Saturday, 20 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.08.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 August 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      स्वच्छता आणि जलसुरक्षा क्षेत्रात देशाचं मोठं यश-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

·      विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास युजीसीची मान्यता

·      कोविड निर्बंधामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर राज्यभर दहीहंडीचा उत्साह

·      औरंगाबाद जिल्ह्यात पाझर तलाव दुरूस्तीला प्राधान्य देण्याची केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची सूचना

·      अतिवृष्टीने बाधित एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये-कृषीमंत्री अब्दुल सत्तार 

·      राज्यात कोविडचे नवे दोन हजार २८५ रुग्ण; बीए टू पॉईंट सेव्हन फाईव्हच्या रुग्णसंख्येत वाढ

आणि

·      तीन दिवसीय अंबाजोगाई साहित्य संमेलनाला कालपासून प्रारंभ

****

सविस्तर बातम्या

देशानं स्वच्छता आणि जलसुरक्षा क्षेत्रातही मोठं यश मिळवलं असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल गोव्यात साजऱ्या झालेल्या जलजीवन अभियानाच्या हर घर जल उत्सवात, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते. देशाच्या ग्रामीण भागातली १० कोटी घरं ही जलवाहिनीद्वारे पुरवलेल्या स्वच्छ पाणीपुरवठ्यानं जोडली जाणं, हे या योजनेचं एक मोठं यश आहे, असंही पंतप्रधान म्हणाले. या योजनेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी गोव्याचं अभिनंदन केलं, तर या योजनेत केंद्रशासीत प्रदेशात प्रथम क्रमांकावर असलेल्या दीव दमणचाही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. या योजनेत लवकरच आणखी ३० कोटी घरं जोडली जाणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

****

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी पदविका आणि पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास, विद्यापीठ अनुदान आयोगानं मान्यता दिली आहे. हा नियम शैक्षणिक वर्ष २०२२ पासून लागू करण्यात येत आहे. एकाच वेळी अनेक कौशल्य संपादन करण्यासाठी तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांना दोन पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण एकाच वेळी घेण्याची परवानगी नव्हती, मात्र आता एकाचवेळी दोन पूर्ण वेळ अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याला दुसऱ्या विषयाच्या पदवी अभ्यासक्रमाची ही निवड करता येईल, विद्यापीठ अनुदान आयोगानुसार विषय निवडण्याची कोणतीही सक्ती विद्यार्थ्यावर नसेल, हा निर्णय डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लागू आहे. परंतू, पीएचडी आणि एम. फिल. पदवीसाठी हा निर्णय लागू नसल्याचं आयोगानं म्हटलं आहे.

****

राज्यभर दहीहंडीचा उत्साह काल पहायला मिळला. राज्य सरकारने दहीहंडीसह सार्वजनिक सण निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे गोविंदांचा आनंद द्विगुणित झाल्याचं दिसून आलं. ठाण्यात टेंभीनाका इथल्या दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. त्यांनी गोविंदाना शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळीच्या जांबोरी मैदानात मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार संपवण्याचा संकल्प करणारी दहिहंडी मुंबई भाजपतर्फे फोडण्यात आली. गिरगाव इथल्या दहीहंडीत शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे सहभागी झाले होते.

****

औरंगाबाद शहरात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी गुलमंडी, औरंगपुरा, कोकणवाडी चौक, कॅनॉट, बजरंग चौक, निराला बाजार आदी ११ ठिकाणी दहीहंडी लावण्यात आली होती. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा दहीहंडी उत्सव साजरा करता आल्यानं गोविंदांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला.

****

दरम्यान, राज्यभरात दहीहंडीचा उत्सवात कोणत्याही गोविंदाला दुखापत झाल्यास शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्याबाबतचे शासन निर्णय, नगरविकास, वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागानं काल तातडीनं जारी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा परवा विधानसभेत केली होती. नगरविकास विभागातर्फे राज्यातल्या सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या दवाखान्यात निःशुल्क उपचार देण्यात येतील, अशा सूचना या शासन निर्णयात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. हा शासन निर्णय स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहणार आहे.

काल सायंकाळपर्यंत मुंबईत विविध ठिकाणी १११ गोविंदा जखमी झाले. यापैकी ८८ जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं, २३ जणांवर उपचार सुरू असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कलवलं आहे.

****

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व परवानग्या गणेशोत्सव मंडळांना देण्यात येतील, त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना अनेक ठिकाणी हेलपाटे घालण्याची गरज पडणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल भिवंडीत बोलत होते. राज्यात सर्वसामान्य नागरिकांचं सरकार अस्तित्वात आलं असून, यापुढे सर्व सण उत्सव हे उत्साहात आणि जोमाने साजरे करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

****

बीड जिल्ह्यात माजी सैनिकांसाठी सुरू असलेलं काम आणि क्षयरोग निर्मूलनासाठी होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. अंबाजोगाई इथं वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसोबत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यपाल कोश्यारी यांना यावेळी पोलीस पथकाकडून मानवंदना देण्यात आली.

