Saturday, 20 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.08.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 August 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० ऑगस्ट २०२ सायंकाळी ६.१०

****

·      हमरस्त्यावरचं पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्यासंदर्भात लातूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर केलेलं काम राज्य तसंच देशाला पथदर्शक - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं प्रतिपादन.

·      गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षणाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित.

·      औरंगाबाद स्मार्ट सिटी साठी उर्वरित २०६ कोटींचा निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचं आश्वासन.

आणि

·      ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोरडे यांच्या पाचोळा कादंबरीचा सुवर्ण महोत्सवी सन्मान सोहळा.

****

लातूर जिल्ह्यात हमरस्त्यावरचं पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्याचं प्रायोगिक तत्वावर केलेलं काम राज्याला आणि देशाला पथदर्शक होईल, असं प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं आहे. ते आज लातूर इथं शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रायोगिक तत्वावर शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेलं हे काम अधिक मोठ्या प्रमाणावर करण्याची सूचना राज्यपालांनी केली.

लातूर जिल्ह्यात सोयाबीनचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं, शिवाय इथेच त्यावर प्रक्रिया पण होते हे कौतुकास्पद असून, काळ्या सोयाबीनचाही प्रयोग या जिल्ह्यात करावा, असं राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. लातूर इथल्या उमंग इन्सिटट्यूट ऑफ ऑटीझम अँड मल्टीडिसॅबिलिटी रिसर्च सेंटरलाही राज्यपाल कोश्यारी यांनी भेट दिली. नावीन्यपूर्ण उमंग केंद्र उभं केल्याबद्दल कौतुक करून हे केंद्र जास्तीत जास्त प्रभावीपणे चालवण्यासाठी तसंच दिव्यांगाच्या कल्याणासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करावेत, असंही राज्यपालांनी सांगितलं.

लातूर दौऱ्यापूर्वी आज सकाळी राज्यपालांनी परळीजवळ गोपीनाथ गडावर जाऊन, दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं.

****

गोविंदांना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनिक बाबी लक्षात न घेता भावनिक होऊन घेतला आहे, मात्र असे निर्णय भावनिक होऊन घ्यायचे नसतात, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातल्या इतर उमेदवारांवर अन्याय होणार नाही का, याचा सारासार विचार राज्य सरकारनं केला नाही, असा आरोप त्यांनी केला. गोविंदांना नाउमेद करण्याचा आपला विचार नाही, मात्र अन्य क्रीडा प्रकारांप्रमाणे राज्यातल्या गोविंदांचे रेकॉर्ड कसं ठेवणार, गोविंदा पथकातल्या कमी शिकलेल्या मुलांना आपण कोणती नोकरी देणार, असे प्रश्न पवार यांनी उपस्थित केले. 

****

दरम्यान, माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही या मुद्यावर बोलताना, एखाद्या विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी भावनेच्या भरात निर्णय घेणं अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचं नाव उज्ज्वल केलेले खेळाडू अद्यापही शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, शासनाने प्रथम या खेळाडूंना न्याय द्यावा, असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलं. गोविंदांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णयाला आपला विरोध नाही, मात्र याबाबत कोणते निकष लावणार हा संभ्रम असल्याचंही भुजबळ म्हणाले.

****

औरंगाबाद स्मार्ट सिटी साठी केंद्र शासनाकडून उर्वरित २०६ कोटींचा निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी दिलं आहे. डॉ कराड आणि राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी आज औरंगाबाद इथं स्मार्ट सिटी कार्यालयात संयुक्त आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कलाग्राम इथं ग्लो गार्डन उभारण्यासाठी १० कोटी रुपये निधी तसंच स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र “लाईट हाऊस” इथून प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना मुद्रा योजना अंतर्गत ५० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवून देण्याची घोषणाही डॉ.कराड यांनी यावेळी केली. सहकार मंत्री सावे यांनी नागरिकांची तक्रार घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी सक्षम कॉल सेंटर उभारण्याची सूचना केली.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या शाळांचं डिजिटल शाळांमध्ये रुपांतर करण्यासाठी किमान १० डिजिटल वर्गांचं अंदाजपत्रक तयार करून सादर करण्यात यावं, असंही डॉ कराड यांनी सूचित केलं.

****

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्‌भावना दिवस म्हणून साजरी केली जाते. यानिमित्त्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन केलं जात आहे. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर असलेल्या राजीव गांधी यांच्या पुतळयास औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

****

विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात चापानेर, रामनगर इथं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतांची पाहणी केली. खरडून गेलेल्या शेतजमिनींना आगामी काळाचा विचार करून भरीव मदतीची तरतूद करण्याची गरज अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. पुरामुळे दगावलेली जनावरं, तसंच ढासळलेल्या विहिरींसाठीही मदत करण्याबाबत त्यांनी सूचना केली.

