Sunday, 21 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.08.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  21 August  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ ऑगस्ट २०२   सायंकाळी ६.१०

****

·      पायाभूत सुविधांच्या विकासासाठी टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करण्याची आवश्यकता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त.

·      अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे येत्या पाच दिवसात पूर्ण करण्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रशासनाला निर्देश.

·      नांदेड जिल्ह्यात कंधार इथं एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा तलावात बुडून मृत्यू.

आणि

·      दहाव्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचा समारोप.

****

देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करण्याची आवश्यकता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते आज मुंबईत स्थापत्य अभियंत्यांच्या एका संघटनेनं बोलावलेल्या राष्ट्रीय संमेलनात बोलत होते. पायाभूत सुविधा योजनांची आर्थिक व्यवहार्यता तसंच पर्यावरण अनुकूल पर्यायांसाठी संशोधन करण्याची गरजही गडकरी यांनी नमूद केली. हरित हायड्रोजन मेथनॉल, तसंच बायो इथेनॉल सारख्या भविष्यातल्या इंधनांकडेही गडकरी यांनी आपल्या भाषणातून लक्ष वेधलं. विकासाचे चार स्तंभ वीज, पाणी, परिवहन आणि संवाद यामध्ये नवनव्या संकल्पना रुजण्याची शक्यता गडकरी यांनी व्यक्त केली. या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी यादृष्टीने संशोधन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं.

****

नवीन कामगार कायद्यात कामगारांची सुरक्षा, आरोग्य, आर्थिक सक्षमीकरण आदी बाबींवर विचार करण्यात आल्यानं, नवीन रोजगारांत वाढ होऊन, आत्मनिर्भर भारताची निर्मिती होण्यास मदत होईल, असा विश्वास केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेन्ट यांच्या वतीनं पुण्यात घेण्यात आलेल्या “कामगार कायद्याची अंमलबजावणी” या विषयावरच्या चर्चासत्रात यादव बोलत होते. उद्योग क्षेत्र मजबूत करण्यासाठी कामगारांच्या समस्या आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे. कामगारांकडून कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पादन करुन, उद्योग क्षेत्रात वाढ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगत, कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वांनी सोबत येऊन काम करण्याचं आवाहन, कामगार मंत्री यादव यांनी केलं.

****

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला यंदाच्या जून महिन्यात १८ लाख ३६ हजार नवे सदस्य मिळाले आहेत. मे २०२२ च्या तुलनेत जून २०२२ मध्ये नऊ पूर्णांक २१ शतांश टक्के सदस्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जूनमध्ये पाच लाख ५३ हजार सभासदांची वाढ झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

उत्पादनशुल्क धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य १२ जणांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. यामुळे आता या सर्वजणांच्या परदेश प्रवासावर निर्बंध आले आहेत. दिल्ली उत्पादनशुल्क धोरण अंमलबजावणीमधल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सी बी आय नं काल प्राथमिक माहिती अहवाल - एफ आय आर दाखल केल्यानंतर सिसोदिया यांच्या निवासस्थानासह इतर ३० ठिकाणी छापे घालून कारवाई सुरू केली आहे.

****

अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाचे पंचनामे येत्या पाच दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महसूल यंत्रणा आणि कृषि विभागाला दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं, शेतजमिनीचं, पशुधनाचं आणि विशेषत: घरांचं नुकसान झालं आहे, त्यांना तत्काळ मदत कशी पोहचवता येईल याचं नियोजन करत असल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलं. ते आज नांदेड इथं मराठवाडा विभागीय पातळीवरच्या कृषी आढावा बैठकीत बोलत होते. पंचनामे अधिक गतीनं पूर्ण करणं अत्यावश्यक असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन तत्काळ नियोजन करण्याची सूचना कृषी मंत्री सत्तार यांनी केली. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे कृषी मंत्र्यांचं लक्ष वेधलं.

औरंगाबाद विभागात एकूण साडे चारशे महसूल मंडळं असून त्यापैकी दोनशे सात महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. सुमारे ४९० हेक्टर शेतजमीन खरडून किंवा वाहून गेली असून फक्त या नुकसान भरपाईपोटी एक कोटी ४३ लाख रुपये निधीची आवश्यकता असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

दरम्यान, कृषी मंत्री सत्तार यांनी आज नांदेड जिल्ह्यातल्या कासारखेडा, नांदुसा, विष्णुपुरी, जानापुरी, तसंच सोनखेड भागातील परिस्थितीची पाहणी केली.

****

राज्यात एक जूनपासून आज सकाळी साडे दहा वाजेपर्यंत २९ जिल्हे तसंच ३५२ गावं अतिवृष्टीमुळे प्रभावित झाली आहेत. राज्यात ११७ तात्पुरती निवारा केंद्रं तयार करण्यात आली असून २० हजार ८६६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. अतिवृष्टीमुळे १२६ नागरिकांनी आपला जीव आतापर्यंत गमावला आहे तर २४३ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचं पूर्णत: तर साडे तीन हजारावर घरांचं अंशत: नुकसान झालं आहे. मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षाकडून ही माहिती देण्यात आली.

