Monday, 22 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.08.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 August 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे येत्या पाच दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रशासनाला निर्देश

·      शिवसेनेच्या ठाकरे तसंच शिंदे गटानं दाखल केलेल्यायाचिकांचर सर्वोच्च न्यायालयात आज ऐवजी उद्या सुनावणी 

·      डिजिटल पेमेंटसाठी कुठलंही शुल्क लावण्याचा तसंच गहू आयात करण्याची कोणतीही योजना नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

·      चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने ३१ ऑक्टोबरपूर्वी प्रवेश रद्द केला तर संपूर्ण शुल्क परत करण्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे आदेश

·      राज्यात कोविड संसर्गाचे १ हजार ८३२ नवे रुग्ण, मराठवाड्यात ३८ बाधित

·      नांदेड जिल्ह्यात कंधारच्या जगतुंग तलावात बुडून एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा मृत्यू

आणि

·      झिंबाब्वे विरुद्ध भारताचा आज तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना

 

 

सविस्तर बातम्या

अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे येत्या पाच दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महसूल यंत्रणा आणि कृषि विभागाला दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं, शेतजमिनीचं, पशुधनाचं आणि विशेषत: घरांचं नुकसान झालं आहे, त्यांना तत्काळ मदत कशी पोहचवता येईल, याचं नियोजन करत असल्याचं, सत्तार यांनी सांगितलं. ते काल नांदेड इथं मराठवाडा विभागीय पातळीवरच्या कृषी आढावा बैठकीत बोलत होते. पंचनामे अधिक गतीनं पूर्ण करणं अत्यावश्यक असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन तत्काळ नियोजन करण्याची सूचना, सत्तार यांनी केली. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींनी, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे, कृषी मंत्र्यांचं लक्ष वेधलं.

औरंगाबाद विभागात एकूण साडे चारशे महसूल मंडळं असून, त्यापैकी दोनशे सात महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. सुमारे ४९० हेक्टर शेतजमीन खरडून किंवा वाहून गेली असून, फक्त या नुकसान भरपाईपोटी एक कोटी ४३ लाख रुपये निधीची आवश्यकता असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या कासारखेडा, नांदुसा, विष्णुपुरी, जानापुरी, तसंच सोनखेड भागातल्या परिस्थितीची सत्तार यांनी पाहणी केली. त्यानंतर लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात एरंडी आणि जयनगर इथं देखील त्यांनी बाधित शेतीची पाहणी केली. शंखी गोगलगायीमुळे नष्ट झालेलं सोयाबीन हे पीक पंतप्रधान पीक विम्याच्या कक्षेत कसं बसवता येईल, आणि अधिकाधिक मदत कशी देता येईल याबाबत शासन प्रयत्नशील असल्याचं, सत्तार यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यात एक जूनपासून २९ जिल्हे तसंच ३५२ गावं अतिवृष्टीमुळे प्रभावित झाली आहेत. राज्यात ११७ तात्पुरती निवारा केंद्रं तयार करण्यात आली असून, २० हजार ८६६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. अतिवृष्टीमुळे १२६ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर २४३ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचं पूर्णत: तर साडे तीन हजारावर घरांचं अंशत: नुकसान झालं आहे. मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षाकडून ही माहिती देण्यात आली.

****

शिवसेनेच्या ठाकरे तसंच शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांचर सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती आज उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी आता उद्या २३ तारखेला होईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, इतर मागासवर्गीय- ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरु असलेल्या ९२ नगरपरिषदांमध्ये आरक्षण लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारनं न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. 

****

देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करण्याची आवश्यकता, केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. काल मुंबईत स्थापत्य अभियंत्यांच्या एका संघटनेनं बोलावलेल्या राष्ट्रीय संमेलनात, ते बोलत होते. पायाभूत सुविधा योजनांची आर्थिक व्यवहार्यता तसंच पर्यावरण अनुकूल पर्यायांसाठी संशोधन करण्याची गरजही, गडकरी यांनी नमूद केली. हरित हायड्रोजन, मेथनॉल, तसंच बायो इथेनॉल सारख्या भविष्यातल्या इंधनांकडेही त्यांनी आपल्या भाषणातून लक्ष वेधलं. विकासाचे चार स्तंभ वीज, पाणी, परिवहन आणि संवाद, यामध्ये नवनव्या संकल्पना रुजण्याची शक्यता देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी यादृष्टीने संशोधन करण्याचं आवाहन त्यांनी केलं. २०२४ च्या वर्षाअखेरपर्यंत, देशातल्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधा, अमेरिकेच्या रस्ते पायाभूत सुविधा मानकांनुसार बनवण्याचा निर्णय घेतला असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

****

नवीन कामगार कायद्यात कामगारांची सुरक्षा, आरोग्य, आर्थिक सक्षमीकरण आदी बाबींवर विचार करण्यात आल्यानं, नवीन रोजगारांत वाढ होऊन, आत्मनिर्भर भारताची निर्मिती होण्यास मदत होईल, असा विश्वास, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेन्ट यांच्यावतीनं पुण्यात घेण्यात आलेल्या, ''कामगार कायद्याची अंमलबजावणी'', या विषयावरच्या चर्चासत्रात ते काल बोलत होते. उद्योग क्षेत्र मजबूत करण्यासाठी कामगारांच्या समस्या आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे, कामगारांकडून कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पादन करुन, उद्योग क्षेत्रात वाढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं सांगत यादव यांनी, कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वांनी सोबत येऊन काम करण्याचं आवाहन केलं.

