Monday, 15 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 15.08.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 August 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १५ ऑगस्ट २०२ सायंकाळी ६.१०

****

·      देशाचा ७६वा स्वातंत्र्य दिन मराठवाड्यासह सर्वत्र उत्साह आणि जल्लोषात साजरा  

·      माजी आमदार विनायक मेटे यांच्या पार्थिवावर बीड इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

·      मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी दिलेलं बलिदान वाया जाऊ देणार नाही-मुख्यमंत्री

आणि

·      'एक दिवस शेतकऱ्यांसोबत' हा उपक्रम राज्यभर राबवण्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

****

देशाचा ७६वा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे.

ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम राजधानी नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं, त्यानंतर केलेल्या भाषणात, आगामी २५ वर्षात देशाला विकसित करण्याचा संकल्प आखण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ध्वजारोहण झालं. मंत्रालयातल्या राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मुख्यमंत्र्यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं. विधानभवनात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. पुण्यात विधानभवन प्रांगणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झालं.

****

मराठवाड्यात सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. हर घर तिरंगा मोहिमेमुळे हा उत्साह द्विगुणित झाला आहे. औरंगाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात रोजगार हमी योजना तसंच फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते झालं.

औरंगाबाद जिल्हा आज अनेक क्षेत्रात अग्रेसर असल्याचं सांगत ते म्हणाले.

 

जालना इथं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. जालना जिल्ह्यातले शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची प्रगती तसंच जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सरकार कटीबध्द असल्याचं, अब्दुल सत्तार यांनी यावेळी केलेल्या भाषणात सांगितलं.

 

परभणी इथं सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मागील ७५ वर्षांचा इतिहास आपल्यासाठी आश्वासक असला तरी आपल्या जिल्ह्यासमोर, राज्यासमोर, देशासमोर अनेक समस्या आजही आहेत. आपण सर्व मिळून सांघिक भावनेने या समस्यांचे निराकरण करू, नवभारताचं स्वप्न साकारण्यासाठी भारतमातेची एकजुटीने सेवा करु, सं आवाहन सावे यांनी केलं.

 

उस्मानाबाद इथं सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं. यावेळी केलेल्या भाषणात सावंत यांनी, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचं सांगितलं. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाला गती देणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

 

नांदेड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांच्या हस्ते, बीड इथं जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते, लातूर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते, तर हिंगोली इथं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं.

 

विविध शैक्षणिक संस्था, सरकारी निमसरकारी कार्यालयं, विविध पक्ष संघटना तसंच खासगी आस्थापनांमधूनही ध्वजारोहणाचा उत्साह दिसून आला. औरंगाबाद शहरात विविध ढोल पथकं मंडळांच्या वतीनं तिरंगा पदयात्रा काढण्यात आल्या. या सर्व पदयात्रा क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि स्वातंत्र्य संग्राम स्मारक परिसरात विसर्जित झाल्या. ढोल ताशांच्या आवाजासह देशभक्तीपर गीतं आणि घोषणांनी हा परिर दणाणून गेला होता.

****

उस्मानाबाद इथं स्वातंत्र्यदिनानिमित्त आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं देशातल्या सर्वात मोठ्या तिरंगा ध्वज पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होतं. हा ध्वज ७ हजार ५७५ फुट लांबीचा होता. या ध्वज यात्रेत संस्थेच्या विविध शाखेतील १० हजार विद्यार्थ्यी आणि एक हजार शिक्षक कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी दिली.

****

देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने २०८ कोटींचा टप्पा पार केला आहे. दोन कोटी ७६ लाख ४८ हजार ३३१ सत्रातून हे लसीकरण झालं आहे. देशात आतापर्यंत या लसीच्या २०८ कोटी २५ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत, तर १२ ते १४ वर्ष वयोगटातील तीन कोटी ९७ लाखापेक्षा अधिक मुलामुलींना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

****

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांच्या पार्थिव देहावर आज बीड इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. काल पहाटे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर एका भीषण अपघातात मेटे यांचं निधन झालं. अंत्यसंस्कारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी मेटे यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.

मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी, मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी दिलेलं बलिदान वाया जाऊ देणार नाही, असं आश्वासन दिलं.. मुख्यमंत्री म्हणाले...

मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी, आरक्षणासाठी मेटे साहेबांनी जो लढा दिला, संघर्ष केला, तो आम्ही कधीही वाया जाऊ देणार नाही. एवढाच याठिकाणी मी आपल्याला शब्द देऊ इच्छितो. आणि जे जे काही करावं लागेल, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी आमचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही एवढं याप्रसंगी मी आपल्याला सांगतो.

 

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातले अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रासह समाजाच्या सर्वच स्तरातल्या नागरिकांनी मेटे यांचं अंत्यदर्शन घेऊन, आपल्या लाडक्या नेत्याला साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला.

****

शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी 'एक दिवस शेतकऱ्यांसोबत' हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. कृषी पदाचा पदभार स्विकारल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी आज मराठवाड्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत कृषी विषयक बाबींचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश मंत्री सत्तार यांनी यावेळी दिले.     

****

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या पिकांचं येत्या ४८ तासांत पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक डॉ.तानाजी सावंत यांनी दिले. ते आज उस्मानाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर आयोजित केलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. जिल्हयातील पीक परिस्थती, पावसाचे प्रमाण, धरणांचे, रस्त्यांचे बांधकाम, आणि नागरिक-शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. तसंच प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना जलद गतीने न्याय द्यावा, असे आदेशही त्यांनी यावेळी संबंधितांना दिले.

****

No comments:

Post a Comment