Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 17
August 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ ऑगस्ट २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
तीन
लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदत पीक कर्जाच्या व्याजावर केंद्राकडून दीड टक्का अनुदान
जाहीर.
·
विधिमंडळाच्या
पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर.
·
स्वराज्य
महोत्सवांतर्गत राज्यभरात सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात नागरिकांचा उत्स्फुर्त
सहभाग.
आणि
·
रेल्वे
प्रवासात बालकांच्या तिकीट प्रक्रियेत काहीही बदल नाही-रेल्वे मंत्रालयाचा खुलासा.
****
तीन लाख रुपयांपर्यंतच्या
अल्पमुदत पीक कर्जाच्या व्याजावर दीड टक्का अनुदान देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं
आज मंजुरी दिली. नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे,
सरकार कर्ज देणाऱ्या संस्थांना चौतीस हजार आठशे छप्पन्न कोटी रुपये उपलब्ध करून देईल.
****
राज्य
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री
आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या.
यावर येत्या २२ आणि २३ ऑगस्टला चर्चा होऊन मतदान होईल अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल
नार्वेकर यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांनी विविध अध्यादेश
तसंच विधेयकं सभागृहात मांडली.
काँग्रेसकडून
नाना पटोले यांनी पूर परिस्थितीवर चर्चेची मागणी केली, त्यावर, विरोधी पक्षाच्या उद्याच्या
प्रस्तावात याचा समावेश करण्याची सूचना अध्यक्षांनी त्यांना केली. राज्यातल्या पूरस्थितीवर
राज्य सरकारचं पूर्ण लक्ष असून लवकरच त्यावर विस्तृत निवेदन देऊ, असं आश्वासन उपमुख्यमंत्री
फडणवीस यांनी दिलं.
अधिवेशन
कालावधीतल्या विधानसभा तालिका अध्यक्षांची नावं आज जाहीर करण्यात आली. यामध्ये संजय
शिरसाट, कालिदास कोळंबकर, मनोहर चंद्रिकापुरे आणि शिरीष चौधरी यांचा समावेश आहे.
विधानपरिषदेत
उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेचे सभागृह नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची
नेमणूक झाल्याची घोषणा केली. विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांचा परिचय उपसभापतींनी
सभागृहाला करून दिला.
विधिमंडळाच्या
दोन्ही सदनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा
ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून दोन्ही
सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
दरम्यान,
विधानसभा परिसरात विरोधी पक्षाच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. ओला दुष्काळ जाहीर
करा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा, अशा घोषणा देतानाच विरोधकांनी सरकारच्या विरोधातही
घोषणा दिल्या.
****
शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत अध्यक्ष विनायक
मेटे यांच्या अपघाती मृत्यूची सी आय डी चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी दिले आहेत. मेटे यांचं १४ ऑगस्टला मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातात निधन
झालं होतं.
****
स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागानं सुरू केलेल्या
स्वराज्य महोत्सवात राज्यात आज सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात नागरिकांनी उत्स्फुर्त
सहभाग नोंदवला. विधिमंडळाच्या दोन्ही सदनात तसंच मंत्रालयात मुख्य प्रवेशद्वार आणि
त्रिमूर्ती प्रांगणात समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आलं. राज्यातल्या सगळ्या जिल्हाधिकारी
कार्यालयांमध्येही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहानं सामूहिक राष्ट्रगीत गायन केलं.
राज्यभरातल्या विविध शाळा आणि शासकीय, निमशासकीय तसंच खाजगी संस्थांमध्येही विद्यार्थी,
अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी उत्साहानं राष्ट्रगीताचं सामूहिक गायन केलं.
लातूरच्या
जिल्हा क्रीडा संकुलात सुमारे एक हजार नऊशे विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत गायन
केलं. यावेळी देशीकेंद्र विद्यालय आणि गोदावरी कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशाचा
नकाशा, तिरंगा आणि अमृत महोत्सव दर्शवणारी प्रतिकृती तयार केली होती.
नांदेड
इथं गुरु गोविंदसिंहजी क्रीडा संकुलावर सुमारे १५ हजार विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांनी
सामुहिक राष्ट्रगीत गायलं.
