Tuesday, 9 August 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.08.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०९ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होआहे. मुंबईत राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत.

****

आज नऊ ऑगस्ट म्हणजेच क्रांतीदिन. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात अत्यंत महत्वाच्या ठरलेल्या या आंदोलनाचं आणि स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. १९४२ मध्ये महात्मा गांधीजींनी चले जावचा नारा दिला, आणि त्यानंतरच देशभरात आंदोलनाचा वणवा पेटला. या आंदोलनानेच ब्रिटिश सत्तेच्या अखेरच्या पर्वाला सुरुवात झाली.

****

मुस्लिम बांधव आज मोहर्रम पाळत आहेत. करबला मैदानावर बलिदान दिलेल्या योद्ध्यांच्या स्मृतीत हा दिवस पाळला जातो. शिया बांधवांकडून आज मातमी जुलूस काढले जातात. इस्लामी नववर्षाच्या या पहिल्या महिन्यात घरोघरी बसलेल्या सवाऱ्या तसंच ताजियांचीही मिरवणूक काढून विसर्जन केलं जातं.

****

मराठी चित्रपटसृषटीतले ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज पहाटे मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते. मोरूची मावशी हे त्यांचं अतिशय गाजलेलं नाटक होतं. दिली सुपारी बायकोची, बुवा तेथे बाया यांसारख्या नाटकांमध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. याशिवाय अनेक मालिका, चित्रपट, नाटकात त्यांनी काम केलं. एक फुल चार हाफ, डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, गोला बेरीज, बॉम्बे वेल्वेट, नवरा माझा नवसाचा आदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. 

****

भारतीय लष्करानं काल ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहयोगानं हिम ड्रोन - थॉन  कार्यक्रमाची सुरवात केली. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर व्हावं यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याचा उद्देश सीमेवरील सैनिकांसाठी ड्रोन क्षमता विकसित करणं हा असून सर्व संबंधितांच्या परस्पर संपर्कातून हा उपक्रम राबवला जाईल, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

नवी दिल्लीत काल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं सातवं अधिवेशन पार पडलं. प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या अधिवेशनात बोलताना, देशभरात इतर मागासवर्ग - ओबीसींची संख्या जास्त असूनही आजपर्यंत या समाजावर अन्याय झाला असल्याची टीका केली.

//*********//

 

No comments:

Post a Comment