Thursday, 18 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 18.08.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 August 2022

Time 01.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १८ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसर्या दिवशी देखील विरोधकांनी विधीमंडळाबाहेर सरकार विरोधात घोषणाबाजी केली. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यांना मदतीची मागणी यावेळी करण्यात आली.

बीड जिल्ह्यातल्या बक्करवाडी इथं गर्भपात करताना महिलेचा झालेल्या मृत्यूप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून, हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल, असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितलं. बीड जिल्ह्यात पुन्हा सर्व गर्भलिंग निदान केंद्रांची तपासणी करण्यात आली असल्याचं ते म्हणाले.

बीड जिल्ह्यात आंबाजोगाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या अवैध व्यवसाय प्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षक दोषी आढळल्यानं त्यांना निलंबित करण्यात आल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

राज्यातल्या परिचारिकांच्या वेतनासाठी किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश विभागाला दिले जातील, अशी माहितीही आरोग्यमंत्री सावंत यांनी दिली.

मुंबई - गोवा महामार्ग पुढच्या वर्षअखेरपर्यंत पूर्ण करू असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत दिलं. या विषयावर सुनील प्रभू यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर चर्चेदरम्यान ते बोलत होते.

****

अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मुद्दा काँग्रसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत उपस्थित केला. विरोधी पक्षाच्या प्रस्तावात यावर चर्चा करा असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यात दोन अर्भकांचा झालेला मृत्यू, दुर्गम भागात नसलेले रस्ते हे मुद्दे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केले. राज्य शासन अशा घटनांवर गंभीर असून, आदिवासी भागात असे मृत्यू होणार नाही, दुर्घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

****

गोंदिया जिल्ह्यातल्या एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी सर्व कामकाज बाजूला ठेवून तातडीने चर्चा करावी ही मागणी करणारा स्थगन प्रस्ताव फेटाळल्यामुळे विरोधकांनी आज विधानपरिषदेत गदारोळ केला.  त्यामुळे सभागृहाचं कामकाज दोनदा स्थगित करावं लागलं. हा स्थगन प्रस्ताव मांडताना शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी या प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा झाल्याचा आरोप केला. या विषयावर सरकार चर्चेला तयार असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

****

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आठ युट्यूब चॅनलवर बंदी आणली आहे. राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित चुकीची माहिती पसरवल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. मंत्रालयानं एक फेसबूक अकाउंट आणि दोन फेसबूक पोस्ट देखील ब्लॉक केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०८ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३८ लाख ६४ हजार ४१७ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०८ कोटी ९५ लाख ७९ हजार ७२२ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या १२ हजार ६०८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १६ हजार २५१ रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख एक हजार ३४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक संचालनालयानं मास्क वापराच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास बजावलं आहे. संपूर्ण विमान प्रवासादरम्यान प्रवासी मास्क योग्य रितीने वापरत आहेत, तसंच स्वच्छतेचे नियम पाळत आहेत याची खातरजमा विमान कंपन्यांनी करुन घ्यावी, तसंच निर्देशांचं पालन न करणार्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्यात येऊ शकते, असं संचालनालयानं म्हटलं आहे.

****

लातूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये उद्या गोपाळकाल्यानिमित्त सुटी जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालयं, जिल्ह्यातली कोषागारे, महामंडळाची कार्यालये आणि इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना सुटी लागू राहील, असं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी जारी केलेल्या अधिसुचनेत नमुद केलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ ऑगस्टला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ९२वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन, किंवा नमो ॲप आणि माय जीओव्ही ओपम फोरमवर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज झिम्बाब्वेमधल्या हरारे इथं खेळला जात आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

****

No comments:

Post a Comment