Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 September
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०२ सप्टेंबर २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
·
आगामी काळात प्रत्येक स्पर्धा
परीक्षा मराठीतून घेण्याविषयीचं धोरण ठरवण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे राज्य सरकारला निर्देश
·
‘एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या आगळावेगळ्या राज्यस्तरीय उपक्रमाचा शुभारंभ, राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमाचाही प्रारंभ
·
कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला २५ लाख रुपयांचं इनाम
देण्याची घोषणा
·
कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय ६० वर्षापर्यंत वाढवण्याची महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची राज्य सरकारकडे मागणी
·
राज्यात दीड दिवसांच्या गणेशमुर्तींच विसर्जन
·
औरंगाबाद, जालना, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस, पैठणच्या जायकवाडी धरणाच्या विसर्गात आणखी वाढ
·
राज्यात कोविड संसर्गाचे नवे ७८१ रुग्ण, मराठवाड्यात १७ बाधित
आणि
·
जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा एच एस प्रणोय उपांत्य पूर्व फेरीत दाखल
****
आगामी काळात प्रत्येक स्पर्धा
परिक्षा मराठीतून घेण्याविषयीचं धोरण राज्य शासनाने ठरवावं, असे निर्देश मुंबई उच्च
न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. मराठीतून शिक्षण घेतलेल्या एका याचिकाकर्त्यानं
राज्य लोकसेवा आयोगाची मुख्य परिक्षा केवळ इंग्रजीमधून घेण्यात येत असल्याच्या विरोधात
उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर काल झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती
अरुण पेडणेकर यांनी राज्य शासनाला यासंदर्भात शपथपत्र दाखल करण्यास सांगितलं आहे, तसंच
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही राज्य शासनाशी सल्लामसलत करावी, असं सांगितलं आहे. या
याचिकेचं रुपांतर जनहित याचिकेमध्ये करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. यासंदर्भात
पुढची सुनावणी तीन ऑक्टोबरला होणार आहे.
****
कृषी विभागाच्या ‘एक दिवस
माझ्या बळीराजासाठी’ या आगळावेगळ्या
उपक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ, राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत, काल मेळघाटाच्या धारणी
तालुक्यातल्या साद्राबादी इथून करण्यात
आला. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी
यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं, यासाठी हे अभियान सुरू करण्यात
आलं असून, येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत ते सुरु राहणार आहे. या
उपक्रमातर्गंत कृषिमंत्री सत्तार यांनी शेतकरी दत्तात्रय पटेल यांच्या घरी मुक्काम केला.
तसंच त्यांनी पटेल यांच्या शेतावर उपस्थित राहून शेतीविषयक समस्या,
अडचणी, प्रश्न जाणून घेतले. धारणी पंचायत समिती कार्यालयासमोरच्या परिसरात १० हजार शेतकरी उत्पादक केंद्र स्थापन करण्याच्या योजनेचा,
तसंच ताप्तीपुत्र जैविक शेती मिशन शेतकरी
उत्पादक कंपनी कार्यालयाचा शुभारंभही, सत्तार यांच्या
हस्ते काल झाला.
****
राज्यात काल राष्ट्रीय
पोषण माह कार्यक्रमाचा शुभारंभ महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ठाण्यात झालेल्या राज्यस्तरीय
कार्यक्रमात बोलतांना लोढा यांनी, अंगणवाडी
सेविकांचं मानधन वाढवण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून, यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं
सांगितलं.
नांदेडमध्ये राष्ट्रीय पोषण अभियानाचा शुभारंभ जिल्हा
परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांच्या
हस्ते करण्यात आला. या अभियानाअंतर्गत जनजागृतीपर विविध कार्यक्रम घेण्यात येणार
असून, ते प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन घुगे यांनी यावेळी
केलं.
वाशिममध्येही बालविकास
प्रकल्प अधिकारी प्रियांका गवळी यांच्या मार्गदर्शनात अंगणवाडी कार्यकर्त्यांनी
पोषण रॅली काढली तसंच पोषण प्रतिज्ञा घेतली. यावेळी रानभाज्या शिबिर, पोषक
पाककृती प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं.
****
राष्ट्रीय
तपास यंत्रणा- एनआयएनं कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला २५
लाख रुपयांचं इनाम देण्याची घोषणा केली आहे. दाऊदचा हस्तक छोटा शकील वर २० लाख
रुपयांचं, तर त्यांच्या अन्य तीन हस्तकांची माहिती देणाऱ्यांसाठी, प्रत्येकी १५ लाख रुपयांचं बक्षीस घोषित करण्यात आलं असल्याचं, एनआयएनं सांगितलं आहे. दाऊद आणि त्याचे हस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावर
दहशतवादी कारवायांमधे सहभागी असून, लष्कर-ए- तय्यबा, अल कायदा आणि जैश ए मोहम्मद या संघटनांसाठी काम करत आहेत.
