाळता येणार नसल्याचं नायडू यांनी सांगितलं.

****

उपराष्ट्रपती पदासाठी उद्या संसद भवनात सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनकर आणि विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात उपराष्ट्रपती पदासाठी थेट लढत होणार आहे.

संसदेच्या दोन्ही सदनातल्या सदस्यांच्या मतदानातून उपराष्ट्रपतींची निवड केली जाते. संसदेच्या सदस्यांची एकूण संख्या ७८८ असून या पैकी ५४३ लोकसभा सदस्य, २३३ राजसभा सदस्य आणि १२ राष्ट्रपती नियुक्त सदस्य आहेत. उद्या मतदानाची वेळ संपताच संसदेतच मतमोजणी होईल. सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ येत्या बुधवारी १० तारखेला पूर्ण होत आहे.

****

ऊर्जा संरक्षण संशोधन विधेयक आज लोकसभेत सादर झालं. या विधेयकावरच्या चर्चेत बोलताना ऊर्जामंत्री आर के सिंह यांनी, २०३० चं निर्धारित ऊर्जा उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आयात कमी करण्याची गरज व्यक्त केली. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी धोरणात बदल केले जात असल्याची माहिती सिंह यांनी दिली. देशाच्या ग्रामीण भागात सध्या दिवसातून सुमारे वीस तास वीज पुरवठा केला जात असल्याचं सिंह यांनी सांगितलं.

****

खाद्य तेलाच्या कमाल किरकोळ किंमतीत १५ रुपये प्रति लीटर कपात केली जावी असे निर्देश सर्व खाद्यतेल संघटनांना देण्यात आल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. खाद्यतेल उत्पादक आणि रिफायनर्सने वितरकांना दिलेली किंमत देखील ताबडतोब कमी करण्याचेही निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. खाद्य तेल संघटनांसोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं हे निर्देश दिले. आयात केलेल्या खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या किमती घसरत चालल्या आहेत, हे खाद्यतेलाच्या परिस्थितीत अतिशय सकारात्मक चित्र आहे आणि म्हणूनच, देशांतर्गत खाद्यतेल उद्योगाला देशांतर्गत बाजारातील किंमती निश्चित करणं आवश्यक आहे, अशी चर्चा या बैठकीत झाल्याचं मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे.

****

केंद्र सरकार पोषण-आधारित अनुदान धोरणानुसार अनुदान देऊन सिंगल सुपर फॉस्फेट खत आणि संयुक्त खतांसोबत फाँस्फेट आणि पोटॅश खतांच्या वापरला प्रोत्साहन देत आहे. रसायन आणि खत मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत ही खतं मिळावीत यासाठी २०१९ पासून या खतांच्या अनुदानात वाढ करण्यात आली असल्याचं ते म्हणाले.

****

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत, खबरादारीची मात्रा घेतलेल्यांची संख्या १० कोटींच्या वर गेली आहे. आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २०५ कोटी ७९ लाखांच्या वर गेली आहे.

राज्यात आज सकाळपासून १ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ३९ लाखांच्या वर गेली आहे.

****

वाढती महागाई, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंवरील जी.एस.टी आदी विषयावरून काँग्रेस पक्षानं आज ठिकठिकाणी निदर्शनं केली. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ कल्याण काळे आणि शहराध्यक्ष शेख युसूफ लीडर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी यांनी या आंदोलनात सहभागी होत जोरदार घोषणाबाजी केली.

****

हिंगोली इथं काँग्रेसच्या आमदार डॉ.प्रज्ञा सातव यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात आलं. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडीमध्ये दुचाकी वाहनं उभी करून बैलगाडी हाताने ओढण्यात आली तसंच गॅस सिलेंडर डोक्यावर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात या आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

****

औरंगाबाद जिल्ह्यातील सहा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी काल मतदान झालं. या मतदानाची आज मतमोजणी झाली. पैठण तालुक्यातील सात पैकी सहा ग्रामपंचायतीत शिंदे गटाच्या संदिपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

                                    ****

आझादी का अमृत महोत्सवातंर्गत ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमातंर्गत राष्ट्रध्वजाप्रती आदर बाळगत असतांनाच प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या कामामध्ये गुणात्मक वाढ करणे ही देशाप्रती खरी आदरांजली ठरणार असल्याचं मत औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्हा परिषदेत आज ग्रामपंचायतींना ध्वज वितरण, ध्वज कक्षाचं उद्धाटन करून, हर घर तिरंगा उपक्रमाविषयी आणि ध्वजसंहिते विषयी प्रचार प्रसार करणाऱ्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. लसीकरणाचा अमृत महोत्सव, ई-पीक पाहणी, जनावरांची आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम, कर्मचाऱ्यांनी आपली रोजची कामं वेळेत करणे आदी माध्यमाद्वारे राष्ट्र प्रगल्भ करणं, म्हणजे आझादी का अमृत महोत्सव साजरा करणं असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यावेळी म्हणाले.

****

सोलापूर जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत ‘हर घर झेंडा’ उपक्रमाच्या तिरंगा झेंडा विक्री आणि वितरणाचा शुभारंभ आज दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, हर घर तिरंगा उपक्रमाच्या नोडल अधिकारी चारुशीला देशमुख यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

****

सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या परीक्षेच्या कामकाजात हलगर्जीपणा तसंच चुका करणाऱ्या प्राध्यापकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी ही माहिती दिली. दोषी आढळलेल्या प्राध्यापकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून परीक्षेच्या कामकाजातून त्यांना काढून टाकण्यात आल्याचं, कुलगुरू फडणवीस यांनी सांगितलं.

****

बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये आज बजरंग पुनिया, दीपक पुनिया, मोहित ग्रेवाल, साक्षी मलिक, अंशु मलिक आणि दिव्या काकरन आपापले सामने खेळत आहेत.

ॲथलेटिक्समध्ये महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत हिमा दास उपान्त्य फेरीत सहभागी होणार आहे. तर महिला हॉकीमध्ये उपान्त्य फेरीत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे.

****

धुळे मार्गे इंदौरहून गोव्याकडे जाणाऱ्या एका खासगी टॅ्व्हल्स बसमधून गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला धुळे पोलिसांनी रंगेहाथ पकडत त्याच्याकडून ४ किलो ८५५ ग्रॅम ओला गांजा जप्त करण्यात आला. याबाबत आज धुळे पोलिसांनी ही माहिती दिली. यावेळी धुळे पोलिसांच्या पथकानं नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत मुंबई-आग्रा महामार्गावर नगाव गावाजवळ ही कारवाई केली.

****

No comments:

Post a Comment