Thursday, 1 September 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.09.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 September 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ सप्टेंबर २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यांना सवलतीच्या दरात, हरभरा डाळीचा पुरवठा करण्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीची मंजुरी

·      राज्यातल्या सर्व प्राचार्य आणि प्राध्यापकांच्या दोन हजार ७२ जागांच्या भरतीचा आदेश जारी केल्याची उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

·      गणेशोत्सवाला सर्वत्र उत्साह आणि जल्लोषात प्रारंभ, ढोल ताशांच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना

·      प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं  केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी महिनाअखेरपर्यंत मुदतवाढ

·      वक्फ मंडळाचं कार्यालय औरंगाबाद शहरातच राहणार - अध्यक्ष आमदार वजाहत मिर्जा यांचं स्पष्टीकरण

·      एक कोटी आठ लाख रुपये थकल्यामुळे उस्मानाबाद शहराच्या पाणीपुरवठ्याची वीज तोडण्याचा महावितरणचा निर्णय स्थगित

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार सहाशे रुग्ण, मराठवाड्यात ३३ बाधित तर औरंगाबाद जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू

आणि

·      आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा हाँगकाँगवर ४० धावांनी विजय

****

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना सवलतीच्या दरात, हरभरा डाळीचा पुरवठा करण्याला मंजुरी दिली आहे. ही डाळ, माध्यान्ह भोजन, सार्वजनिक वितरण प्रणाली आणि एकात्मिक बाल विकास कार्यक्रमांसह विविध कल्याणकारी योजनांमध्ये वापरली जाईल. राज्यांना आठ रुपये प्रति किलो दरानं पंधरा लाख मेट्रिक टन हरभरा डाळ घेता येईल, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, या तत्वावर ही डाळ मिळणार आहे. ही योजना फक्त एकदा राबवण्यात येणार असून, राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना या योजनेचा लाभ बारा महिन्यांच्या आत किंवा डाळीचा साठा संपेपर्यंत घेता येईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

सुट्या मालावर वस्तू आणि सेवा कर - जीएसटी आकाराला जात नाही, फक्त पॅकिंग असलेल्या साहित्यावरच तो आकारला जातो, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल नाशिक मध्ये अखिल भारतीय महानुभाव पंथियांच्या संमेलनात बोलत होते. सुटं तेल विकण्यावर निर्बंध नसल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात महागाई वाढली असली तरी अमेरिका आणि चीनच्या तुलनेत ती कमी असल्याचं ते म्हणाले. महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन वेळा कमी केल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, महानुभाव संमेलनाच्या समारोप समारंभात बोलतांना कराड यांनी, श्री चक्रधर स्वामींचं गुजरातमधल्या भडोच इथं असलेलं जन्मस्थान सर्वांसाठी खुल व्हावं यासाठी आपण स्वतः गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं सांगितलं.

****

राज्यातल्या सर्व प्राचार्य आणि प्राध्यापकांच्या दोन हजार ७२ जागांच्या भरतीचा आदेश काढला असल्याची माहिती, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती जपण्यासह रोजगारनिर्मितीसाठी, शाहू मिलच्या १२ एकर हेरिटेज जमिनीमध्ये भव्य स्मारक, तर उर्वरित २४ एकरमध्ये एखादी टेक्स्टाइल मिल अथवा गारमेंट पार्क, असा उद्योग खाजगी सार्वजनिक क्षेत्राच्या भागीदारीतून सुरू करण्याचा विचार असून, त्याबाबतचा प्रस्ताव वस्त्रोद्योग विभागाचे सचिव तयार करतील, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

****

देशांतर्गत विमान प्रवासाच्या कमाल आणि किमान तिकिट दरावर असलेली मर्यादा हटवण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून सरकारनं या तिकीट दराची सीमा ठरवली होती. या निर्णयामुळे विमान कंपन्यांना त्यांच्या तिकिटांचे दर ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळेल, तसंच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सणासुदीच्या काळात स्वस्त तिकिटांचे प्रस्तावही देता येतील.

