Friday, 19 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 19.08.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 August 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १९ ऑगस्ट २०२ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यभर दहीहंडीचा उत्साह; जखमी गोविंदांवर शासकीय वैद्यकीय रुग्णालयांत मोफत उपचार.

·      औरंगाबाद जिल्ह्यात पाझर तलाव दुरूस्तीला प्राधान्य - केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांची सूचना.

·      बीड जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद-राज्यपालांचे गौरवोद्गार.

·      कृषी मंत्री अब्दुल सत्तार येत्या रविवारी नांदेड तसंच लातूर जिल्हा दौऱ्यावर.

आणि

·      तीन दिवसीय अंबाजोगाई साहित्य संमेलनाला जागर दिंडीने प्रारंभ.

****

राज्यभर दहीहंडीचा उत्साह पहायला मिळत आहे. राज्य सरकारने दहीहंडीसह सार्वजनिक सण निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे गोविंदांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भक्ती आणि चैतन्याचा हा उत्सव प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येवो अशा शब्दात देशवासियांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या.

मुंबईत आज दिवसभर दहीहंडीचा जल्लोष दिसून आला. ठाण्यातील टेंभीनाका इथल्या दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. त्यांनी गोविंदांना शुभेच्छा दिल्या. गिरगाव इथल्या दहीहंडीत आदित्य ठाकरे सहभागी झाले होते.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळीच्या जांबोरी मैदानात मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार संपवण्याचा संकल्प करणारी दहिहंडी मुंबई भाजपतर्फे फोडण्यात आली.

शिर्डी इथं श्री साईबाबा संस्थानतर्फे गोपालकाला कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं. त्यानंतर दुपारी समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, विश्वस्त अॅड.सुहास आहेर यांच्यासह इतर अधिकारी, पुजारी, कर्मचारी, तसंच साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****

दरम्यान, राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडीचा उत्सवात कोणत्याही गोविंदाला दुखापत झाल्यास शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्याबाबतचे शासन निर्णय नगरविकास, वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागानं आज तातडीनं जारी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा काल विधानसभेत केली होती. नगरविकास विभागातर्फे राज्यातल्या सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या दवाखान्यात निःशुल्क उपचार देण्यात येतील, अशा सूचना या शासन निर्णयात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. हा शासन निर्णय स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहणार आहे.

****

प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवर निर्मिती योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्वच पाझर तलाव दुरूस्तीची कामं प्राधान्यानं करण्याच्या सूचना केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिल्या. ते आज औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात अमृत सरोवर योजना आणि आदर्श संसद ग्रामयोजनेच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

तलाव दुरूस्ती बरोबरच नवीन तलाव निर्मितीचे काम या योजनेतंर्गत करण्यात यावे. तलावाच्या दुतर्फा सामाजिक वनीकरणाच्या सहाय्याने वृक्ष लागवड करण्यात यावी. सातारा गावातील दरीची भिंत बांधण्यासाठी संबंधितांनी तातडीने पाहणी करावी असे निर्देशही यावेळी कराड यांनी दिले. आदर्श संसद ग्राम योजनेतंर्गत जिल्ह्यातल्या बाळापूर, जरुळ, वडनेर, खिर्डी, रांजणगाव पोळ, वनगाव या सहा गावांमध्ये प्राथमिक गरजांबरोबरच अद्ययावत सर्व सोईसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करा जेणेकरुन या गावांचा समावेश पंतप्रधान यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात व्हावा, अशी अपेक्षा कराड यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्ह्यात अमृत सरोवर अभियानांतर्गत १०३ तलावांची कामं प्रस्तावित करण्यात आली असल्याचं डॉ.भागवत कराड यांनी सांगितलं.

