Saturday, 20 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.08.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 August 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

गोविंदांना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय प्रशासनिक बाबी लक्षात न घेता भावनिक होऊन घेतला असल्याचं, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातल्या इतर उमेदवारांवर अन्याय होणार नाही का, याचा सारासार विचार राज्य सरकारने केला नाही, असा आरोप त्यांनी केला. कबड्डी, खोखो, फुटबॉल यासारख्या क्रीडा प्रकारांचे राज्य स्तरावर संघ असून, यामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं जातं, मात्र राज्यातल्या गोविंदांचे रेकॉर्ड ठेवण्याचं काम कसं करणार, गोविंदाच्या पथकाने जर पारितोषिक मिळवलं तर त्यातील कमी शिकलेल्या किंवा न शिकलेल्या मुलाला आपण कोणती नोकरी देणार आहात, असे प्रश्न पवार यांनी उपस्थित केले. 

****

वीज मीटरचं रिडींग घेताना हलगर्जीपणा करणाऱ्या ७६ संस्थांबरोबरचा करार महावितरणनं रद्द केला आहे. याला जबाबदार असणाऱ्या महावितरणच्या ४१ अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

दरम्यान, राज्यातल्या शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी आता महावितरणनं साखर कारखान्यांना साकडं घातलं आहे. सभासद शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिल वसुलीसाठी कारखान्यांनी पुढाकार घेतला नाही, तर कारखान्यांकडची शिल्लक वीज कमी दरानं खरेदी करण्याचा इशारा, महावितरणनं दिला आहे. राज्यातले बहुतेक साखर कारखाने सहवीज प्रकल्प चालवतात आणि उसाच्या पाचटापासून वीज बनवतात. ही वीज कारखाने चालवण्यासाठी वापरली जाते आणि शिल्लक वीज महावितरणला विकली जाते. या वीज खरेदी कराराचं यंदा नूतनीकरण होणार असून त्या पार्श्वभूमीवर महावितरणनं कारखान्यांना ही अट घातली आहे.

****

राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली. शिक्षकांच्या बदल्यांसाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअर मध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नसल्याचं या सॉफ्टवेअर प्रणालीचे प्रवर्तक आयुष प्रसाद यांनी सांगितलं.

****

कृषी मंत्री अब्दुल सत्तार उद्या नांदेड तसंच लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. उद्या सकाळी दहा वाजता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची मराठवाडा विभागीय आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर नांदेड तालुक्यातल्या विष्णुपूरी, कासारखेडा, गौजेखेडा इथल्या, अतिवृष्टीग्रस्त भागाची आणि पिकांची पाहणी करणार आहेत. दुपारी साडे बारा वाजता लोहा तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून ते लातूरकडे प्रयाण करणार आहेत. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा आणि औसा तालुक्यातल्या एरंडी तसंच जयनगर या गावातल्या शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करणार आहेत.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०९ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १३ लाख १५ हजार ५३६ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०९ कोटी ४० लाख ४८ हजार १४० मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या १३ हजार २७२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १३ हजार ९०० रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख एक हजार १६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या आठवड घाटात  लातूरकडून शिर्डी कडे जाणाऱ्या भाविकांच्या ट्रॅव्हल्स बसला काल रात्री अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जामखेड नगर रस्त्यावर आष्टी तालुक्यातला अंभोरा फाटा संपल्यानंतर लगेच अहमदनगर तालुक्याची हद्द सुरू होते. याच ठिकाणी सलग उतार असल्यानं अनेक वेळा वाहनं कठडा तोडून पलटी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घाटात वारंवार अपघात होत असल्यानं उपाययोजना करण्याची मागणी नागरीक करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्य शासनातर्फे महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेचं परभणी जिल्ह्यात सोमवारपासून आगमन होणार आहे. जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर स्टार्टअप यात्रेमध्ये सहभाग नोंदवून, जिल्हास्तरावर आपल्या नवसंकल्पनांचं सादरीकरण करण्याचं आवाहन, कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त, प्र. सो. खंदारे यांनी, प्रसिध्दीपत्रकाद्वारे केलं आहे. महाराष्ट्र राज्य स्टार्टअप यात्रेमध्ये सहभाग नोंदवलेल्या उमेदवारांसाठी आठ सप्टेंबर रोजी एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येणार आहे.

****

भारत आणि झिंबाब्वे दरम्यान दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना हरारे इथं खेळला जात आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारत एक - शून्यनं आघाडीवर आहे.

****

No comments:

Post a Comment