Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 August 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४
ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा.
****
राज्यात
सध्या सात हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, याशिवाय आणखी सात हजार पोलिस
भरती केली जाईल, अशी घोषणा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. याबाबतची
लक्षवेधी सूचना मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार
यांनी आणखी पोलीस भरतीची आवश्यकता असल्याची मागणी केली होती.
अहमदनगर
जिल्ह्यात श्रीरामपूर इथं एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारासाठी कारणीभूत असलेल्या
पोलीस अधिकाऱ्याची विभागीय चौकशी तीन महिन्यात करून त्यानंतर त्याच्या बडतर्फीची कारवाई
करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भाजप आमदार नितेश राणे यांनी यासंदर्भार
लक्षवेधी उपस्थित केली होती.
विधानभवन
परिसरात काल शेतकर्यांने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित
पवार यांनी उपस्थित केला. या शेतकर्याला ते भेटायला गेले असता रुग्णालयाच्या परिसरात
रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांसाठी भौतिक सुविधा नसल्याकडे त्यांनी सदनाचं लक्ष
वेधलं. यावर राज्यातल्या रुग्णालयात सल्लागार समित्या स्थापन कराव्या, अशी सूचना अध्यक्ष
राहुल नार्वेकर यांनी केली.
****
स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवानिमित्त विविध शासकीय नोकऱ्यांमधील ७५ हजार रिक्त पदं येत्या वर्षभरात
भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असं कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानपरिषदेत
सांगितलं. राज्य सरकारच्या २९ प्रमुख विभागांमध्ये सरळसेवा आणि पदोन्नतीची मिळून दोन
लाख १९३ पदं रिक्त असल्यासंदर्भात लक्षवेधी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड
यांनी मांडली होती. एमपीएससी मार्फत १०० टक्के पदं भरण्याचा आणि आणि अन्य माध्यमातून
५० टक्के पदं भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचं देसाई यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणाला
मिळालेल्या स्थगितीमुळे प्रलंबित असलेल्या नियुक्त्यांपैकी बाराशे पदांवर नियुक्त्या
देण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून, कागदपत्रांची पूर्तता
केल्यानंतर उर्वरित नियुक्त्या देण्यात येतील अशी माहिती देसाई यांनी दिली.
****
दरम्यान,
अधिवेशनाचं कामकाज आज सुरु होण्याआधी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या मुद्द्यावरुन
सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे महेश शिंदे यांनी एकमेकांना
धक्काबुक्की केली.
दरम्यान,
सत्ताधाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केली असून, त्यांनी मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.
कोविड काळात
महाविकास आघाडी सरकारमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर
सत्ताधारी आमदारांनी देखील आंदोलन केलं.
****
देशात कोविड
प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१० कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २७ लाख १७ हजार
९७९ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २१० कोटी ५८ लाख ८३ हजार ६८२
मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या दहा हजार ६४९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर दहा हजार
६७७ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ९६ हजार ४४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
महाराष्ट्र
वस्तू आणि सेवा कर विभागाने १११ कोटी रुपयांच्या बनावट खरेदी देयका प्रकरणी कारवाई
करुन काल मुंबईतून चौघांना अटक केली. किशोर कुमार, मंजुनाथ पुजारी, अभिषेक शेट्टी, नितीन सावंत अशी त्यांची नावं असून महानगर दंडाधिकारी
न्यायालयानं त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या आरोपींनी सात कंपन्यांची
वस्तू आणि सेवा कर नोंदणी करुन, १११ कोटी बनावट देयकांच्या माध्यमातून जवळपास २० कोटींचे
बनावट इनपुट टैक्स क्रेडिट प्रत्यक्ष मालाची विक्री न करता दिल्याचं आढळून आलं. त्यानुसार
ही कारवाई करण्यात आली.
****
केवळ साक्षीदाराच्या
जबाबावरच प्रकरणाचा निकाल अवलंबून राहू नये यासाठी पोलिसांनी दस्तऐवज स्वरूपातही अधिकाधिक
पुरावे गोळा करावेत, असं केंद्रीय विधी आणि
न्याय राज्यमंत्री सत्यपाल सिंग बघेल यांनी म्हटलं आहे. ते काल सांगली जिल्ह्यातल्या
इस्लामपूर इथं भाजप मेळाव्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते. पोलीस यंत्रणा अत्याधुनिक
साधनांचा वापर केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. न्याय जलद मिळावा यासाठी भारतीय
दंड संहितेच्या कलमांमध्ये आवश्यक सुधारणा केल्या जातील, अशी ग्वाही बघेल यांनी दिली.
****
ऑलिम्पिक
विजेता आणि जागतिक स्पर्धेतला रौप्यपदक विजेता भालाफेक खेळाडू निरज चोप्रा येत्या २६
ऑगस्टला स्वित्ज्झर्लंड मध्ये होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे.
कंबरेला झालेल्या दुखापतीमुळे नीरजनं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला
नव्हता.
****
No comments:
Post a Comment