****

शपथपत्र किंवा करार करून संघटना मोठी होत नसते, असं शिवसेनेच्या शिंदे गटाचे औरंगाबाद इथले नेते राजेंद्र जंजाळ यांनी म्हटलं आहे, ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. बाळासाहेबांचे विचार ज्यांच्या मनात आहेत, ते शिंदे गटासोबत जोडले जात आहेत. आगामी निवडणुकीत सर्व सामान्य जनतेच्या सुखदुखात सहभागी होणाऱ्या नवीन चेहऱ्यांना आपल्या गटाकडून संधी दिली जाणार असल्याचं जंजाळ यांनी सांगितलं.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरणाने २०९ कोटींहून अधिक लसमात्रांचा टप्पा पार केला आहे. दोन कोटी ७८ लाख ३४ हजारावर लसीकरण सत्रांतून हे सुमारे २०९ कोटी, ४० लाख, ४८ हजार १४० लसमात्रा देण्यात आल्या आहेत. १२ ते १४ वर्षे वयोगटातील किशोरांपैकी तीन कोटी ९९ लाख मुलांना कोविड प्रतिबंधात्मक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

****

सागरी मार्गाने येऊन मुंबईत हल्ला करण्याची धमकी देणारा संदेश आज मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला आला. या संदेशामुळे सर्व यंत्रणा सावध झाल्या आहेत. हा संदेश नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाकिस्तानी दूरध्वनी क्रमांकावरून आल्याचं निष्पन्न झालं आहे. २६/११ सारखा हल्ला करणार असल्याचं या धमकीमधे म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथक, गुप्तचर यंत्रणा, मुंबई पोलिसांसह अन्य यंत्रणांकडून कसून तपास तपास सुरू करण्यात आला आहे.

****

ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोरडे यांच्या बहुचर्चित पाचोळा कादंबरीचा सुवर्ण महोत्सवी सन्मान सोहळा आज औरंगाबाद इथं साजरा करण्यात आला. एमजीएम अभिमत विद्यापीठाच्या रुख्मिणी सभागृहात झालेल्या या सोहळ्याचं उद्घाटन ९५ वा व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते झालं. सभोवतीच्या घटनांमुळे लेखक करुणा प्रेरित होतो. तेव्हा त्या करुणेतून विशेष कलाकृती जन्माला येत असते. यामुळेच पाचोळा ही कांदबरी आपल्याला पन्नास वर्षानंतरही चर्चा करण्यासाठी भाग पाडत असल्याचं सासणे यावेळी म्हणाले.

यावेळी परिसंवाद, अभिवाचनासह अनेक कार्यक्रम घेण्यात आले. बोराडे यांच्या या कादंबरीवर अनेक मान्यवरांनी आपापली मतं व्यक्त केली. युवा कादंबरीकार सुनिता बोरडे, मेधा पाटील, प्रसाद कुमठेकर, सुशील धसकटे, संतोष जगताप यांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

****

अंबाजोगाई साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर परिसंवाद आणि चर्चासत्रात अनेक मान्यवर सहभागी झाले. अंबाजोगाईचे अनिवासी पत्रकार, अंबाजोगाई परिसरातील शेती आणि शेतकरी, मान्यवरांच्या मुलाखती यासह माहेरवाशिणींचा परिसंवादही आज पार पडला. संमेलनाध्यक्ष दासू वैद्य यांच्या साहित्यावरील परिसंवादात विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. अनिवासी अंबाजोगाईकर या संकल्पनेवर आधारित या संमेलनाचा उद्या समारोप होणार आहे.

****

कृषी संस्कृतीशी महिलांचं असणारं नातं सांगणारा बंजारा बांधवांचा तीज उत्सव राज्यात उत्साहाने साजरा होत आहे. श्रावण महिन्यातील राखी पौर्णिमेपासून या दहा दिवसीय तीज उत्सवाला सुरुवात होते, बांबूपासून बनवलेल्या परडीमध्ये वारुळाची माती आणून त्यात गहू पेरले जातात. त्यानंतर पारंपरिक गाणे आणि नृत्य करत हा उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो. सध्या ठिकठिकाणच्या तांड्यांवर बंजारा लोकगीतांचे स्वर घुमत असल्याचं आमच्या वाशिमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Post a Comment