Saturday, 6 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 06.08.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  06 August  2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०६ ऑगस्ट २०२२    दुपारी १.०० वा.

****

उपराष्ट्रपती पदासाठी आज संसद भवनात मतदानाला सुरुवात झाली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार असून, त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड आणि विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात उपराष्ट्रपती पदासाठी थेट लढत हो आहे. संसदेच्या दोन्ही सदनातल्या सदस्यांच्या मतदानातून उपराष्ट्रपतींची निवड केली जाते. संसदेच्या सदस्यांची एकूण संख्या ७८८ असून या पैकी ५४३ लोकसभा सदस्य, २३३ राजसभा सदस्य आणि १२ राष्ट्रपती नियुक्त सदस्य आहेत. सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ येत्या बुधवारी १० तारखेला पूर्ण होत आहे.

****

आझादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उद्या निती आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होणार आहे. पीक वैविध्यीकरण, तेलबिया तसंच कडधान्यं याबाबतीत स्वयंपूर्णता साध्य करून कृषी-समुदायालाही स्वावलंबी करणं, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि नागरी शासन व्यवस्थेची अंमलबजावणी इत्यादी मुद्द्यांचा बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेत समावेश आहे.

कोविड-19 महामारी, पुढील वर्षी भारताकडे असलेली G-20 समुहाच्या अध्यक्षपदाची तसंच या गटाच्या शिखर परिषदेच्या आयोजनाची जबाबदारी या पार्श्वभूमीवर देश अमृत काळात प्रवेश करत असल्यानं ही बैठक अत्यंत महत्त्वाची असेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०५ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३२ लाख ७३ हजार ५५१ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०५ कोटी ९२ लाख २० हजार ७९४ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या १९ हजार ४०६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ४९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १९ हजार ९२८ रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख ३हजार ७९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज सक्तवसुली संचालनालयासमोर चौकशी सुरु आहे. ईडीनं त्यांना आज हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावलं होतं.

****

कोरोना काळात शाळा बंद असताना दोन वर्षे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ लिमिटेड - एमकेसीएलनं टिलीमिली ही मालिका दूरदर्शनवर प्रसारित केली होती. त्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर देखील ही संपूर्ण मालिका ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध होणार आहे. ही मालिका विद्यार्थ्यांना एमकेसीएलच्या अधिकृत संकेतस्थळावरून मोफत बघता येईल.

****

आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह प्रवेश योजना राबवण्यात येत आहे. त्याअनुषंगानं प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद अंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, बीड आणि लातूर या चार जिल्ह्यातील १४ वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना तालुका स्तरावर आठवीपासून पुढील प्रवेशाकरिता आणि जिल्हा स्तरावर ११ वी पासून नंतरच्या शिक्षणाकरता शासकीय वसतिगृहात पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. याचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असं आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

हर घर तिरंगा मोहिमेच्या उपक्रमात सहभाग म्हणून अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव इथल्या समता महिला बचत गटाच्या माध्यमातून २५ हजार तिरंगा ध्वज तयार करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे महिलांना रोजगार मिळाला असल्याचं या बचत गटाच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे यांनी सांगितलं.

****

अग्निपथ योजनेअंतर्गत औरंगाबाद विभागात अग्निवीरांचा भरती मेळावा १३ ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. औरंगाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रांगणात हा मेळावा होणार असून, इच्छुकांना डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट जॉईन इंडियन आर्मी डॉट एनआयसी डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करुन या मेळाव्यात सहभागी होता येईल. औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, बुलडाणा आणि जळगाव इथले युवक या मेळाव्यासाठी अर्ज करु शकतील. पात्र अग्निवीरांची लेखी परिक्षा १३ नोव्हेंबर २०२२ ला होणार आहे.

****

भारत आणि वेस्टइंडिज दरम्यान पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना आज फ्लोरिडा मधल्या लाऊडरहील इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत भारत दोन - एकनं आघाडीवर आहे.

****

राज्यात पुढचे पाच दिवस मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून, येत्या दोन दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

//**********//

No comments:

Post a Comment