Wednesday, 17 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 17.08.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 August 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १७ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. विधानसभेत कामकाज सुरु झाल्यावर नवीन मंत्र्यांचा परिचय करुन देण्यात आला. त्यानंतर विरोधी पक्षांनी अतिवृष्टीनं शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली. शेतकर्यांच्या नुकसानीवर सरकार नजर ठेऊन आहे, मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाचे दौरे देखील केले आहेत, शेतकर्यांच्या नुकसानीसंदर्भात सरकार सभागृहात निवेदन देईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या निवडीबद्दल अभिनंदन प्रस्ताव मांडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचं अभिनंदन केलं.

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ हजार ८२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. यावर २२ आणि २३ ऑगस्ट रोजी चर्चा होऊन मतदान होईल अशी घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.

महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुधारणा विधेयक, महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक, आणि मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक विधानसभेत मांडण्यात आलं.

विधानपरिषदेत देखील कामकाज सुरु झाल्यानंतर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला.

दरम्यान, अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी विधीमंडळासमोर सरकारविरोधात आंदोलन केलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष सदस्यांनी ईडी सरकार म्हणून जोरदार घोषणाबाजी केली.

****

राज्यात स्वराज्य महोत्सवाअंतर्गत आज समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आलं. राज्यात सर्वत्र नागरीकांनी या उपक्रमात उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला. विधीमंडळात पावसाळी अधिवेशनन सुरु झाल्यावर सर्व नेत्यांनी सामुहिक राष्ट्रगीत गायन केलं.

धुळे, सोलापूर, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये तसंच जिल्ह्यात इतर सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये सर्व कर्मचार्यांनी सामूहिक राष्ट्रगीत गायल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातल्या सुकळी गावात शेतकरी, शेतमजुरांनी सामूहिक राष्ट्रगीत गायन करून शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०८ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २५ लाख ९० हजार ५५७ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०८ कोटी ५७ लाख १५ हजार २५१ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या नऊ हजार ६२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १५ हजार २२० रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख पाच हजार ५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

तालुकास्तरावरील आरोग्य पायाभूत सेवा बळकट करण्यासाठी आणि लोककेंद्रीत आरोग्य सेवा शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या निधीचा योग्य वेळी वापर करावा, असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांची त्यांनी काल बैठक घेतली. या बैठकीत केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आणि कोविड 19 राष्ट्रीय लसीकरण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

****

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याच्या दरात जुलै महिन्यात किंचित घसरण होऊन तो १३ पूर्णांक ९३ शतांशांवर आल्याचं अनुमान आहे. जून २०२२ मधे हा दर १५ पूर्णांक १८ शतांश टक्के इतका होता. अन्नधान्य, तयार खाद्यपदार्थ, कारखान्यात तयार झालेल्या वस्तू यांच्या दरात घट झाली तर इंधन, रसायनं, आणि खनिजांच्या किमतीत वाढ नोंदवली गेली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

अहमदनगर - नगर पुणे महामार्गावर रांजणगाव औद्योगिक वसाहतीजवळ कंटेनर आणि शाळेच्या बसमध्ये झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. अहमदनगर जिल्ह्यातल्या आव्हाने गावचे रहिवासी, लग्नासमारंभासाठी पनवेल इथं जात असताना आज पहाटे हा अपघात झाला.

****

हवामान

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात बहुतांश ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

//*********//

No comments:

Post a Comment