राज्यपालांनी योगेश्वरी देवीचं दर्शन घेतलं, देवल कमिटीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. राज्यपालांनी सायंकाळी परळी इथं वैद्यनाथाचं दर्शन घेऊन दुग्धाभिषेक केला.

दरम्यान, राज्यपाल आज सकाळी सव्वा दहा वाजता लातूर इथं जाणार असून, त्यानंतर जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे अधिकारी आणि रेड क्रॉस सोसायटीचे अधिकारी यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत.

****

दिल्ली सरकारच्या नव्या अबकारी धोरणात नियमांचं उल्लंघन आणि प्रक्रियेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्याविरुद्ध केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयनं प्रथम माहिती अहवाल - एफआयआर दाखल केला आहे. त्यामधे अबकारी अधिकारी, मद्य कंपन्यांचे अधिकारी, अज्ञात लोकसेवक आणि इतर अशा १४ व्यक्तींचा समावेश आहे. याप्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी केली होती. सीबीआयनं काल सिसोदिया यांच्या निवासस्थानासह विविध ठिकाणी छापे टाकले. सत्य लवकर बाहेर यावं यासाठी आपण पूर्ण सहकार्य देवू असं या तपासा दरम्यान सिसोदिया यांनी सांगितलं.

****

प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवर निर्मिती योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्वच पाझर तलाव दुरूस्तीची कामं प्राधान्यानं करण्याच्या सूचना, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिल्या. ते काल औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात, अमृत सरोवर योजना आणि आदर्श संसद ग्राम योजनेच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

तलाव दुरूस्ती बरोबरच नवीन तलाव निर्मिती, तसंच तलावाच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याचे निर्देश डॉ कराड यांनी दिले. आदर्श संसद ग्राम योजनेतंर्गत जिल्ह्यातल्या बाळापूर, जरुळ, वडनेर, खिर्डी, रांजणगाव पोळ, वनगाव या सहा गावांमध्ये, प्राथमिक गरजांबरोबरच, अद्ययावत सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचनाही कराड यांनी केली.

****

अतिवृष्टीने बाधित एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी, असे निर्देश, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांची सत्तार यांनी काल ऑनलाईन बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन त्यांचं मनोबल वाढवण्याच्या प्रयत्न करा, अशी सूचना सत्तार यांनी, महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. नागपूर जिल्ह्यातल्या मौजा पांझरीलोधी आणि वारंगा या ग्रामीण भागातल्या नुकसानग्रस्त शेतीची काल त्यांनी पाहणी केली.

दरम्यान, कृषीमंत्री सत्तार हे नियोजित दौरा बदलून यवतमाळ जिल्ह्यात झाडगाव इथं एकदिवस आधीच पोहोचले, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली. खरडलेली शेतजमीन पोटखराब म्हणून नोंद होईल, अशी माहिती देणाऱ्या कर्मचाऱ्यांना खडसावत, सातबाऱ्यावर शेत पोटखराब नोंद होणार नसल्याचं, कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं. शेतजमीन पूर्ववत कसण्याजोगी होण्याकरता लागणारा कालावधी आणि त्यानुसार नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना भरीव मदतीचं आश्वासन त्यांनी दिलं.

दरम्यान, कृषी मंत्री अब्दुल सत्तार उद्या नांदेड तसंच लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. रविवारी सकाळी दहा वाजता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची मराठवाडा विभागीय आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर नांदेड तालुक्यातल्या विष्णुपूरी, कासारखेडा, गौजेखेडा इथल्या, अतिवृष्टीग्रस्त भागाची आणि पिकांची पाहणी करणार आहेत. दुपारी साडे बारा वाजता लोहा तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून ते लातूरकडे प्रयाण करणार आहेत. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा आणि औसा तालुक्यातल्या एरंडी तसंच जयनगर या गावातल्या शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी  अब्दुल सत्तार करणार आहेत.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार २८५ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ८० हजार ६९६ झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला तर काल दोन हजार २३७ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख २० हजार ७७२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ०२ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ११ हजार ७३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

गेल्या दहा दिवसांत राज्यात बीए फोर आणि बीए फाईव्ह व्हेरियंटचे ७३ तर बीए टू पॉईंट सेव्हन फाईव्हचे २०९ रुग्ण आढळले. सध्या राज्यात राज्यात बीए फोर आणि बीए फाईव्ह व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या ३४८ तर बीए टू पॉईंट सेव्हन फाईव्हच्या रुग्णांची संख्या ४५९ झाली आहे.

