Saturday, 13 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 13.08.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

                              Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 August 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १३ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

कर्ज वसुली करताना दलालांनी कर्जदाराला शारिरिक किंवा मानसिक इजा पोहोचवू नये तसंच कर्जदाराला भयभीत करु नये असे निर्देश भारतीय रिझर्व बँकेनं वित्तीय संस्थांना दिले आहेत. कर्जवसुली दलालांनी कर्जदाराचे नातेवाईक तसंच त्यांच्या मित्रांनाही अपमानित करु नये आणि त्यांच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप करु नये असं ही रिझर्व्ह बँकेनं सूचित केलं आहे. कर्जदारांसोबत दलालांच्या वर्तणुकीबाबत चिंता व्यक्त करत बँकेनं संध्याकाळी ७ ते सकाळी ८ या वेळेत कर्जदारांना दूरध्वनीवरुन संपर्क आणि या वेळेत त्यांना सामाजिक प्रसार माध्यमाद्वारे धमकीवजा संदेश पाठवण्यासही  स्पष्टपणे मनाई केली आहे. हे निर्देश क्षेत्रीय ग्रामीण बँका, सहकारी बँका, गैरबँकींग वित्तीय संस्था, परिसंपत्ती पुनर्निर्माण कंपन्या, अखिल भारतीय वित्तीय संस्थांसह सर्व वाणिज्यिक बँकांना लागू करण्यात आले असून या निर्देशांचं उल्लंघन करणाऱ्यांना गांभीर्यानं घेतलं जाणार आहे. मात्र तीन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना देण्यात आलेलं जमानत मुक्त कर्ज किंवा मायक्रो फायनान्स साठी हे निर्देश लागू नसतील.

****

भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील पहिलं ग्रां प्रि पारितोषिक पुण्याचा तरूण चित्रपट दिग्दर्शक सोहिल वैद्य याच्या मर्मर्स ऑफ दी जंगल या लघुपटाला जाहीर झालं आहे. हे पारितोषिक ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न आंतरराष्ट्रीय महोत्सवातील सर्वात मोठं आणि प्रतिष्ठेचं पारितोषिक आहे.

****

औरंगाबाद इथल्या सुभेदारी विश्रामगृहासमोरच्या सिटी सेंटर इथं उभारण्यात आलेल्या शंभर फूट स्मारक ध्वजाचं लोकार्पण, केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते आज करण्यात आलं. सामाजिक दायित्व निधीतून डीके फ्लॅग फाऊंडेशनच्या वतीनं हा शंभर फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी दिली. शहरात यामुळे आता अशा पद्धतीच्या ध्वजांची संख्या तीन झाली आहे.

****

अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं दिला आहे. तपासात वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचं कुठंही सिद्ध होत नसल्याचं आढळून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यासह चौघाजणांनी जात पडताळणी समितीकडे वानखेडे यांच्याविरोधात यासंदर्भात तक्रार केली होती.

****

भारतीय जनता पक्षानं गोव्यात पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मोठं यश मिळवलं आहे. या निवडणुकीत भाजपनं १८६ पैकी १५० जागांवर विजय मिळवला असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. गेल्या बुधवारी झालेल्या या निवडणुकीत ७८ पूर्णांक ७ टक्के मतदान झालं होतं.

****

देशातल्या प्रत्येक पंचायतीपर्यंत सहकार पोहोचवण्यासाठी वेगळ्या धोरणाची गरज असल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं ग्रामीण सहकारी बँकांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कृषि सहकारी समित्यांसाठी आदर्श नियमावली बनवणार असून निष्क्रीय कृषी समित्यांनी पुन्हा सक्रीय व्हावं किंवा अश्या समित्यांचं विलिनीकरण व्हावं असं त्यांनी सांगितलं. अद्याप दोन लाख पंचायतींमधे प्राथमिक कृषि पतसंस्था नाहीत. त्यामुळे प्रत्येक पंचायतींपर्यंत या पतसंस्थांचं जाळं पोचवण्यासाठी पंचवार्षिक धोरण आवश्यक आहे, असं ते म्हणाले. ग्रामीण भारताला देशाच्या अर्थव्यवस्थेसोबत जोडण्यात सहकारी बँकांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं ही त्यांनी सांगितलं.

****

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली इथल्या आपल्या शासकीय निवासस्थानी अभिनंदन केलं. नुकत्याच बर्मिंगहॅम इथं झालेल्या या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी २२ सुवर्ण पदकं, १६ रौप्य तर २३ कांस्यपदकं जिंकली आहेत.२८ जुलै ते ८ ऑगस्ट पर्यंत झालेल्या या स्पर्धांमध्ये जवळपास २०० भारतीय खेळाडूंनी १६ क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदवला होता.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २४ लाख ४३ हजारांहून धिक नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०७ कोटी ७१ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या १५ हजार ८१५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. तर २० हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख १९ हजार २६४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

//*********//

 

 

 

No comments:

Post a Comment