****

शिक्षक पात्रता घोटाळ्याप्रकरणी राज्यातल्या सात हजार ८८० शिक्षकांचं वेतन रोखण्यात आल्याच्या विरोधात हिंगोली जिल्ह्यातल्या तीन शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २० सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

****

गणेशोत्सवाला कालपासून सर्वत्र उत्साह आणि जल्लोषात प्रारंभ झाला. ढोलताशांच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यत आली. या वर्षी हा उत्सव कोविड प्रतिबंधांशिवाय पूर्ण उत्साहात साजरा केला जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गणेश चतुर्थीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या. श्रीगणेशाचा आशीर्वाद सदैव देशवासियांवर राहील, अशी आशा पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात व्यक्त केली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं राजभवनातलं निवासस्थान ‘जलभूषण’ इथं काल गणरायाचं वाजत गाजत आगमन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. राज्याच्या विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी बळ देण्यासह राज्यातल्या जनतेला सुखी-समृद्ध, समाधानी ठेवण्याचं मागणं मुख्यमंत्र्यांनी गणरायाला मागितलं. गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा जपतांनाच निर्भय आणि मुक्त वातावरणात, आनंद-जल्लोषात तसंच पर्यावरणपूरक वातावरणात हा उत्सव साजरा करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या घरी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करून प्रार्थना केली तसंच सर्वांना शुभेच्छा दिल्या. विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही गणेशमूर्तीचं पूजन करुन गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातही काल ढोल ताशांच्या ठेक्यात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह दिल्लीतल्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी तसंच गणेश भक्त यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

राज्यभरात सकाळच्या सुमारास घरोघरी गणपतींची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींच्या प्रतिष्ठापनेला सुरवात झाली. महा मुंबई मेट्रो कॉर्पोरेशननं यंदा पर्यावरण पूरक गणेश प्रतिमा साकारली आहे. आठ प्रकारची रोपं वापरत मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी ही गणेश प्रतिमा साकारली आहे.

औरंगाबाद शहरातही घरगुती गणपतींची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या निवासस्थानी गणपतीची षोडशोपचारे स्थापना केली. राज्यात ओढवलेल्या पूरस्थितीमुळे बळीराजाला लवकर मदत मिळू दे, महागाई कमी होऊ दे, असं साकडं दानवे यांनी गणरायाला घातलं आहे...ते म्हणाले....

‘‘गणरायाला हीच प्रार्थना आम्ही केली की, अतिवृष्टी झालेली आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांना लवकर मदत मिळू दे. महागाई प्रचंड वाढलेली आहे. जी एस टी पीठावर लागलेला आहे. पेट्रोल-डिझेल महागलेलं आहे. याचे सुद्धा दर कमी होऊ दे अशा प्रकारची प्रार्थना मी गणपती बाप्पाला केलेली आहे.’’

****

औरंगाबाद इथं जिल्हा गणेश महासंघ उत्सव समितीच्या गणपतीची स्थापना, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आली. सर्व शेतकरी, कामगार आणि कष्टकऱ्याला सुखी ठेव, असं साकडं भुमरे यांनी गणरायाला घातलं.

परळी इथं माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या गणपतीचंही काल सकाळी उत्साहात आगमन झालं, मुंडे यांनी सपत्निक गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली.

दरम्यान, राज्यभरात प्रामुख्याने मुंबई आणि परिसरातल्या घरोघरी बसलेल्या दीड दिवसांच्या गणपतींचं आज विसर्जन होणार आहे.