****
नागपुरात
दिव्यांगासाठी साकारण्यात येणाऱ्या दिव्यांग पार्कसाठी १२ कोटी रुपयांच्या निधीची
तरतूद करण्यात आली असून, त्याचं काम तीन महिन्यात चालू होईल, अशी घोषणा, केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी केली. केंद्रीय सामाजिक न्याय आणि
सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगाच्या सशक्तीरणासाठी, एडीप आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत, दिव्यांग
आणि ज्येष्ठांना साहाय्यक उपकरणांचं वितरण
करण्याच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. या शिबिरात सुमारे
सहा हजार ज्येष्ठ नागरिकांना तसंच दिव्यांगांना, ३४ हजार १३० सहाय्यक उपकरणांचं वाटप करण्यात येणार
असून, या उपकरणांची किंमत सुमारे पाच
हजार कोटी रुपये आहे. यातल्या काही लाभार्थ्यांना
प्रातिनिधिक स्वरूपात गडकरींच्या हस्ते साहाय्यक उपकरणांच वितरण करण्यात आलं.
****
महाराष्ट्र
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता
दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट
महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर आज दुपारी एक वाजता
जाहीर होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद,
मुंबई, कोल्हापूर, अमरावती,
नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय
मंडळामार्फत गेल्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात घेण्यात आल्या होत्या.
****
केंद्र सरकारच्या
कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वयही ६० वर्ष
करावं, अशी मागणी, महाराष्ट्र राज्य
राजपत्रित अधिकारी महासंघानं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. देशातलं वाढत वयोमान लक्षात
घेता केंद्र सरकारनं १९९८ साली, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचं
निवृत्तीचं वय ६० केलं होतं. त्याचं अनुकरण करत इतर २५ राज्यांनीही त्यांच्या
कर्मचाऱ्यांची निवृत्ती ६० वर्ष वयापर्यंत केलं होतं, मात्र
राज्यात हे वय केवळ ५८ आहे. या संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गेल्या
जुलै महिन्यात झालेल्या संयुक्त विचारविनिमय समितीच्या बैठकीत देखील निवृत्तीचं वय
वाढवण्याच्या विषयावर सकारात्मक चर्चा झाल्यामुळे लवकरात
लवकर निर्णय घ्यावा अशी मागणीही करण्यात या पत्रात करण्यात आली आहे.
****
मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या घरी भेट घेतली. प्रसारमाध्यमाशी
बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा
झाली नसल्याचं सांगितलं. गणपतीच्या दर्शनासाठी आपण राज ठाकरे यांच्याकडे आलो होतो, ही सदिच्छा भेट होती, असं ते म्हणाले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भारतीय
जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांची भेट घेतली होती.
****
राज्यात काल दीड
दिवसांच्या गणेशमुर्तींच विसर्जन झालं. ठाणे जिल्ह्यात ४२
हजार गणरायांना काल निरोप देण्यात आला. यात २४ सार्वजनिक तर ४१ हजार ८९५ घरगुती गणपतींचा समावेश
होता. राज्यभर आणि विशेषतः मुंबई, ठाणे. पुणे, नागपूर सारख्या महानगरात विसर्जनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता
पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतूकीच्या काही
मार्गातही बदल केले होते. राज्यात महानगरपालिका आणि काही खाजगी संस्थांच्या
माध्यमातून अनेक ठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली असून, निर्माल्य कलशही ठेवण्यात आले.
****
सांगली
जिल्ह्यात तासगावच्या श्री गणेशाचा २४३ वा रथोत्सव काल मोठ्या उत्साहात
साजरा करण्यात आला. हा रथोत्सव पाहण्यासाठी विविध राज्यातले शेकडो भाविक तासगाव
इथं आले होते. याबाबत अधिक माहिती देत आहेत सांगलीचे प्रतिनिधी रविंद्र कांबळे…
‘‘हा रथोत्सव पाहण्यासाठी विविध राज्यातले
शेकडो भाविक तासगाव इथं आले होते. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात
करण्यापूर्वी तासगाव मध्ये गणेशोत्सव आणि रथोत्सव साजरा केला जातो. मराठा साम्राज्याचे
सेनापती परशुराम पठवर्धन यांनी शके १७०० मध्ये तासगाव मध्ये उजव्या सोंडेच्या सिद्धीविनायकाची
प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून रथोत्सवाचा सोहळा साजरा केला जातो. तीन मजली लोखंडी
सागांड्यावर लाकडी कोरीव काम केलेल्या रथामध्ये १२१ किलो वजनाची पंचधातूची उत्सवमूर्ती
ठेवली जाते, रथाला जोडलेल्या दोराच्या सहाय्याने शेकडो भाविक हा रथ ओढतात. शहरातील
प्रमुख रस्त्यावरून ही मिरवणूक काढली जाते.’’
