Friday, 19 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 19.08.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 August 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीच्या विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर विधानसभेत चर्चा सुरु; शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी धोरणं राबवण्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी  

·      महिला सुरक्षेशी संबंधित शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे सरकारला निर्देश

·      दहिहंडीला साहसी खेळाचा दर्जा तर गोविंदांना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

·      वीज सबसिडी लाटणाऱ्या उद्योगांची चौकशी करुन कारवाई करण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन

·      अंबाजोगाईच्या अवैध गुटखा प्रकरणी पोलीस निरिक्षक वासुदेव मोरे निलंबित तर पोलिस उपअधीक्षकाची अकार्यकारी पदावर बदली

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे दोन हजार २४६ रुग्ण, मराठवाड्यात ३३ बाधित

आणि

·      झिंबाब्वे विरुद्धचा पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं जिंकला

 

सविस्तर बातम्या

राज्यातल्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी धोरणे राबवा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी विरोधी पक्षांच्या वतीने विधानसभेत प्रस्ताव दाखल कर्‍ण्यात आला, त्यावर अजित पवार बोलत होते. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकर्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी दीड लाख रुपये मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. राज्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याकडे त्यांनी सदनाचं लक्ष वेधलं. माजी मंत्री अशोक चव्हाण, बच्चू कडू यांच्यासह अन्य आमदारांनी या चर्चेत सहभाग घेतला.

दरम्यान, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी ही मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी काल विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही लावून धरली. ही मागणी करताना या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली.

****

महिला सुरक्षेशी संबंधित शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सरकारला दिले आहे . गोंदिया इथल्या महिला अत्याचाराच्या प्रश्नावर लवकरात लवकर तपशीलवार चर्चा घेतली जाईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं. सर्व कामकाज बाजूला ठेवून याप्रकरणी तातडीनं चर्चा करावी अशी मागणी करणारा स्थगन प्रस्ताव फेटाळल्यामुळे, विरोधकांनी काल विधानपरिषदेत गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज प्रत्येकी दहा मिनिटांसाठी दोनदा स्थगित करावं लागलं होतं. उपसभापती जेव्हा सांगतील तेव्हा या विषयावर सरकार चर्चेला तयार आहे, असं सरकारच्या वतीनं, विधीमंडळ कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. राज्यातल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तुकड्यांना त्रुटी पूर्ततेनंतर अनुदान मंजूर करण्याच्या प्रश्नावरून, विरोधी पक्ष सदस्य आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांमध्ये विधान परिषदेत खडाजंगी झाली. त्यामुळे झालेल्या गदारोळामुळे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.

****

राज्यातल्या ग्रंथालयांच्या अनुदानात ६० टक्क्यांनी वाढ करणार असल्याची माहिती, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य अभिजित वंजारी यांनी, ग्रंथालयांना थकीत अनुदानाची रक्कम वितरित करण्यासह, ग्रंथालयातल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रंथालयांना प्रोत्साहन देण्यासाठी तसंच ग्रंथालयांबाबतच्या त्रुटी आणि कठोर निकष बदलण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली असून, त्यासाठी सर्वांनी सूचना पाठवाव्यात, असं आवाहन पाटील यांनी केलं. राज्यात नवीन ग्रंथालयांना परवानगी देण्यासाठी सुधारित नियमावली तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या परिविक्षाधीन सहायक शिक्षक - शिक्षण सेवक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव, शासनाच्या विचाराधीन असून, याबाबत राज्य शासनामार्फत उच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितलं. यासंबधी डॉ. सुधीर तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणं कार्यवाही करण्यात येईल, असं केसरकर यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर झालं. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, संयुक्त जनता दल, महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांचा समावेश असणाऱ्या उपसमितीनं, वस्तू आणि सेवा कर- जीएसटीमध्ये होणारी चोरी रोखण्यासाठी पॅकेजमधल्या वस्तूंवर हा कर आकारण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे विरोधकांनी तो दोष कोणालाही देऊ नये, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमूद केलं. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. आता यासंबंधी दुरुस्तीमुळे कलम ४१ मध्ये बदल करून अंतिम करच आकारला जाईल, परतावा मिळेपर्यंत जो कर लागायचा तो आता लागणार नाही, परतावा मिळण्यासाठी सरसकट दोन वर्षांची वेळ अंतिम केली असल्याचंही, फडणवीस म्हणाले.

