Monday, 8 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 08.08.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 August 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      शेतीवर भर देण्यासोबत पशुपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात स्वयंपूर्ण बनून भारतानं कृषि क्षेत्रात जगाचं नेतृत्व करायला सिद्ध व्हावं- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अपेक्षा

·      राज्याच्या विविध प्रकल्पांसाठी केंद्राकडून निधी मिळणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

·      शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर आता शुक्रवारी सुनावणी

·      सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीचा मंत्रिमंडळ विस्ताराशी कोणताही संबंध नसल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे १ हजार ८१२ रुग्ण, मराठवाड्यात १२४ बाधित

·      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

·      कॉस्मो फिल्म प्रायवेट लिमिटेड आणि पिरॅमल फार्मास्युटिकल्स कंपन्या औरंगाबादमध्ये दीड हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार 

·      राष्ट्रकूल क्रिडा स्पर्धेत भारताला आणखी पाच सुवर्ण, चार रौप्य आणि सात कांस्य पदकं

आणि

·      पाचव्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर ८८ धावांनी विजय

****

भारतानं आधुनिक शेतीवर भर देण्यासोबत पशुपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात स्वयंपूर्ण बनून कृषि क्षेत्रात जगाचं नेतृत्व करायला सिद्ध व्हावं, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्लीत नीती आयोगाच्या संचालन परिषदेची सातवी बैठक काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. या परिषदेत पीक विविधता, तेलबिया आणि कडधान्यांच्या बाबतीत, तसंच कृषी समुदायांमध्ये आत्मनिर्भरता, नागरी प्रशासन, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची शालेय आणि उच्च शिक्षणामध्ये अंमलबजावणी, या विषयांवर चर्चा झाली. आगामी जी ट्वेंटी परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे असल्यानं राज्यांच्या सामर्थ्याचं दर्शन घडवण्याची संधी भारताला आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

****

दरम्यान, नीती आयोगाच्या संचालन परिषदेच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, राज्याच्या विविध प्रकल्पांसाठी केंद्राकडून निधी मिळणार असल्याची माहिती दिली. सिंचनाखालचं क्षेत्र वाढवण्यावर तसंच सेंद्रीय शेतीवर राज्य सरकार भर देणार असून, राज्यातल्या जलयुक्त शिवार योजनेबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात एक शिक्षकी शाळा असता कामा नयेत याची दक्षता घेण्याबरोबरच, शिक्षणाचा दर्जा सुधारण्याकरता विशेष प्रयत्न करणार असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले. शहरांच्या सुशोभीकरणाबरोबरच हरित शहरांच्या निर्मितीवर भर द्यायची सूचना या बैठकीत करण्यात आली असून, त्यादृष्टीने राज्यानं याआधीच पावलं उचलल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं काही नवीन प्रस्ताव केंद्र सरकारला दिले असून, या प्रस्तावातील प्रकल्प थांबणार नसल्याचं आश्वासन देण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले.....

‘‘आपण जे प्रस्ताव पाठवलेले आहेत त्याच्यामधे सेव्हरेज ट्रीटमेंट असेल, त्याच्यामध्ये सॅनिटेशन असेल, एस टी पी आहे, म्हणजे रीसायकलिंग ऑफ वॉटर जे आपण शुद्ध करतो ते आहे, प्रकल्प थांबणार नाहीत अशा प्रकार अश्वस्त प्राईम मिनिस्टर महोदयांनी केलेलं आहे.’’

****

केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमांच्या एकत्रित प्रवेश परीक्षेचा दुसरा टप्पा या महिन्याच्या २४ ते २८ दरम्यान होणार आहे. ४ ते ६ तारखेदरम्यान झालेली परीक्षा तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आली होती, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्राध्यापक एम जगदीश कुमार यांनी दिली. यासाठी उमेदवारांना नवीन प्रवेशपत्रे दिली जाणार असल्याचंही जगदीश कुमार यांनी सांगितलं.

****

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवरची आजची सुनावणी आता शुक्रवारी १२ ऑगस्ट रोजी होणार आहे. न्यायालयानं सुनावणी निश्चित झालेल्या कार्यसूचीत या याचिकांवरची सुनावणी शुक्रवारी दर्शवली आहे.

