Saturday, 6 August 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 06.08.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०६ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

उपराष्ट्रपती पदासाठी आज संसद भवनात मतदानाला सुरुवात झाली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार असून, त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड आणि विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात उपराष्ट्रपती पदासाठी थेट लढत हो आहे.

****

आजची नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश चाचणी - सीयुईटी युजी प्रशासनिक आणि तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. यात राज्यातल्या औरंगाबाद केंद्राचा समावेश आहे. १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान ही परीक्षा होणार असल्याचं, राष्ट्रीय चाचणी संस्थेनं सांगितलं.

****

ऊर्जा संरक्षण संशोधन विधेयक काल लोकसभेत सादर झालं. या विधेयकावरच्या चर्चेत बोलताना ऊर्जामंत्री आर के सिंह यांनी, २०३० चं निर्धारित ऊर्जा उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आयात कमी करण्याची गरज व्यक्त केली. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी धोरणात बदल केले जात असल्याची माहिती सिंह यांनी दिली. देशाच्या ग्रामीण भागात सध्या दिवसातून सुमारे वीस तास वीज पुरवठा केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

देशात दीड लाख आयुष्मान भारत - निरामय म्हणजेच हेल्थ अँड वेलनेस सेंटर कार्यान्वित करण्याचं उद्दिष्ट यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी सांगितलं. दीड लाख आयुष्मान केंद्रं स्थापन करण्याच्या एकूण उद्दिष्टापैकी सध्या एक लाख २२ हजार केंद्रं देशात कार्यरत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

****

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी काल निर्यात प्रोत्साहन मंडळाच्या तसंच औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी नवी दिल्ली इथं बातचीत करून निर्यातीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्यातदार, ईपीसी, सरकारी संस्था आणि परदेशातल्या भारतीय दूतावासांनी एकत्र काम करणं आवश्यक आहे, असंही गोयल यांनी नमूद केलं. 

****

उस्मानाबाद जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे उस्मानाबाद तालुक्यातलं तेरणा धरण पूर्ण भरलं आहे. त्यामुळे उस्मानाबाद शहरासह ढोकी, तडवळा, येडशी ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

//********//

 

 

No comments:

Post a Comment