****

बीड जिल्ह्यात माजी सैनिकांसाठी सुरू असलेले काम आणि क्षयरोग निर्मूलनासाठी होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. अंबाजोगाई इथं वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यपाल कोश्यारी यांना यावेळी पोलीस पथकाकडून मानवंदना देण्यात आली. जिल्ह्यात माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या कामाची तसंच क्षयरोग निर्मूलनासाठी जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या कामांची माहिती जिल्हाधिकारी शर्मा यांनी योवळी दिली.

त्यापूर्वी राज्यपालांनी योगेश्वरी देवीचं दर्शन घेतलं, देवल कमिटीच्या वतीनं राज्यपालांचा सत्कार करण्यात आला. राज्यपालांनी सायंकाळी परळी इथं वैद्यनाथाचं दर्शन घेऊन दुग्धाभिषेक केला.

दरम्यान, राज्यपाल उद्या सकाळी सव्वा दहा वाजता लातूर इथं जाणार असून त्यानंतर जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड यांचे अधिकारी आणि रेड क्रॉस सोसायटीचे अधिकारी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.

****

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार येत्या रविवारी नांदेड तसंच लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. रविवारी सकाळी दहा वाजता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची मराठवाडा विभागीय आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर नांदेड तालुक्यातील विष्णुपूरी, कासारखेडा, गौजेखेडा येथील अतिवृष्टीग्रस्त भागाची आणि पिकांची पाहणी करणार आहेत. दुपारी साडे बारा वाजता लोहा तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून ते लातूरकडे प्रयाण करणार आहेत. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा आणि औसा तालुक्यातल्या एरंडी तसंच जयनगर या गावातल्या शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करणार आहेत.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०९ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३१ लाख ५२ हजार ८८२ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०९ कोटी २७ लाख ३२ हजार ६०४ मात्रा देण्यात आल्या आहेत.

****

तीन दिवसीय अंबाजोगाई साहित्य संमेलनाला आजपासून सुरवात झाली. कविवर्य डॉ. दासू वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संमेलनाला आज सकाळी जागर दिंडी काढण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते डॉ. दिलीप घारे, प्रख्यात कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर, यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या साहित्य संमेलनाची संकल्पना “अनिवासी अंबाजोगाईकर” अशी असून या संमेलनात साहित्य, कविता, संगीत, शिक्षण, पत्रकारिता, आरोग्य, सामाजिक आदि क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन अंबाजोगाई शहराचा इतर क्षेत्रात नावलौकिक वाढवणारे अनिवासी अंबाजोगाईकर सहभाग झाले आहेत. शहरातील टी. बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात भरलेल्या या साहित्य संमेलनात कला आणि ग्रंथ प्रदर्शन, पुरस्कार वितरण, कवी संमेलन आणि कथा संमेलन होणार आहे.

****

नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विपीन इटनकर यांनी आज पदभार स्वीकारला. मावळत्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. इटनकर यांनी आर. विमला यांना पुणे इथल्या बाल कल्याण विभागात आयुक्त पदावर नियुक्तीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. विपीन इटनकर हे नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.

****

महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेचं परभणी जिल्ह्यात सोमवारपासुन आगमन होणार आहे. जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर स्टार्टअप यात्रेमध्ये सहभाग नोंदवून जिल्हास्तरावर आपल्या नवसंकल्पनांचे सादरीकरण करण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त प्र.सो.खंदारे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केलं आहे. महाराष्ट्र राज्य स्टार्टअप यात्रेमध्ये सहभाग नोंदविलेल्या उमेदवारांचे ८ सप्टेंबर रोजी एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येणार आहे.

****

धुळे तालुक्यातल्या अजंग शिवारात पोलिसांच्या पथकानं काल रात्री १७ लाख रुपयांच्या बायोडिझेलची अवैधरित्या वाहतूक करण्याऱ्या टँकर पकडले. याप्रकरणी टँकर चालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. साक्री ग्रामीण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रदीप मैराळे यांना बायोडिझेलची टँकरद्वारे अवैध वाहतुक केली जात असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

****

No comments:

Post a Comment