****

सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही संबंध नसल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मह्टलं आहे. नवी दिल्लीत ते काल वार्ताहरांशी बोलत होते. न्यायालयानं मंत्रिमंडळ विस्तार करण्यार प्रतिबंध केला नसल्याचं त्यांनी सांगितलं. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याचं ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला राज्यातल्या जनतेनं कौल दिला आहे, हे ग्रामपंचायत निकालावरून स्पष्ट झालं असल्याचं फडवीस म्हणाले. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपानं समाधानकारक कामगिरी केली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनंही दुसऱ्या क्रमांकावर राहात उत्तम कामगिरी केल्याचं, त्यांनी सांगितलं. भाजपाला आणखी बळकट करण्यासह आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत असलेल्या शिवसेनेच्या खासदारांना पूर्ण ताकदीनं निवडून आणू असं फडवीस म्हणाले.

ुख्यमंत्री शिंदे यांनीही न्यायालयाची मंत्रीमंडळ विस्ताराला कोणतीही स्थगिती नसल्याचं सांगितलं, ते म्हणाले...

‘‘कोर्टाचा काही विषयच नाही. कोर्टामध्ये सरकार मंत्रीमंडळाच्या बाबतीमध्ये कुठला स्टे आहे का? बिलकुल नाही. त्यामुळे जे काही विरोधी पक्षांना वाटतंय तसं नाहीये.’’

****

वस्तू आणि सेवा कराची ४८ कोटी रुपयांची खोटी बिलं देणाऱ्या मुंबईतल्या विवांता मेट्ल कॉर्पोरेशनचा मालक इम्तियाझ अब्दुल रेहमान सय्यद याला काल अटक करण्यात आली. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागानं केलेल्या विशेष तपासानंतर ही कारवाई करण्यात आली. अस्तित्वात नसलेल्या बोगस कंपन्यांकडून बिले घेऊन कर भरणं टाळणं, या गुन्ह्याअंतर्गत न्यायालयानं सय्यदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १ हजार ८१२ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ५९ हजार ७३२ झाली आहे. काल या संसर्गानं एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार १३९ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल एक हजार ६७५ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७८ लाख ९९ हजार ५८२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य एक शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १२ हजार ११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, राज्यात बी ए फोर या व्हेरियंटचा एक, बी ए फाईव्हचे दोन, तर बीए टू पॉईंट सेवन फाईव्हचे १६ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे इथले आहेत. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए फोर आणि बीए  फाईव्ह रुग्णांची संख्या २७५ तर बीए टू पॉईंट सेवन फाईव्हच्या रुग्णांची संख्या २५० झाली आहे.

****

मराठवाड्यात काल १२४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये लातूर आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी ३४, उस्मानाबाद ३१, हिंगोली सात, औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी पाच, तर परभणी जिल्ह्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, सकाळी सव्वा अकरा वाजता त्यांच नांदेड इथं आगमन होणार आहे. हुजूरसाहिब गुरूद्वारा इथून उत्तर मतदार संघातल्या पूरग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते एका मेळाव्याला उपस्थित राहून दुपारी हिंगोली इथं पुरग्रस्त भागाची पाहणी करून रात्री नांदेड विमानतळाहून मुंबई इथं रवाना होणार आहेत.

****

हर घर तिरंगा मोहिमेच्या प्रचारासाठी नांदेड शहरात फिरत्या वाहनाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. काल या वाहनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या हस्ते झालं. किनवट तालुक्यातल्या मौजे भीमपूर इथं भूमी अभिलेख विभाग आणि उपअधिक्षक भूमीअभिलेख यांनी घरोघरी जाऊन हर घर तिरंगा अभियानाबाबत गावकऱ्यांशी सुसंवाद साधून जनजागृती केली. जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख एस.पी. सेठीया यांनी गावातल्या महिलांना यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात तिरंगा ध्वज भेट दिले.

****

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नऊ तारखेला क्रांतीदिनानिमित्त नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात मानवी साखळी करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली. या उपक्रमात शालेय विद्यार्थी, महिला, युवक-युवतींनी, आशा, अंगणवाडी कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं भाग घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. तसंच मानवी साखळी तयार करताना मुलांची, महिलांची आणि पुरूषांची स्वतंत्र मानवी साखळी तयार करावी अशी सुचनाही ठाकूर यांनी दिली.   