****

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला यंदाच्या जून महिन्यात, १८ लाख ३६ हजार नवे सदस्य मिळाले आहेत. मे २०२२ च्या तुलनेत जून २०२२ मध्ये नऊ पूर्णांक २१ शतांश टक्के सदस्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जूनमध्ये पाच लाख ५३ हजार सभासदांची वाढ झाली आहे.

****

युपीआय किंवा डिजिटल पेमेंट करण्यासाठी कुठलंही शुल्क लावण्याचा विचार नाही, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. यूपीआय पेमेंट सिस्टीमवर शुल्क लावण्याचा सरकारचा विचार सुरू असल्याच्या काही बातम्या प्रकाशित झाल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं आहे.  भारतीय अर्थव्यवस्थेसाठी यूपीआय एक महत्त्वाचं आणि उत्पादक साधन ठरलं आहे. यूपीआयवर कोणतंही शुक्ल लावण्याचा विचार नाही. देशात डिजिटल पेमेंटचा विकास व्हावा यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी आर्थिक सहाय्य पुरवलं होतं. या वर्षीही ते कायम ठेवण्यात आलं असून, ते अधिक यूजर फ्रेन्डली व्हावं यासाठी प्रयत्न केला जात असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

केंद्र सरकारने गहू आयात करण्याची कोणतीही योजना नसल्याचं स्पष्ट केलं आहे. देशात मागणी पूर्ण करण्याइतका पुरेसा गहू साठा आहे. त्यामुळे गहू आयातीसंदर्भात प्रसारित होणाऱ्या बातम्या निराधार असल्याचं, सार्वजनिक वितरण विभागाने सांगितलं आहे.

****

दहीहंडीचा साहसी क्रीडा प्रकारात अंतर्भाव केला असून, गोविंदांना प्रोत्साहन म्हणून शिक्षण आणि सरकारी नोकरीत या क्रीडापटूंच्या पाच टक्के आरक्षण कोट्यात अंतर्भूत करण्याचा निर्णय शासनानं घेतला असल्याची माहिती, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. हे आरक्षण देताना राज्य लोकसेवा आयोग- एमपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असंही सामंत यांनी नमूद केलं. क्रीडा विभागातल्या अधिकाऱ्यांमार्फत छाननी होऊन क्रीडापटूंची निवड केली जाईल, असं ते म्हणाले .

****

चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने कुठल्याही कारणाने ३१ ऑक्टोबरपूर्वी प्रवेश रद्द केला तर संबंधिताला संपूर्ण शुल्क परत करण्याचे आदेश, विद्यापीठ अनुदान आयोगानं दिले आहेत. त्यामुळे प्रवेश रद्द करताना, शैक्षणिक संस्थांकडून शुल्कात होणारी कपात वाचणार आहे. यंदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएससीचे निकाल विलंबाने लागले, त्यामुळे अपेक्षित अभ्यासक्रमांचे प्रवेशही विलंबानं होत आहेत. सुरक्षितता म्हणून काही विद्यार्थी पर्यायी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन ठेवतात, त्यानंतर अपेक्षित अभ्यासक्रमाला प्रवेश मिळताच आधीच्या अभ्यासक्रमाचा प्रवेश रद्द केला जातो. मात्र, या प्रक्रियेम महाविद्यालयांकडून शुल्कात दहा टक्के कपात केली जाते, यंदा ही कपात केली जाणार नाही.

****

राज्यात इयत्ता पहिली ते बारावीच्या तब्बल ३४ लाख विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी तसंच अद्ययावतीकरण अद्याप पूर्ण झालेलं नाही. बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या माहितीत चुका झाल्याची बाबही निदर्शनास आली आहे. आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण येत्या ३१ डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावं लागणार आहे. नव्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीनुसारच योजनांचा निधी वितरित होणार आहे. विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीची माहिती स्टुडंट पोर्टलमध्ये नोंदवण्याचं बंधनही घालण्यात आलं आहे.

****

राज्यात काल कोविड-१९ च्या १ हजार ८३२ नव्या रुग्णांची नोंद झाली, २ हजार ५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ८० लाख ८४ हजार ३८३ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आत्तापर्यंत ७९ लाख २४ हजार ५४७ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ४८ हजार १९५ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ११ हजार ६४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक २ शतांश टक्के, तर मृत्यूदर १ पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे.

