Monday, 15 August 2022

Text - Audio - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 15.08.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 August 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.

****

देशाच्या शहात्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आमच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा

****

·      शहात्तराव्या स्वातंत्र्यदिनानीमित्त आज देशभर उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी वी दिल्‍लीच्या लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला संबोधित करणार

·      नागरिकांनी आपली मौलिक कर्तव्य जाणून घेत, योग्य आणि मूळ भावनेसह त्यांचा अंगीकार करण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन

·      राज्यातल्या ८४ कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे पोलिस पदकं जाहीर

·      राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन, अब्दुल सत्तार-कृषी, अतुल सावे- सहकार, तर तानाजी सावंत यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण खातं

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे दोन हजार ८२ रुग्ण, मराठवाड्यात ५३ बाधित

·      आणि

·      शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी बीड इथं अंत्यसंस्कार

****

देशाचा शहात्तरावा स्वातंत्र्यदिन आज उत्साह आणि जल्लोषात साजरा होत आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर आजादी का अमृत महोत्‍सवदेखील साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेन्‍द्र मोदी यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये साबरमती आश्रमात आजादी का अमृत महोत्‍सवाचा शुभारंभ केला होता, त्यानुसार ठरवलेले सर्व कार्यक्रम १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत चालू राहतील. पंतप्रधान मोदी आज नवी दिल्‍लीच्या लाल किल्ल्यावर राष्‍ट्रीय ध्‍वज फडकावतील आणि राष्ट्राला संबोधित करतील. ध्‍वजारोहणानंतर तिरंग्या झेंड्याला राष्ट्रीय सलामी दिली जाईल. वायु सेनेचे बॅण्‍ड ध्‍वजारोहण आणि राष्‍ट्रीय सलामी देतील त्याबरोबरच राष्‍ट्रगीताची धुन वाजवली जाईल. याशिवाय विशिष्‍ट आठ हजार सातसे अकरा फील्‍ड बॅटरीच्या २१ तोफांची सलामी दिली जाईल.

****

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित केलं. नागरिकांनी आपली मौलिक कर्तव्य जाणून घेत, योग्य आणि मूळ भावनेसह त्यांचा अंगीकार करावा, असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे. वंचित, गरजू आणि परिघाबाहेर राहणाऱ्या नागरिकांसाठी सद्‌भावना हे सध्या आपल्या देशाचं उद्दीष्ट असल्याचं त्या म्हणाल्या. राष्ट्रपती म्हणून आपल्या पहिल्याच संबोधनात त्यांनी, कोविड काळातल्या भारताच्या कामगिरीचं कौतुक करत, स्टार्टअप्स, गतीशक्ती योजना, सुदृढ अर्थव्यवस्था, लोकशाही व्यवस्था, आदींचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सशस्‍त्र दलांसाठीच्या १०७ शौर्य पुरस्कारांना मंजूरी दिली आहे. यामध्ये 3 कीर्ति चक्र, १३ शौर्य चक्र, दोन बार-सेना पदक, ८१ सेना पदक, एक नौ सेना पदक आणि सात वायु सेना पदकांचा समावेश आहे.

****

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एक हजार ८२ पोलिस कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे पोलिस पदकं जाहीर झाले आहेत. यातील ३४७ जणांना शौर्य पुरस्कारांनं गौरवण्यात येणार आहे. ८७ जणांना विशिष्‍ट सेवेसाठी राष्‍ट्रपतीचं पोलिस पदक, आणि ६४८ जणांना उत्‍कृष्‍ट सेवेसाठीचं पोलिस पदक प्रदान करण्यात येईल. यामध्ये महाराष्ट्रातल्या ४२ पोलिस कर्मचाऱ्यांना शौर्यासाठीचं पोलिस पदक, तीन जणांना विशिष्‍ट सेवेसाठी राष्‍ट्रपतीचं पोलिस पदक आणि ३९ जणांना उत्‍कृष्‍ट सेवेसाठीचं पोलिस पदक जाहीर झालं आहे.

राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झालेल्यांमध्ये औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्यासह, औरंगाबाद शहरातील पोलिस निरीक्षक व्यंकट केंद्रे, दिलीप तावरे, कृष्णा इसवणकर, उस्मानाबादचे सुर्यकांत आनंदे, सेलूचे जमीलुद्दीन जहागिरदार, लातूरचे गुलाम मेहबूब गुलाम हैदर गळेकाटू आणि बीडचे संतोष वजुरकर यांचा समावेश आहे.

