Saturday, 24 September 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.09.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 24 September 2022

Time 07.10 AM to 07.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २४ सप्टेंबर २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      अहमदनगर ते आष्टी हा रेल्वे मार्ग परळीपर्यंत नेण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

·      बारामतीचा विकास पक्षपाती पद्धतीनं सुरु असल्याची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची टीका

·      शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास शिवसेनेच्या ठाकरे गटाला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी

·      तमिळनाडूमध्ये चेन्नईजवळ आढळला सुमारे १२ हजार वर्षांपूर्वीचा शस्त्रनिर्मिती कारखाना

·      राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे ६११ रुग्ण;जनावरांमधला लम्पी रोगही आटोक्यात

·      भाजप आणि शिवसेनेचा शिंदे गट यापुढे सर्व निवडणुका एकत्रित लढवणार-भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

आणि

·      नागपूर इथला दुसरा टी ट्वेंटी सामना पावसामुळे प्रत्येकी आठ षटकांचा;भारताचा सहा गडी राखून विजय 

 

सविस्तर बातम्या

बीड जिल्हावासियांचं रेल्वेचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण झालं असून, हा रेल्वे मार्ग बीड आणि परळीपर्यंत नेण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. अहमदनगर ते आष्टी या ६६ किलोमीटर रेल्वेमार्गाचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे मार्गाचं पुढचं काम लवकर पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावरून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असं आश्वासन, मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. मराठवाड्यातला हा बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास नेल्याबद्दल मध्य रेल्वेच्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

आष्टी ते अहमदनगर हा रेल्वेमार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या ‘प्रगती योजनेअंतर्गत असलेल्या, अहमदनगर-बीड-परळी या २६१ किलोमीटर लांबीच्या ब्रॉडगेज प्रकल्पाचा एक भाग आहे. यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा प्रत्येकी ५० टक्के खर्चाचा वाटा आहे. ६६ किलोमीटर अंतराच्या या मार्गावर सहा स्थानकं आहेत. आठवड्यातून रविवार वगळता दररोज ही रेल्वे या मार्गावरून धावणार आहे. बहुप्रतिक्षित असलेल्या या रेल्वेमार्गाच्या लोकार्पण सोहळ्याला पंचक्रोशीतले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****

राज्यात पंचायतराज यंत्रणेमार्फत शाश्वत विकासाची उद्दिष्टं गाठणं आणि त्या विषयीच्या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याला प्राधान्य राहणार असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ही उद्दिष्टं साध्य करण्यासाठी आपलं राज्य आणि पंचायतराज संस्थांचं योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्रालय तसंच राज्यशासनाचा ग्राम विकास विभाग, यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या, राष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते. कार्यशाळेत ग्रामस्वच्छता आणि शुद्ध पाणी या विषयावर झालेल्या सखोल चर्चेचा फायदा, गावांमध्ये यासंदर्भातल्या योजनांची अंमलबजावणी आणि जाणीवजागृतीसाठी करता येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

****

बारामती मतदार संघाचा विकास पक्षपाती पद्धतीनं सुरु असून, भाजपाला समर्थन देणाऱ्या इथल्या नागरिकांना याचा अनुभव येत असल्याची टीका, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असलेल्या सीतारामन यांनी काल पुरंदर तालुक्याला भेट दिली. विकासाचा लाभ समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या आकांक्षी जिल्हा योजनेचं उद्दिष्ट आहे, घराणेशाहीचं समर्थन करणाऱ्या आणि भिन्न विचारधारेच्या नागरिकांमध्ये भेदभाव करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवादी बाणा यातून दिसून येत नाही, असं त्या म्हणाल्या. सीतारामन यांनी जेजुरी इथल्या खंडोबा मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, तसंच पुरंदरमधल्या पंचायत प्रतिनिधींशी स्थानिक प्रश्नांवर संवाद साधला. त्यानंतर त्यांनी मोरगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांची भेट घेतली.

****

मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला मुंबईत शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. याप्रकरणी काल झालेल्या सुनावणीत न्यायालयाने, मुंबई महानगरपालिकेनं आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचं निरीक्षणही नोंदवलं आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी, ठाकरे गटाच्या या याचिकेविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती, ही याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली. या निर्णयाचं राज्यभरात शिवसेनेकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शिवसैनिकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

****

रशिया आणि यूक्रेन यांच्यात सुरु असलेला संघर्ष थांबवण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश असलेली एक आंतरराष्‍ट्रीय समिती नेमण्याचा प्रस्ताव, मेक्सिकोनं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला दिला आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस,  पंतप्रधान नरेंद्र मोदी, पोप फ्रांसिस यांच्यासह मान्यवरांचा समावेश असलेली एक समिती नेमली जावी, असं मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री मार्सेलो एब्रॉर्ड यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांच्यात समरकंद इथं झालेल्या, शांघाय सहकार्य संघटनेच्या २२ व्या बैठकीदरम्यान झालेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर, हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडक भाषणांचं संकलन नवी दिल्लीतल्या आकाशवाणी भवनात काल प्रकाशित झालं. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास : प्रधानमंत्री नरेंद मोदी के भाषण असं या पुस्तकाचं नाव आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. पंतप्रधानांनी मे २०१९ पासून मे २०२० पर्यंत केलेल्या ८६ भाषणांचा समावेश या पुस्तकात आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी २५ सप्टेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ९३ वावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

