Thursday, 1 September 2022

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 September 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

गर्भाशयाच्या कर्क रोगावरील पूर्णपणे देशी बनावटीच्या लसीचा शुभारंभ आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सिरम इन्स्टिट्यूटने ही लस विकसित केली आहे.

****

व्यावसायिक वापराच्या १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत जवळपास १०० रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. आजपासून हे नवे दर लागू झाले. दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत ९१ रुपये ५० पैसे, कोलकात्यात १०० रुपयांनी, तर मुंबईत ९२ रुपये ५० पैशांची कपात करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईत आता व्यावसायिक सिलेंडर एक हजार ८४४ रुपयांना मिळणार आहे.

दरम्यान, घरगुती एल पी जी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही.

****

महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या वतीनं आजपासून ३० सप्टेंबरपर्यंत पाचवा राष्ट्रीय पोषण माह साजरा करण्यात ये आहे. पोषण आणि चांगलं आरोग्य यासाठीचं व्यासपीठ म्हणून पोषण माह कडे पाहिलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये याचा उल्लेख करत, सुपोषित भारताच्या संकल्पना पूर्तीसाठी लोक आंदोलनाचं रूपांतर लोक सहभागात करण्याचा पाचव्या पोषण माहचा उद्देश असल्याचं म्हटलं होतं. सर्व लोकांनी कुपोषणाविरुद्धच्या लढाईत सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं. देशभरातल्या लाखो अंगणवाडी कार्यकर्त्यांना मोबाईल उपकरण देण्यापासून ते त्यांच्या सेवांच्या व्याप्तीवर लक्ष ठेवण्यासाठी पोषण ट्रॅकर देखील सुरु करण्यात आला आहे. आकांक्षित जिल्ह्यांमधल्या १४ ते १८ वर्षे वयाच्या मुलींचा समावेश देखील पोषण अभियानाच्या अंतर्गत करण्यात आला आहे.

पोषण माह, हा सहा वर्षांखालील मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती आणि स्तनदा माता यांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठीचा केंद्र सरकारचा प्रमुख कार्यक्रम आहे. एकात्मिक पोषण समर्थन कार्यक्रम म्हणून मिशन पोषण-दोन ची सुरूवात केली आहे.

****

कोणत्याही वस्तू अथवा सेवेची जाहिरात करायला कायद्याने बंदी असली, तर इतर वस्तू किंवा सेवेच्या नावाखाली मूळ उत्पादनाची फसवी जाहिरात करण्यावरही बंदी असेल, असं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. मंत्रालयानं यासंदर्भात कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, त्यांचं उल्लंघन झालं तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. अलिकडेच काही क्रीडा स्पर्धांच्या प्रसारणात सोडा किंवा पॅकबंद पाण्याच्या नावाखाली मद्यार्काच्या, तसंच मुखवासाच्या नावाखाली तंबाखू किंवा गुटख्याच्या जाहिराती दाखवल्या गेल्याचं आढळल्यामुळे, हे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. हे निर्देश कारखानदार, उत्पादक, सेवा पुरवठादार आणि जाहिरातदारांना लागू असल्याचं सरकारी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१२ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १२ लाख ९० हजार ४४३ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २१२ कोटी ५२ लाख ८३ हजार २५९ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या सात हजार ९४६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर नऊ हजार ८२८ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ६हजार ७४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

बीड तालुक्यातल्या खोकरमोह इथल्या पन्नास लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचा काल आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यात श्री संत भगवान बाबा यांच्या मंदिराला संरक्षण भिंत बांधणं, व्यायामशाळा उभारणं आदी कामांचा समावेश आहे. या परिसरातल्या बरगवाडी आणि घुगेवाडी लगतच्या सगळ्या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचं काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती क्षीरसागर यांनी यावेळी दिली. याशिवाय, खोकरमोह, बरगवाडी, घुगेवाडी इथं जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा कामालाही तांत्रिक मान्यता मिळाली असून याचंही काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाचे दहा दरवाजे अर्ध्या फुटावरुन एका फुटावर स्थिर करण्यात आले असून, त्यातून पाच हजार २४० आणि सांडव्याद्वारे नऊ हजार ४३२, असे एकूण १४ हजार ६७२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे. पाण्याची आवक लक्षात घेता विसर्ग वाढवण्यात किंवा कमी करण्यात येईल, असं पाटबंधारे विभागानं कळवलं आहे.

****

जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच एस प्रणॉयनं उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सामन्यात त्याने सिंगापूरच्या लोह किन यू चा २२-२०, २१-१९ असा पराभव केला. किदम्बी श्रीकांतनं देखील स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मात्र भारताच्या लक्ष्य सेन आणि साइना नेहवाल यांचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

//**********//

 

No comments:

Post a Comment