****

मराठवाड्यात काल ३८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात लातूर जिल्ह्यातल्या १४, औरंगाबाद नऊ, उस्मानाबाद आठ, जालना पाच, तर बीड जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

****

दहाव्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. काल सकाळच्या सत्रात अनिवासी अंबाजोगाईकरांनी आपली मनोगतं व्यक्त केली. दुपारच्या सत्रात, माझ्यासवे गंध अंबाजोगाईचा, या विषयावरच्या परिसंवादात, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. माधव किन्हाळकर, रमेश गंगणे, यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. त्यानंतर संमेलनाध्यक्ष कविवर्य दासू वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली, आणि कवयित्री डॉ वृषाली किन्हाळकर यांच्या उपस्थितीत समारोप सत्राला प्रारंभ झाला. मराठी भाषेचा संकर थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं आवाहन, डॉ. किन्हाळकर यांनी केलं.

या साहित्य संमेलनाचा अध्यक्षीय समारोप करताना संमेलनाध्यक्ष दासू वैद्य यांनी, या साहित्य संमेलनामुळे चांगुलपणाचा रेटा तयार झाला, समाजात माणुसपण जिवंत ठेवायचं असेल, तर अशी संमेलनं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं.

या सत्रात पहिल्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रंगनाथ तिवारी तसंच दहाव्या संमेलनाचे वाहक अमर हबीब यांचा सत्कार करण्यात आला. या संमेलनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरणही मान्यवरांच्या हस्ते पार पडलं.

****

सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते काल औरंगाबाद इथं विविध रस्ते तसंच विकास कामांचं भूमिपूजन झालं. रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात बोलताना सावे यांनी, औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असं सांगितलं.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे दिला जाणारा जीवनसाधना पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ यांना दिला जाणार आहे. उद्या विद्यापीठाच्या वर्धापन दिनी हा पुरस्कार समारंभ होणार आहे.

****

नांदेड जिल्ह्यात कंधार इथं एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा जगतुंग तलावात बुडून मृत्यू झाला. नांदेड शहरातले हे रहिवासी आपल्या कुटुंबीयासह कंधार इथं दर्गाच्या दर्शनासाठी गेले होते. कुटुंबातल्या महिला आणि लहान मुलं दर्ग्यात असताना, पाच जण तलावात पोहण्यासाठी उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं, पाचही जणांचा बुडून मृत्यू झाला. मोहमद विकार, मोहमद साद, सय्यद सोहेल, सय्यद नाविद आणि मोहमद आफ्रिदीन अशी मयतांची नावं असून, हे सर्वजण १३ ते २३ वर्ष वयोगटातले आहेत.

****

लातूर जिल्ह्यातल्या जानवळ इथले सुपुत्र वीर सैनिक मच्छिंद्रनाथ चापोलकर यांच्या पार्थिव देहावर, काल अंत्यसंस्कार करण्यात आले. मच्छिंद्रनाथ यांचं १९ ऑगस्टच्या सकाळी दिल्लीत सैन्य रुग्णालयात रक्ताभिसण संस्थेशी निगडित आजारानं निधन झालं. त्यांचा पार्थिव देह दिल्लीहून विमानाने हैदराबादला आणि तिथून रस्ता मार्गे जानवळ इथं आणण्यात आला. लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्यासह अनेकांनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. या सेवारत सैनिकाला लातूर पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली.

****

भारत आणि झिंबाब्वे दरम्यान तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज हरारे इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या मालिकेत पहिले दोन सामने जिंकून भारतानं मालिका दोन-शून्यनं जिंकली आहे.

****

जालना जिल्ह्यात महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा २३ ते २९ ऑगस्ट या कालावधीत येणार आहे. या यात्रेमध्ये जिल्ह्यातल्या जास्तीतजास्त विद्यार्थी तसंच नवउद्योजकांनी सहभागी होण्यासाठी, राज्य नाविन्यता सोसायटीचं संकेतस्थळ, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस आय एन जी डॉट आय एन यावर नोंदणी करावी, तसंच तालुकास्तरीय प्रचार-प्रसिद्धी अभियान किंवा जिल्हास्तरीय सादरीकरण सत्रात सहभाग घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केलं आहे.

****

राज्यातल्या डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि डॉक्टरांना संरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन - आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आयएमएची राज्यस्तरीय बैठक काल औरंगाबाद इथं पार पडली, त्यानंतर राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. डॉक्टरांवरील हल्ल्यांबाबत केंद्रीय स्तरावर कायदा झाला पाहिजे आणि हल्लेखोरांना सात वर्षाची कठोर शिक्षा झाली पाहिजे, असं ते म्हणाले. या बैठकीत डॉक्टरांच्या विविध प्रश्नांवरील व्हाइट पेपर या पुस्तिकेचं प्रकाशन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते झालं.

****

No comments:

Post a Comment