तमिळनाडूमध्ये चेन्नईजवळ मध्य पाषाण युगातला सुमारे १२ हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन शस्त्रनिर्मिती कारखाना आढळला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं केलेल्या उत्खननात या ठिकाणाहून कुऱ्हाडी, लांब सुरे, तसंच इतर काही शस्त्रं सापडली आहेत. यासोबतच सोन्याचे दागिने तसंच नाणी, बांगड्यांचे तुकडे, भांड्यांचे तुकडे, मातीची भाजलेली खेळणी सापडली आहेत. पल्लव काळातल्या काही मूर्तीही या ठिकाणी आढळल्या आहेत. या सर्व वस्तूंसोबतच प्राचीन रोमन काळातली दोन मुठींची सुरई आणि काचेचे मणीही सापडल्याने, या भागाचा रोम शी व्यापार होत असल्याचे संकेत मिळत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला चार वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, उद्या रविवारी आरोग्य मंथन २०२२चं, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे. या योजनेअंतर्गत गरिब कुटुंबांना पाच लाख रुपयांचा विमा देण्यात येतो. देशात दहा कोटींपेक्षा जास्त गरीब कुटूंबांना या योजनेचा लाभ देण्याचं उद्दीष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१८ या योजनेचा शुभारंभ केला होता.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ६११ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख १८ हजार १८५ झाली आहे. काल या संसर्गानं दोन रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार ३२४ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल ६८७ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ६६ हजार ८२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या तीन हजार ७७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

राज्यात जनावरांमधला लम्पी रोग आटोक्यात येत असून, एकूण सहा हजार ७९१ जनावरं उपचारानं बरे झाले आहेत, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी ही माहिती दिली. राज्यात ३० जिल्ह्यांत आतापर्यंत एकूण १९ हजार १६० जनावरांना या रोगाची बाधा झाली आहे. आतापर्यंत चार हजार ८५० पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रात लसीकरण सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यात लम्पी आजाराविषयी पशुसंवर्धन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तालुक्यात रोगाचं केंद्र असलेल्या भागाच्या पाच किलोमीटरच्या परिसरात लसीकरण करण्याबाबत कार्यवाही सुरू असून, सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या संस्थाप्रमुखांना दक्ष राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पशुपालकांनी गोठ्यांची स्वच्छता, जनावरांची सायपरमेथ्रीन, डेल्टामेथ्रीन, सारख्या औषधांची फवारणी करून गोठ्यांमध्ये लिंबाच्या पानांचा धुर करणं, अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. नांदेड जिल्ह्यात लम्पी बाधित पशुधनाची संख्या ८७ झाली आहे. आतापर्यंत ८४ हजार ९६८ पशुधनाचं लसीकरण झालं आहे.

****

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा शिंदे गट यापुढे सर्व निवडणुका एकत्रित लढवणार असल्याचं, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात, राज्यात लोकसभा निवडणुकीत किमान ४५, आणि विधानसभा निवडणुकीत किमान २०० जागांवर विजय मिळवू, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ६०८ पैकी ३३५ सरपंच हे भाजपा - शिवसेना शिंदे गटाच्या युतीचे आहेत. आपल्याकडे या सर्वांची नावं तसंच पक्षातल्या पदांसह पूर्ण माहिती आहे. या बाबतीत जे कोणी राजकीय पक्ष वेगळे दावे करत आहेत त्यांनी सविस्तर यादी जाहीर करण्याचं आव्हान बावनकुळे यांनी दिलं.

मराठवाडा वॉटरग्रीड आणि समुद्रात जाणारं पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी मराठवाड्याकडे वळवणं, या कामांवर शिंदे - फडणवीस सरकारने भर दिला आहे, याबद्दल त्यांनी सरकारचं अभिनंदन केलं.

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नाराजीबद्दल कपोलकल्पित बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत, मात्र त्या खंबीरपणे पक्षाचं काम करत असल्याचं बावनकुळे यांनी नमूद केलं.

****

राज्यात महिनाभरात सार्वत्रिक निवडणुका घेऊन दाखवण्याचं आव्हान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे, ते भाजपानं स्वीकारावं, असं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक जिल्ह्यात मनमाड इथं बातमीदारांशी बोलत होते.

****

नागपूर इथं काल झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवला. पावसामुळे हा सामना आठ षटकांचा करण्यात आला होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा संघाने आठ षटकांत पाच बाद ९० धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल भारताने सात षटकं आणि दोन चेंडूत चार गड्यांचा मोबदल्यात हे आव्हान पूर्ण केलं. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत आहेत. मालिकेतला शेवटचा सामना उद्या हैदराबाद इथं खेळला जाणार आहे.

****

हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आणि आमदार सतीश चव्हाण यांच्यातर्फे काल औरंगाबाद इथं ‘नरहर कुरुंदकर - एका विचारवंताची अपरिचित गोष्ट या अभिवाचनाचा प्रयोग झाला. अजय अंबेकर यांची संकल्पना आणि लेखन असलेल्या या  कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****

'आई-वडील, ज्येष्ठ नागरिक आणि पालक देखभाल तसंच कल्याण कायदा २००७' मधल्या तरतुदींबाबत, ज्येष्ठ नागरिकांमध्ये जागरूकता होण्याची आवश्यकता, औरंगाबादचे उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे यांनी व्यक्त केली आहे. यशवंतराव चव्हाण केंद्राच्या औरंगाबाद जिल्हा केंद्राच्या वतीनं काल औरंगाबाद इथं ज्येष्ठ नागरिक कायदा जनजागृती कार्यशाळेत ते बोलत होते. ज्येष्ठ नागरिकांना त्यांची मुलं सांभाळत नसल्यास, त्यांची तक्रार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे असलेल्या प्राधिकरणाकडे करण्याची तरतूद आहे, तसंच या माध्यमातून त्यांना सांभाळण्याचा मासिक भत्ता देखील मिळवण्याची तरतूद आहे, या सर्व प्रक्रियेचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यायला हवा, तसंच अन्य ज्येष्ठ नागरिकांना त्याबद्दलची माहिती द्यायला हवी असं मोरे यांनी सांगितलं.

****

No comments:

Post a Comment