****

मराठवाड्यात काल ५३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात लातूर जिल्ह्यातल्या १८, उस्मानाबाद दहा, औरंगाबाद नऊ, नांदेड आठ, बीड आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन, तर हिंगोली जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यातले राक्षी इथले लष्कराचे जवान सचिन रामकिसन साळवे यांच्यावर काल लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते ३३ वर्षांचे होते. त्यांना आसाममधल्या गुवाहाटी इथं नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत गोळी लागून वीरमरण आलं. त्यांचे लहान भाऊ राहुल साळवे हे भारतीय लष्करामध्ये सध्या जम्मू- काश्मीरमध्ये नवसारा इथं कार्यरत आहेत.

****

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण यंदा उत्साहात साजरा केला. जळगाव जिल्ह्यातले नागरिक दिवंगत जगन्नाथ वाणी यांच्या कुटुंबानं पहिल्या स्वातंत्र्य दिनाची प्रत्यक्ष आठवण जपून ठेवली आहे. याबाबत आमचे जळगावचे वार्ताहर राजेश यावलकर यांनी अधिक माहिती दिली.

 

Byte  ….

जगन्नाथ भावजी वाणी यांनी स्वातंत्रदिनी यावल इथे पंचाहत्तर वर्षा पूर्वी मामलेदार म्हणून ध्वजारोहणा केले. तोच राष्ट्रध्वज त्यांच्या परिवाराने तब्ब्ल पंचाहत्तर वर्ष जपून ठेवला. त्यांच्या कनिष्ठ चिरंजीवांनी हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत आपल्या घरावर 1947 सालचा तोच तिरंगा फडकावला, आणि त्याचं मन अभिमान आणि गौरवानं भरून आलं

****

तीन दिवसीय अंबाजोगाई साहित्य संमेलनाला काल जागर दिंडीने सुरवात झाली. कविवर्य डॉ. दासू वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संमेलनाचं ज्येष्ठ अभिनेते डॉ. दिलीप घारे यांच्याहस्ते उद्‌‌घाटन झालं. स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ बी आय खडकभावी, मसापचे शाखाध्यक्ष दगडू लोमटे, कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर, यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉ. घारे यांनी आपल्या उद्‌घाटनपर भाषणात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा येत असल्याची खंत व्यक्त केली. दासू वैद्य यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अंबाजोगाईतल्या साहित्यिकांनी आपलं वेगळेपणा जपत साहित्याचा ठसा उमटवल्याचं सांगितलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार लेखक अमर हबीब यांना सौ. मंदा देशमुख स्मृती कथा लेखक पुरस्कार, प्रा. देविदास खोडेवाड यांना डॉ. संतोष मुळावर स्मृती शिक्षक लेखन पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आलं.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या या साहित्य संमेलनाची संकल्पना, "अनिवासी अंबाजोगाईकर" अशी असून, या संमेलनात, साहित्य, कविता, संगीत, शिक्षण, पत्रकारिता, आरोग्य, सामाजिक आदि क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन, अंबाजोगाई शहराचा इतर क्षेत्रात नावलौकिक वाढवणारे, अनिवासी अंबाजोगाईकर सहभाग झाले आहेत. शहरातल्या टी. बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात भरलेल्या या साहित्य संमेलनात, कला आणि ग्रंथ प्रदर्शन, पुरस्कार वितरण, कवी संमेलन, आणि कथा संमेलन होणार आहे.

****

ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या पाचोळा या कादंबरीला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सुवर्ण महोत्सवी पाचोळा या सन्मान सोहळ्याचं औरंगाबाद इथं आयोजन करण्यात आलं आहे. आज एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, रा. रं. बोराडे यांचा सत्कार, परिसंवाद, अभिवाचन, तसंच युवा ग्रामीण कादंबरीकारांचा सत्कार करण्यात येणार आहे.

****

नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विपीन इटनकर यांनी काल पदभार स्वीकारला. मावळत्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. इटनकर यांनी आर. विमला यांना पुणे इथल्या बाल कल्याण विभागात आयुक्त पदावर नियुक्तीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. विपीन इटनकर हे नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.

****

औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघाने दुधाच्या खरेदी दरात लीटरमागे एका रुपयाने वाढ केली आहे. दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना आता ३२ रुपये लीटर भाव मिळणार आहे. २१ ऑगस्टपासून ही दरवाढ लागू होणार आहे .

****

भारत आणि झिंबाब्वे दरम्यान दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज हरारे इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या मालिकेत भारत एक - शून्यनं आघाडीवर आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात कपात करण्यात आली आहे. धरणातून आता ३८ हजार ४२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणातला पाणी साठा सध्या ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

****

 

No comments:

Post a Comment