****

केंद्र सरकारने गहू आयात करण्याची कोणतीही योजना नसल्याचं स्पष्ट केलं आहे. देशात मागणी पूर्ण करण्याइतका पुरेसा गहू साठा आहे. त्यामुळे गहू आयातीसंदर्भात प्रसारित होणाऱ्या बातम्या निराधार असल्याचं, सार्वजनिक वितरण विभागानं सांगितलं आहे.

****

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सततची उपेक्षा आणि अपमान यामुळे हा निर्णय घेतल्याचं शर्मा यांनी एका ट्विट संदेशात म्हटलं आहे. आपण आजन्म काँग्रेस पक्षात होतो आणि कायम राहणार असल्याचं, त्यांनी नमूद केलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या जानवळ इथले सुपुत्र वीर जवान मच्छिंद्रनाथ नामदेवराव चापोलकर यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. मच्छिंद्रनाथ यांचं १९ ऑगस्टच्या सकाळी दिल्लीत सैन्य रुग्णालयात रक्ताभिसरण संस्थेशी निगडित आजारानं निधन झालं. त्यांचा पार्थिव देह दिल्लीहून विमानानं हैदराबादला आणि तिथून रस्ता मार्गे जानवळ इथं आणण्यात आला. लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्यासह अनेकांनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. या सेवारत सैनिकाला लातूर पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली.

****

देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लस मात्रांच्या संख्येने २०९ कोटी ६७ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात दोन कोटी ७९ लाख, १० हजार ७६८ लसीकरण सत्रांतून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आलं. त्यात १३ कोटी १८ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. देशात १२ ते १४ वर्ष वयोगटातल्या तीन कोटी ९९ लाखांहून अधिक किशोरवयीनांना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

****

नांदेड जिल्ह्यात कंधार इथं एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा जगतुंग तलावात बुडून मृत्यू झाला. नांदेड शहरातले हे रहिवासी आपल्या कुटुंबीयासह कंधार इथं दर्गाच्या दर्शनासाठी गेले होते. कुटुंबातल्या महिला आणि लहान मुलं दर्ग्यात असताना, पाच जण तलावात पोहण्यासाठी उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं, पाचही जणांचा बुडून मृत्यू झाला. मोहमद विकार, मोहमद साद, सय्यद सोहेल, सय्यद नाविद आणि मोहमद आफ्रिदीन अशी मयतांची नावं असून, हे सर्वजण १३ ते २३ वर्ष वयोगटातले आहेत.

****

दहाव्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला. आज सकाळच्या सत्रात अनिवासी अंबाजोगाईकरांनी आपली मनोगतं व्यक्त केली. दुपारच्या सत्रात, ‘माझ्यासवे गंध अंबाजोगाईचा’ या विषयावरच्या परिसंवादात डॉ अशोक चौसाळकर, डॉ माधव किन्हाळकर, रमेश गंगणे, यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले. त्यानंतर संमेलनाध्यक्ष कविवर्य दासू वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवयित्री डॉ वृषाली किन्हाळकर यांच्या उपस्थितीत समारोप सत्राला प्रारंभ झाला. या सत्रात पहिल्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रंगनाथ तिवारी तसंच दहाव्या संमेलनाचे वाहक अमर हबीब यांचा सत्कार करण्यात आला. या संमेलनाच्या निमित्तानं घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरणही मान्यवरांच्या हस्ते पार पडलं.

****

शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या हर हर महादेव कावड यात्रेला आजपासून सुरुवात झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातल्या ओंकारेश्वर महादेव मंदिरापासून या कावड यात्रेला प्रारंभ झाला.

****

जालना जिल्ह्यात महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा २३ ते २९ ऑगस्ट या कालावधीत येणार आहे. या यात्रेमध्ये जिल्ह्यातल्या जास्तीतजास्त विद्यार्थी तसंच नवउद्योजकांनी सहभागी होण्यासाठी राज्य नाविन्यता सोसायटीचे संकेतस्थळ WWW.MSING.IN वर नोंदणी करावी, तसंच तालुकास्तरीय प्रचार-प्रसिध्दी अभियान किंवा जिल्हास्तरीय सादरीकरण सत्रात सहभाग घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी केलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या नाथसागर धरणाच्या विसर्गात आज सकाळपासून घट करण्यात आली. धरणाचे १८ दरवाजे आता एक फुटावरुन अर्धा फूट उंचीवर स्थिर करण्यात आले असून, गोदावरी नदीपात्रात नऊ हजार ४३२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

****

No comments:

Post a Comment