****

दहिहंडीला साहसी खेळाचा दर्जा तसंच गोविंदांना सरकारी नोकरीत सवलत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.

 

Byte….

कबड्डीला राजाश्रय आहे, कबड्डीला काही नियम आहेत, निकष आहेत, हे सर्व नियम या गोविंदा खेळाला देखील उत्सवाला देखील मिळतील, याचे लाभ मिळतील. त्याचबरोबर नोकरी मध्ये देखील पाच टक्के आरक्षण जे आहे, त्याच्यामध्ये देखील या गोविंदा पथकाचा समावेश होईल. आणि एकंदरीत या साहसी खेळाचे महत्व वाढेल, यासाठी शासनानं हा निर्णय घेतला आहे. आणि पुढच्या वर्षापासून प्रो कबड्डी च्या धरतीवर प्रो गोविंदा हा देखील एक खेळ सुरू होईल.

 

महाराष्ट्राची  सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहिहंडीच्या "प्रो गोविंदा" या व्यावसायिक स्पर्धा घेण्याचीही घोषणा काल मुख्यमंत्री  शिंदे यांनी विधानसभेत केली. आमदार प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी दहिहंडी -गोविंदा या उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करून स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं सांगितलं. बक्षिसाची रक्कम शासनामार्फत दिली जाईल, त्याचबरोबर खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू झाला किंवा जखमी झाल्यास मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चा झाली. यात पथकातील खेळाडूचा पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास १० लाख रुपये, महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास साडे सात लाख रुपये तर एक अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास पाच लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य करण्यात येईल. हा आदेश केवळ या वर्षीसाठीच असून यासाठी काही अटी आणि शर्ती लागू असणार आहेत.

****

वीज सबसिडी लाटणाऱ्या उद्योगांची चौकशी करुन कारवाई करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत दिलं. जालना इथल्या काही स्टील उद्योगांनी राज्य शासनाची कोट्यवधी रुपयांची सबसिडी लाटल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. काही उद्योगांनी कंपनीचं नाव बदलून वीज सबसिडी लाटल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येईल, जे दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून वसुली केली जाईल, तसंच उत्पादन न करता नियमबाह्य सबसिडी दिली असल्यास संबंधितांवरही कार्यवाही केली जाईल, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

****

अंबाजोगाई इथले पोलीस निरिक्षक वासुदेव मोरे यांचं निलंबन करण्यात येत असून, पोलिस उप अधीक्षक सुनील जायभाये यांची अकार्यकारी पदावर बदली करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. अवैध गुटखा प्रकरणासंदर्भात ही कारवाई करण्यात आली. आमदार नमिता मुंदडा यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता.

****

राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या वर्ग खोल्यांच्या बांधकामाबाबत राज्यव्यापी बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असं ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत सांगितलं. सदस्य प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देतांना ते बोलत होते. राज्यातल्या जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावला आहे. मात्र काही ठिकाणी वर्ग खोल्यांची बांधणी आणि दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. मराठवाडा विभागातल्या जुन्या शाळांच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, त्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असंही महाजन यांनी सांगितलं.

****

विधानपरिषदेत परवानगी न घेता हातवारे करत मी मंत्री आहे, असं सांगत बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना, उपसभापती निलम गोऱ्हे यांनी खडसावलं. प्रश्नोत्तराच्या तासात शिक्षण मंत्री दीपक केसरकर उत्तर देताना विरोधकांकडून त्यांच्या उत्तरावर आक्षेप घेण्यात आला. त्यावर सभागृहात बसलेल्या गुलाबराव पाटील यांनी, मागील बऱ्याच गोष्टी काढता येतील, असं वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. पाटील बोलण्यासाठी उठले असता उपसभापतींनी त्यांना परवानगी नाकारली, त्यावर आपण मंत्री असल्यानं आपल्याला बोलू दिलं पाहिजे, असं पाटील यांनी म्हणल्यानंतर निलम गोऱ्हे यांनी त्यांना खडसावलं. परवानगी नसताना बोलणं ही सभागृहात वागण्याची पद्धत नाही, असं त्या म्हणाल्या.