****
औरंगाबाद
जिल्ह्याच्या विविध भागात काल सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद शहर, खुलताबाद,
गल्ले बोरगाव, पैठण आदी ठिकाणी हा पाऊस झाला. वैजापूर
तालुक्यात पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अगरसायगाव, कनकसागज,
जांबरगाव इथं शेतातल्या मका आणि बाजरीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं.
जालना, बीड, हिंगोली जिल्ह्यातही
काल जोरदार पाऊस झाला.
****
राज्यात
येत्या दोन दिवसांत मराठवाडा, कोकण, मध्य
महाराष्ट्र, आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असंही हवामान
खात्याच्या पत्रकात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात
आणखी वाढ करण्यात आली आहे. धरणाचे १८ दरवाजे दीड
फुटावरुन दोन फुटावर स्थिर करण्यात आले असून, त्यातून नऊ हजार ४३२ आणि
सांडव्याद्वारे २८ हजार २९६, असे एकूण ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात
सोडलं जात आहे. पाण्याची आवक लक्षात घेता विसर्ग वाढवण्यात किंवा कमी करण्यात येईल,
असं पाटबंधारे विभागानं कळवलं आहे.
****
राज्यात काल
कोविड संसर्ग झालेले नवे ७८१ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण
संख्या, ८१ लाख ०१ हजार ११९ झाली आहे.
या संसर्गानं काल चार रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात
आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक
लाख ४८ हजार २५१ झाली असून, मृत्यूदर
एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल एक हजार ५२३ रुग्ण बरे
झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ४२
हजार ९८१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य पाच शतांश
टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९ हजार ८८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल १७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद आणि
लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी पाच, उस्मानाबाद चार, परभणी दोन, तर बीड जिल्ह्यातल्या
एका रुग्णाचा समावेश आहे.
****
जपानमध्ये
सुरु असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत काल भारताच्या एच एस प्रणोयनं
गतविजेत्या लो कियान येव चा २२ -२०, २१ - १९ असा पराभव करत
उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला. प्रणोयचा पुढचा सामना नुकत्याच पार पडलेल्या
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक पटकावणाऱ्या चाऊ तिएन चेन सोबत होणार आहे. तर भारताचा दुसरा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचं आव्हान काल संपुष्टात आलं. त्याला जपानच्या
केन्टा त्सुनेयामा यानं २१ - १०, २१ - १६ असं हरवलं.
****
उस्मानाबाद
इथं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त दैनिक तरुण
भारत आणि रुपामाता उद्योग समूहाच्या वतीनं आयोजित गणेशोत्सव व्याख्यानमालेचं काल उद्घाटन झालं. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग, या विषयावर ज्येष्ठ
विचारवंत डॉक्टर रमेश पांडव पहिलं पुष्प गुंफलं. सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक सुधाकर पाटील आणि माजी नगरसेवक रमण धोत्रीकर
यांचा विशेष कार्य गौरव यावेळी करण्यात आला
****
नांदेड जिल्ह्यात ५७५ गावांमध्ये
एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण तीन हजार ११६ सार्वजनिक
मंडळांनी गणेशाची स्थापना केली आहे. हिंगोली जिल्ह्यातही २६१ गावांमध्ये एक गाव एक
गणपती उपक्रम राबवण्यात येत आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जागजी
इथं अटल भूजल योजनेअंतर्गत पुरवठा आधारित रिचार्ज
शाफ्ट कामांचा शुभारंभ सरपंच लक्ष्मण बनसोडे यांच्या हस्ते
काल करण्यात आला. हे काम ५५ गावांत करण्यात
येणार असून, यामुळे भूजलाची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार
असल्याचं वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद
तालुक्यातल्या तुगांव आणि भूम तालुक्यातल्या समर्थ नगर इथं
होणारे बालविवाह रोखण्यात आले आहेत. महिला आणि बालविकास विभागाच्या
पथकाला बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी जाऊन मुलींच्या पालकांचं समुपदेशन केलं.
****
No comments:
Post a Comment