Friday, 12 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 12.08.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१२ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह आज ग्रामीण सहकारी बँकांच्या एकदिवसीय राष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत. राज्य सहकारी बॅंका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना उत्कृष्ट कामकाजाबद्दल आणि सहकारी पतसंस्थांना दीर्घकालिन सेवेसाठी यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

****

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान तसंच केंद्रीय अनुराग ठाकूर आज नवी दिल्लीत आयोजित इंडिया ॲट 2047 या युवक मेळाव्याला संबोधित करणार आहेत. यात सहभागी होणाऱ्या तरुणांना विविध राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय महत्वाच्या मुद्यांवर आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे.

****

अमरनाथ यात्रेची काल सांगता झाली. गेले ४३ दिवस सुरु असलेल्या या यात्रेत, या वर्षी तीन लाखांहून अधिक भाविक सहभागी झाल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिंह यांनी दिली. कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्ष या यात्रेला स्थगिती देण्यात आली होती.

****

भारतीय जनता पक्षाच्या मुंबई शाखेनं गोविंदांना सुरक्षा देण्यासाठी दहा लाख रुपयांचं विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे मुंबई अध्यक्ष आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही माहिती दिली.

****

हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या कुरुंदा इथं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागातल्या आशा स्वयंसेविकांना काल रक्षा बंधनानिमित्त मदतीचा हात म्हणून, रोख रक्कम आणि साडीचोळी देऊन रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या आवाहनातून एक लाख सात हजार रुपये रोख रक्कम आशाताईंना देऊन मदतीचा हातभार लावण्यात आला.

कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या विद्यार्थिनींनी सैनिकांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. नांदेड - हिंगोली महामार्गावर असलेल्या येलकी इथल्या सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्पमध्ये असलेल्या सैनिकांना या विद्यार्थीनींनी राख्या बांधल्या.

****

मराठवाड्यात काल ७१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या १३ रुग्णांचा समावेश आहे.

//*********//

 

No comments:

Post a Comment