****

रायगड जिल्ह्यात हरिहरेश्वर श्रीवर्धन किनाऱ्यावर आढळलेल्या एका १६ मीटर लांबीच्या संशयास्पद बोटीचा मुद्दाही काल विधीमंडळात चांगलाच गाजला. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केलं. सणासुदीचे दिवस लक्षात घेता या भागात अति दक्षतेचा इशारा देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. स्थानिक मच्छिमारांना ही बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत आढळून आली. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आली. या बोटीमध्ये तीन ए.के. रायफल्स, दारुगोळा तसंच बोटीशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. ही घटना निदर्शनास येताच तत्काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, सदर बोटीचं नाव ‘लेडीहान असून, तिची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉर्डरगन या महिलेची आहे, तिचा पती जेम्स हॉबर्ट हा सदर बोटीचा कप्तान असून, ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती. २६ जून रोजी या बोटीचं इंजिन निकामी झालं, त्यानंतर एका कोरिअन युद्ध नौकेनं बोटीवरच्या खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्त केलं. समुद्र खवळलेला असल्यानं ‘लेडीहान या बोटीचं टोईंग करता आलं नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्यावर लागली आहे, अशी माहिती भारतीय तट रक्षक दलाकडून देण्यात आली.

****

आधार कार्ड वर पाच लाख रुपयांचं कर्ज मिळत असल्याच्या वृत्ताचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे. अशा आशयाचा एक मजकूर सध्या सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत आहे. हे वृत्त पूर्णपणे खोटं असून, अशा वृत्तांना बळी पडू नका, असं आवाहन सरकारनं केलं आहे.

****


भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काल सद्भावना दिन पाळण्यात आला. मंत्रालयात पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासीयांना तसंच परदेशी राहणाऱ्या भारतीय नागरिकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान कृष्णाचं जीवन आणि शिकवणीत पुण्य आणि कल्याणाचा समावेश असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार २४६ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ७८ हजार ४११ झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला तर काल एक हजार ९२० रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख १८ हजार ५३५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ०२ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ११ हजार ६९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ३३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात लातूर जिल्ह्यातल्या ११, औरंगाबाद दहा, जालना सहा, तर बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश आहे.

****

औरंगाबाद इथं अग्नीवीर भरती दरम्यान काल एका तरुणाचा धावताना कोसळून मृत्यू झाला. कन्नड तालुक्यातल्या चापानेर इथला करण नामदेव पवार हा भरती दरम्यान धावताना मैदानावर कोसळला. त्याला पुढील उपचारासाठी घाटीत दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

****

झिंबाब्वे विरुद्धचा पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना काल भारतानं दहा गडी, १९ षटकं आणि एक चेंडू राखून सहज जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेल्या भारतीय संघानं झिंबाब्वेचा डाव ४० षटकं आणि तीन चेंडूमध्ये १८९ धावांवर संपुष्टात आणला. जलदगती गोलंदाज दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा आणि फिरकीपटू अक्षर पटेलनं प्रत्येकी तीन गडी बाद केले. प्रत्युत्तरात भारताच्या सलामीवीर शुभमन गिलनं ७२ चेंडुंमध्ये ८२ आणि शिखर धवननं ११३ चेंडुंमध्ये ८१ धावा करत हा सामना जिंकला. दीपक चहरला सामनावीरचा  पुरस्कार देण्यात आला. या विजयाबरोबरचं भारतानं तीन सामन्याच्या मालिकेत एक - शून्यनं आघाडी घेतली आहे.

****

No comments:

Post a Comment