यवतमाळ
जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या सुकळी गावात शेतकरी आणि शेतमजुरांनी शेतशिवारात सामूहिक
राष्ट्रगीत गायन करून शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
****
देशामध्ये
२०२१-२२ या वर्षात अन्नधान्याचं उत्पादन तीनशे पंधरा दशलक्ष टनांपेक्षा जास्त होईल
असा अंदाज आहे. कृषी मंत्रालयानं या वर्षातल्या प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा अंदाज
आज जाहीर केला. २०२१-२२ वर्षाचं उत्पादन मागच्या पाच वर्षांच्या अन्नधान्याच्या सरासरी
उत्पादनापेक्षा पंचवीस दशलक्ष टनांनी जास्त आहे. भात, मका, हरभरा, कडधान्य, मोहरी,
तेलबिया आणि उसाच्या उत्पादनात विक्रमी वाढ अपेक्षित आहे.
****
गुलाम
नबी आझाद यांनी आज काँग्रेस पक्षांतर्गत सर्व पदांचा राजीनामा दिला. आझाद यांच्या राजीनाम्याच्या
कारणाबाबत स्पष्टपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही.
****
भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळ तसंच केंद्रीय निवडणूक समितीची
पुनर्रचना करण्यात आली आहे. जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखालच्या संसदीय मंडळात पंतप्रधान
नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह तसंच गृहमंत्री अमित शहा यांच्यासह कर्नाटकचे
माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, माजी मंत्री सर्वानंद सोनोवाल, आदींचा समावेश
केला असून, निवडणूक समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र
यादव तसंच खासदार ओम माथूर यांचा समावेश करण्यात आला आहे.
****
कोविड
प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत देशभरात लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची
एकूण संख्या २०८ कोटी ७५ लाखांच्या वर गेली आहे. त्यातल्या १२ कोटी ६० लाखांपेक्षा
जास्त लाभार्थ्यांनी वर्धक मात्रा घेतली आहे. राज्यात आतापर्यंत दिलेल्या मात्रांची
एकूण संख्या १७ कोटी ४७ लाखाच्या वर गेली आहे. त्यातल्या ७४ लाख ५० हजारापेक्षा जास्त
लाभार्थ्यांनी वर्धक मात्रा घेतली आहे.
****
थोर
क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांची आज पुण्यतिथी आहे. ब्रिटिश पोलिस अधिकारी कर्झन वायली
याची धिंग्रा यांनी १ जुलै १९०९ ला गोळी मारून हत्या केली. याबद्दल ब्रिटिशांनी त्यांना
१७ ऑगस्ट १९०९ ला मृत्युदंड दिला होता.
****
रेल्वे प्रवासात बालकांच्या तिकीट प्रक्रियेत काहीही बदल केला
नसल्याचा खुलासा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. पाच वर्षाच्या आतल्या बालकांसाठी
स्वतंत्र आसन नको असल्यास, त्यांना तिकीट आकारलं जाणार नाही. मात्र अशा बालकांसाठी
स्वतंत्र आसन आरक्षित केल्यास, त्यासाठी पूर्ण तिकीट आकारलं जातं. हा नियम पूर्वीपासून
लागू असल्याचं, रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. एक ते चार वर्षं वयाच्या बालकांना रेल्वे
प्रवासासाठी तिकिटं घ्यावी लागतील, अशा आशयाच्या बातम्या भ्रामक असल्याचंही मंत्रालयानं
म्हटलं आहे.
****
राजकीय
पक्षांना निवडणुकीत आश्वासन देण्यापासून रोखता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं
म्हटलं आहे. निवडणूक काळात मोफत योजनांच्या घोषणांना स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या
याचिकेवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान, यासंदर्भात एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्याच्या
मागणीचा याचिकाकर्त्यानं पुनरुच्चार केला. त्यावर, समिती स्थापन करण्याबाबत सगळ्या
पक्षकारांनी शनिवारपर्यंत आपआपल्या सूचना द्याव्यात, असे निर्देश दिले. आम आदमी पक्षानं
सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत, अशी समिती स्थापन करण्याला यापूर्वीच
विरोध दर्शवला आहे.
****
येत्या रविवारी, एकवीस ऑगस्टला, बी.एड. आणि हॉटेल मॅनेजमेंट
अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा तसंच राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार आहे. जे
विद्यार्थी या दोन्ही परीक्षा देणार आहेत, त्यांनी सीईटी सेलला यासंदर्भात इमेलद्वारे
अर्ज करावा, त्यांना सीईटी परीक्षेची तारीख बदलून दिली जाईल, अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधीमंडळात केली. अशा विद्यार्थ्यांनी
maharashtra.cetcell@gmail.com या आयडीवर इमेल करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment