Wednesday, 10 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 10.08.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१० ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

हरियाणा पानिपत इथल्या इथेनॉल निर्मितीच्या सुधारित तंत्रज्ञान धारित प्रकल्पाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. देशातल्या जैवइंधन निर्मितीला तसंच वापराला चालना देण्याच्या सरकारच्या उद्दीष्टाचा हा एक भाग आहे. या प्रकल्पात कचऱ्यातून संपत्ती ही संकल्पना उपयोगात आणून दरवर्षी सुमारे 3 कोटी लीटर इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे.

दरम्यान, जागतिक जैव इंधन दिवस आज पाळण्यात येत आहे. पारंपरिक जीवाष्म इंधनांना पर्याय म्हणून जैविक इंधनांचा वापर करुन कार्बन उत्सर्जन कमी करण्याबाबत जनजागृतीसाठी या दिवसाचं महत्व आहे.

****

संयुक्त जनता दलाचे प्रमुख नीतीशकुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. भारतीय जनता सोबतची युती संपल्याचं सांगत, नीतीशकुमार यांनी कालच राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. त्याचवेळी १६० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र देत, नवीन सरकार स्थापनेचा दावा केला.

****

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून शिवसेना नेते अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधीमंडळ सचिवालयानं काल याबाबतचं पत्र जारी केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांच्या नावाची शिफारस केली होती.

****

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंगप्रकरणी आरोपपत्रानंतर खटला चालवण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी मुंबई पोलिसांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. तीन ऑगस्टला हा प्रस्ताव पाठवला असल्याचं मुंबई पोलिसांनी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात सांगितलं.

****

४४ व्या  बुद्धिबळ ऑलिंपियाचा काल चेन्नईत समारोप झाला. ११ व्या निर्णायक फेरीअंती उझबेकिस्ताननं सुवर्णपदक तर आर्मेनियानं रौप्यपदक मिळवलं. भारत दोन संघाला कांस्य पदकावर समाधान मानवं लागलं.

****

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या टी-ट्वेंटीच्या मानांकन यादीत भारताची महिला खेळाडू रेणुका हीनं गोलंदाजीत अठरावं स्थान पटकावलं आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेतल्या कामगिरीनंतर रेणुकानं दहा स्थानांनी झेप घेत, अठरावं स्थान पटकावलं आहे.

//*********//

 

No comments:

Post a Comment