Wednesday, 10 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 10.08.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 August 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १० ऑगस्ट २०२ सायंकाळी ६.१०

****

§   अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये मदत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

§   केंद्र सरकारकडून कर हस्तांतरणापोटी सात हजार तीनशे एकोणसत्तर कोटी रुपये निधी महाराष्ट्राला प्राप्त

§   भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणातले आरोपी वरवरा राव यांना स्थायी जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

आणि

§   स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मराठवाड्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन

****

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज झालेल्या पहिल्याच बैठकीत हा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मदतीची मर्यादा दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर करण्यात आली असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल - एनडीआरएफच्या मदतीपेक्षा ही मदत दुप्पट असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

****

राज्य सरकारांना कर हस्तांतरणाच्या दोन हप्त्यांची, सुमारे एक लाख सोळा हजार सहाशे सहासष्ट कोटी रुपयांची रक्कम केंद्र सरकारनं आज वितरित केली. यामध्ये महाराष्ट्राला सुमारे सात हजार तीनशे एकोणसत्तर कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. राज्यांच्या भांडवली आणि विकास खर्चाला गती देण्याच्या दृष्टीनं मदत करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असून, त्यानुसार राज्यांना ही रक्कम वितरित करण्यात आली आहे.

****

स्वातंत्र्यदिनाच्या नवी दिल्लीत होणाऱ्या मुख्य समारंभासाठी यंदा शवगृहाचे कर्मचारी, पथविक्रेते, अंगणवाडी कार्यकर्ते आणि मुद्रा योजनेचे लाभार्थी, यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या समारंभात देशभरातल्या जिल्ह्यांचे एनसीसी कॅडेटस आपापल्या स्थानिक वेषभूषेमध्ये, भारताच्या नकाशाच्या आकारात लाल किल्ल्याच्या समोर उपस्थित राहणार आहेत, यातून भारताच्या सांस्कृतिक विविधतेचं दर्शन होईल, असं अजय कुमार यांनी सांगितलं.

****

प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपणाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. नायडू यांच्या हस्ते आज संसद भवनाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, नायडू यांचा उपराष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ आज पूर्ण झाला. नवनिर्वाचित उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेणार आहेत.

****

भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणातले आरोपी वरवरा राव यांच्या अंतरिम जामिनाचं रूपांतर स्थायी जामिनात करण्यास सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली आहे. ब्याऐंशी वर्षांचे राव यांनी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत तशी विनंती न्यायालयाकडे केली होती. या प्रकरणात अजून आरोप निश्चित झाले नाहीत आणि वरवरा राव यांच्या प्रकृतीत सुधारणाही झालेली नाही, म्हणून स्थायी जामीन देण्यात येत आहे, असं न्यायालयानं म्हटलं. मात्र वरवरा राव यांनी या जामिनाचा दुरुपयोग करू नये किंवा साक्षीदारांना प्रभावित करू नये, असंही न्यायालयानं बजावलं आहे. याशिवाय, जामिनाचा हा निर्णय इतर आरोपींच्या जामिनासाठीचा आधार होऊ शकणार नाही, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट नमूद केलं आहे.

****

देशाच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं आतापर्यंत दोनशे सात कोटींहून अधिक मात्रांचा टप्पा ओलांडला आहे, तर तीन कोटी शहाण्णव लाखांहून जास्त किशोरवयीन मुलांना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. भारतात कोरोनामुक्तीचा दर सध्या साडे अट्ठ्याण्णव टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. राज्यात आज सकाळपासून ६५ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या लस मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ४३ लाखांच्या वर गेली आहे.

****

भारताचे माजी राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली. व्ही.व्ही.गिरी भारताचे चौथे राष्ट्रपती होते. राष्ट्रपती भवनातल्या त्यांच्या प्रतिमेवर पुष्प अर्पण करून राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांना अभिवादन केलं.

****

 स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मराठवाड्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. उस्मानाबाद इथल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात हर घर तिरंगा मोहिमेसाठी तिरंगा ध्वज विक्री केंद्राचं उद्घाटन आज करण्यात आलं. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या उस्मानाबाद जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षातर्फे सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचं उद्घाटन उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते झालं. उस्मानाबाद जिल्हयातल्या अठरा पोलीस ठाण्यांत विक्रीसाठी ध्वज उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात आज तीन हजार सातशे एकोणचाळीस शाळांमधल्या साडेसहा लाख विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर समूहगान कार्यक्रमात भाग घेतला. विष्णुपुरी इथल्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम झाला. नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्यासह अन्य मान्यवर आणि अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

****

लातूर जिल्हा प्रशासनाकडून स्वराज्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुका मुख्यालयात तसंच गावोगावी कार्यक्रम सुरु करण्यात आले आहेत. जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात जाऊन देशभक्तीपर चित्रफिती, जिंगल्स आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरव गाथा दाखवण्यासाठी सज्ज असलेल्या दोन दृकश्राव्य एल ई डी रथांना आज लातूर जिल्हा परिषदेतून हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परभणी इथं आज दिव्यांगांची वाहन फेरी काढण्यात आली. या फेरीला जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी हिरवा झेंडा दाखवला. याशिवाय, परभणी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं, 'हर घर तिरंगा' अभियानाची जनजागृती करण्यासाठी परभणी शहरात बचत गटातल्या महिलांची महारॅली काढण्यात आली. यामध्ये जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या.

****

औरंगाबाद इथं स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय सोहळा विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी सुरू होणार आहे, या दिवशी सकाळी आठ पस्तीस ते नऊ पस्तीस या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे कार्यक्रम सकाळी आठ पस्तीस पूर्वी किंवा नऊ पस्तीस नंतर आयोजित करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी केली. स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पूर्वतयारीची बैठक आज झाली, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं आतोनात नुकसान झालं आहे. शेंदूरवादा आणि आसपासच्या अनेक गावात मका तसंच कपाशीला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेतात गुडघाभर पाणी साचलेलं आहे. शासनानं तात्काळ पंचनामे करून न्याय द्यावा, अशी मागणी या भागातल्या शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन गंगापूरचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलं आहे.

****

गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतल्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, कोल्हापूरमधून कोकणात जाणारे दोन्ही मार्ग बंद झाले आहेत. कर्नाटकातल्या अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकनं विसर्ग सुरू झाल्यानं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

****

गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला असून आज तिसऱ्या दिवशीही अनेक मार्गांवरील वाहतूक बंद राहिल्याचं वृत्त आहे. आज दुपारी संपलेल्या चोवीस तासात कोरची तालुक्यात सर्वाधिक १६६ पूर्णांक ६ मिलीमीटर, तर त्याखालोखाल कुरखेडा तालुक्यात ११६ पूर्णांक ५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

//**********//

No comments:

Post a Comment