****

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे ‘नो युवर कस्टमर’  केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी सप्टेंबर-२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे काल झालेल्या बैठकीत, राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ही मागणी मान्य करत, ई-केवायसी प्रमाणीकरण आणि पोर्टलवर डेटा अपलोड करण्याकरता सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्यातल्या पात्र पीएम किसान लाभार्थ्यांचं ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी ग्राम पातळीवर मोहीम राबवली जात असून, आतापर्यंत चार लाख बेचाळीस हजार शेतकऱ्यांचं ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यात आलं आहे. उर्वरीत एकोणचाळीस लाख तेरा हजार लाभार्थ्यांना प्रत्यक्ष संपर्क करुन त्यांचं ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करून घेणार असल्याची माहिती सत्तार यांनी या बैठकीत दिली.

****

वक्फ मंडळाचं कार्यालय औरंगाबाद शहरातच राहणार असल्याचं वक्फ मंडळाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्जा यांनी सांगितलं. बोर्डाची तीन दिवसीय बैठक काल औरंगाबाद इथं सुरु झाली, त्यावेळी ते बोलत होते. २९१ संस्थांच्या नोंदणीस मंजुरी देण्यासह अनेक वर्षांपासून प्रलंबित मुतवल्लींच्या नेमणुका, मंडळात नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्तीचा ठराव काल या बैठकीत करण्यात आला. भूखंडमाफियांना लगाम लाऊन वक्फच्या जमिनी भाडेतत्वावर देऊन महसुलवाढीचा ठरावही यावेळी झाला.

****

उस्मानाबाद शहर पाणी पुरवठ्याच्या बिलाचे एक कोटी आठ लाख रुपये थकल्यामुळे उजनी धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याची वीज खंडित करण्याचा निर्णय महावितरणनं निर्णय स्थगित केला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात शहरावर येऊ पाहणारं पाणीटंचाईचं संकट आता टळलं आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्याशी चर्चा करून महावितरणला याबाबतीत सूचना करण्याची विनंती केली होती, तशी चर्चा झाल्यानंतर महावितरणनं वीज खंडित करणार नसल्याचं सांगितलं आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार सहाशे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, लाख ३८ झाली आहे. या संसर्गानं काल पाच रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार २४२ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल एक हजार ८६४ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ४१ हजार ४५८ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १० हजार ६३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ३३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

उस्मानाबाद जिल्ह्यात ११ रुग्णांची नोंद झाली. लातूर आठ, परभणी चार, औरंगाबाद तीन, जालना, बीड आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर हिंगोली जिल्ह्यात एक रुग्ण आढळला. 

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं हाँगकाँगवर ४० धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना, भारतीय संघानं विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर दोन गडी गमावत १९२ धावा केल्या. विराटने ४४ चेंडूत ५९ तर सूर्यकुमारने २६ चेंडूत ६८ धावा केल्या. त्यापूर्वी के एल राहुल ३६ तर कर्णधार रोहित शर्मा २१ धावांवर बाद झाले. प्रत्युत्तरादाखल फलंदाजीला आलेला हाँगकाँग संघ २० षटकांत पाच बाद १५२ धावाच करु शकला. सहा चौकार आणि सहा षटकारांची झंझावाती खेळी करणारा सूर्यकुमार सामनावीर ठरला. या विजयामुळे भारतीय संघ आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये दाखल झाला आहे.

****

जागतिक वरिष्ठ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा काल करण्यात आली. येत्या १० सप्टेंबरपासून सर्बिया इथं या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. १० सदस्य असलेल्या पुरुष फ्री स्टाईल संघाचं नेतृत्व राष्ट्रमंडळ खेळांत सुवर्णपदक प्राप्त विजेता बजरंग पुनिया करणार आहे.

****

पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाखेड इथं आयोजित शांतता समितीच्या बैठकीत गुट्टे यांनी पोलिस प्रशासनावर हप्ते घेण्याचा आरोप केल्यानं गुन्हा दाखल करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र जांबसमर्थ इथल्या पंचधातूच्या सहा मूर्ती चोरीला गेल्याच्या पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय जाधव यांनी काल घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. पोलिस लवकरच आरोपींना शोधून काढतील, ग्रामस्थांनी शांतता बाळगावी, पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहन जाधव यांनी यावेळी केलं.

****

No comments:

Post a Comment