****

दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिका - डीएमआयसी बिडकीन औद्योगिक पट्यामध्ये कॉस्मो फिल्म प्रायवेट लिमिटेड आणि पिरॅमल फार्मास्युटिकल्स या दोन कंपन्या दीड हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. या दोन्ही कंपन्यांची अनुक्रमे १७८ एकर आणि १३८ एकर जमिन खरेदी केल्याची घोषणा नॅशनल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमरितलाल मीना यांनी केली.

****

परभणी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून तयार करण्यात आलेल्या तीन एलईडी चित्ररथांचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते काल झालं. नागरिकांनी आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकावून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभाग नोंदवावा, असं आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सिकर यांनी  यावेळी केलं.

****

बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकूल क्रिडा स्पर्धेत भारतानं पाच सुवर्ण, चार रौप्य आणि सात कांस्य पदकांची कमाई केली.

टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांच्या जोडीनं सुवर्ण पदक पटकावलं. नुकत्याच झालेल्या अंतिम सामन्यात या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा चार - एक असा पराभव केला.

एथलेटीक्समधे ट्रिपल जंप प्रकारात एल्दोस पॉल यानं सुवर्ण पदकाची कमाई करत इतिहास रचला आहे.

मुष्टीयुद्धामधे ५१ किलो वजनी गटात अमित पांघलनं, महिलांच्या ४८- ५० किलो वजनी गटात नित जरीननं सुवर्णपदक पटकावलं, तिनं अंतिम सामन्यात उत्तर आयर्लंडच्या कार्लीचा ५-असा पराभव केला. नितू घंघासनं देखील मुष्टीयुद्धात सुवर्ण पदक पटकावलं.

महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघानं रौप्य पदक जिंकलं. अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला.

मुष्टीयुद्धात सागर अहलावतनं रौप्य पदक जिंकलं. ९२ किलो वजनी गटात काल झालेल्या अंतिम सामन्यात त्याला इंग्लंडच्या खेळाडकडून पराभव पत्करावा लागला.

सॉलीड जंप प्रकारात अब्दुल्ला अबु बकर यानं रौप्य पदक पटकावलं.

महिला हॉकीमध्ये भारतीय संघानं कांस्य पदक पटकावलं, १६ वर्षानंतर भारतीय महिला संघानं ही कामगिरी केली.

भालाफेक स्पर्धेत भारताच्या अन्नु राणीनं, पुरुषांच्या १० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमारनं, पॅरा टेबल टेनिस मध्ये सोनलबेन पटेलनं, स्क्वॅशमध्ये मिश्र दुहेरीत दीपिका पल्लिकल आणि सौरव घोषाल या जोडीनं कांस्य पदक जिंकलं.

बॅडमिंटनमध्ये महिला दुहेरीत त्रीसा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांच्या जोडीनं कांस्य पदक जिंकलं. या जोडीनं ऑस्ट्रेलियाच्या जोडीचा २१-१५, २१-१८ असा पराभव केला. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांतनं देखील कांस्य पदक जिंकलं.

महिला एकेरीचा अंतिम सामना आज प. व्ही सिंधु आणि कॅनडाच्या मिशेल ली यांच्यात, तर पुरुष एकेरीचा अंतिम सामना लक्ष्य सेन आणि मलेशियाच्या ज्झे योंग एन जी यांच्यात होणार आहे.

या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत १सुवर्ण, १६ रौप्य आणि २कांस्य पदकांसह एकूण ५पदकं जिंकली आहेत.  

****

फ्लोरिडा इथं झालेल्या पाचव्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा ८८ धावांनी पराभव केला. याबरोबरच भारतानं पाच सामन्यांची मालिका चार - एकनं जिंकली आहे. काल झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतानं १८८ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल वेस्ट इंडिजचा संघ १६व्या षटकात शंभ धावांवर सर्वबाद झाला. अक्षर पटेल सामनावीर, तर अर्शदीप सिंह मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

****

राज्याच्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल दुपारी तासभर जोरदार पाऊस झाला. हिंगोली शहर आणि परिरसात काल मुसळधार पाऊस झाला. औंढा नागनाथ, कळमनुरी, वसमत तालुक्यात पाऊस झाल्यानं कयाधू नदीला पूर आला आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातही काल पाऊस झाला.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांमध्ये काल पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी कणकवली आणि सह्याद्री पट्ट्यात काल दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला.

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळित झालं आहे. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अन्य भागात काल संध्याकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडला. नाशिक जिल्ह्याच्या काही भागात काल दुपारनंतर पावसानं जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडत आहे.

****

No comments:

Post a Comment