केंद्रीय राखीव पोलिस दलातल्या १०९ आणि जम्‍मू कश्‍मीर पोलिस दलातल्या १०८र्मचाऱ्यांना शौर्यासाठीचं पोलिस पदक घोषित झालं आहे. सात जणांना उत्‍कृष्‍ट सेवेसाठीचं राष्‍ट्रपतींच सुधार सेवा पदक आणि ३८ जणांना उत्‍कृष्‍ट सेवेसाठीचं सुधार सेवा पदक जाहीर झालं आहे.

केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयच्या ३० अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालं आहे, यामध्ये महाराष्ट्रातल्या चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदक विजेत्या सर्वांचं अभिनंदन केलं आहे.

दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सुरू असलेल्या स्वराज्य महोत्सवाअंतर्गत, परवा १७ तारखेला सकाळी ११ वाजता प्रत्येक नागरिकानं "सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमात" सहभागी व्हावं, असं  आवाहन, मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. हा उपक्रम राज्यातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, प्रशासनानं याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

****

राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती आणि तंत्रज्ञान, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, पणन, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, तसंच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, गृह, वित्त आणि नियोजन, विधी आणि न्याय, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन, अब्दुल सत्तार-कृषी, अतुल सावे- सहकार, तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, राधाकृष्ण विखे-पाटील महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, सुधीर मुनगंटीवार - वन,सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय, चंद्रकांत पाटील- उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य, डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास मंत्री, गिरी महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि  युवक कल्याण, गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा आणि स्वच्छता, दादा भुसे - बंदरे आणि खनिकर्म, संजय राठोड- अन्न आणि औषध प्रशासन, सुरेश खाडे-कामगार कल्याण, उदय सामंत - उद्योग, रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, दीपक केसरकर - शालेय शिक्षण आणि मराठी भाषा, इतर मागास आणि  बहुजन कल्याण,  शंभूराज देसाई - राज्य उत्पादन शुल्क, तर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे, पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता, तसंच महिला आणि बालविकास मंत्रालय सोपवण्यात आलं आहे.

****

राज्य सरकारी कार्यालयांमध्ये आता दूरध्वनीवरच्या संभाषणाची सुरवात हॅलो ऐवजी, वंदे मातरम् ने होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल ही घोषणा केली. अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधत हा निर्णय घेतल्याचं, त्यांनी सांगितलं. सांस्कृतिक कार्य विभागातर्फे लवकरच याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल, अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार ८२ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ७ हजार ३४० झाली आहे. काल या संसर्गानं तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तर एक हजार ८२४ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख बारा हजार ६७ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १ हजार १०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ५३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या १९, लातूर १४, जालना पाच, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी चार, परभणी तीन, तर हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.

****

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी बीड इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. काल पहाटे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर एका भीषण अपघातात मेटे यांचं निधन झालं, ते ५२ वर्षांचे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

मेटे यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातून अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

****

बीड जिल्ह्यात मांजरसुभा रस्त्यावर बामदळे वस्ती जवळ चारचाकी आणि टेम्पोचा अपघात होऊन सहा जण ठार झाले. केज तालुक्यातल्या जीवाची वाडी इथलं कुटे कुटुंब, पुणे इथून आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी जात असताना, हा अपघात झाला.

****

फाळणी दु:खद स्मृती दिनानिमित्त काल उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात छायात्रित्र प्रदर्शन भरवण्यात आलं होत. या दिनानिमित्त उस्मानाबाद शहरातून एक मूक फेरीही काढण्यात आली. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक या फेरीत सहभागी झाले होते.

****

काँग्रेस पक्षाच्या वतीने ९ ते १४ ऑगस्ट या कालावधीत काढलेल्या आझादी गौरव पदयात्रेचा काल समारोप झाला. उस्मानाबाद इथं काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या उपस्थितीत तर लातूर इथं माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत या पदयात्रेची सांगता झाली.

****

राज्याचे माजी मुख्यमंत्री, दिवंगत विलासराव देशमुख यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त काल लातूर जिल्ह्यात बाभळगाव इथं विलासबागेत झालेल्या प्रार्थना सभेत त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. देशमुख कुटुंबियांसह मोठ्या जनसमुदायानं विलासरावांच्या स्मृतींना अभिवादन केलं.

****


No comments:

Post a Comment