Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 04 October 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४
ऑक्टोबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
येत्या ५०० दिवसात देशभरात २५ हजार नवे दळणवळण मनोरे उभारण्यासाठी केंद्र शासनानं ३६ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत, असं
माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे.
नवी दिल्लीत झालेल्या सर्व राज्यांच्या माहिती
तंत्रज्ञान मंत्र्यांच्या डिजिटल इंडिया परिषदेच्या समारोप सोहळ्यात
आज ते बोलत होते. मनोरे उभारण्यात येणाऱ्या ठिकाणांची यादी राज्यांसोबत
समन्वयानं तयार करण्यात आली असून यावर पुनर्विचार होऊ शकतो असं मंत्री वैष्णव यांनी सांगितलं. डिजिटल इंडिया निर्माण करण्यासाठी
देशाच्या प्रत्येक काना कोपऱ्यात मनोऱ्यांची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले. राज्यांना भांडवली खर्चापोटी दोन हजार कोटी रुपयांची विशेष मदत मंजूर
करण्यात आली असून राज्यांनी उद्योग वाढवण्यासाठी अनुकुल
धोरण तयार करावं, असं मंत्री वैष्णव यांनी यावेळी सांगितलं.
***
तंत्रज्ञानाचा विकास झाल्यामुळे प्रसारण सेवांचा किफायतशीरपणा आणि समावेशकतेमध्ये
आणखी सुधारणा करणं शक्य होईल असं भारतीय दूरसंवाद नियामक
प्राधिकरण ट्रायचे सचिव राजारामन यांनी म्हटलं आहे. स्थापनेला २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल
ट्राय नं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या प्रसारण क्षेत्रात उदयाला येणारे कल या चर्चासत्रात
ते बोलत होते.
महामारीच्या काळात प्रसारण क्षेत्रानं बजावलेली भूमिका दूरसंवाद विभागाचे सचिव राजारामन यांनी यावेळी अधोरेखित केली.
या चर्चासत्राचं उद्घाटन ट्रायचे अध्यक्ष डॉक्टर पी डी वाघोला यांच्या हस्ते करण्यात
आलं. प्रसारण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे इतर विविध क्षेत्रात नवी क्षितिजं
आणि नवी दालनं खुली होणार असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा
यावेळी म्हणाले.
***
राज्यातल्या सर्वच जिल्ह्यात होणारी वाळू चोरी थांबवून शासनाचा
महसूल वाढावा यासाठी राज्यशासन लवकरच वाळू बाबत
नवीन धोरण अवलंबणार असल्याचं राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण
विखे पाटील यांनी म्हटलं आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरमध्ये
आज पत्रकारांशी ते बोलत होते. वाळूच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या बेकायदेशीर उपशामुळे
चंद्रभागा नदीपात्रात अनेक खोल खड्डे तयार झाले आहेत.
या खड्ड्यांमध्ये अनेक वारकऱ्यांचा मृत्यू झाला. ही बाब गंभीर असल्याचं सांगून
त्यांनी वाळू लिलाव जाहीर नसताना राज्यात कुठेही वाळू चोरी होत असेल
तर त्या ठिकाणच्या तलाठी, मंडळ अधिकारी तसंच तहसीलदार यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याची
सूचना महसूलमंत्री विखे पाटील यांनी यावेळी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना
दिल्या. वाळू धोरणाचा अभ्यास करण्यासाठी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे
यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
***
कोणाचाही आधार नसताना शेती करून कुटुंब चालवणाऱ्या तसंच महिला बचत गटाच्या माध्यमातून
महिला सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या उस्मानाबाद मधल्या महिला, डॉक्टर, शिक्षिका, वकील यांचा राष्ट्रवादी
महिला काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी नवदुर्गा सन्मानपत्र देऊन काल सत्कार करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
***
लातूर - उदगीर रस्त्यावरील लोहारा गावाजवळ राज्य
परीवहन महामंडळाची एस टी बस आणि एका मोटार गाडीच्या झालेल्या
अपघातात मोटारगाडीतील पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
उदगीरमधील एका बाल रुग्णालयातील पाच कर्मचारी तुळजापूरहून
देवदर्शन करून परत येताना हा अपघात झाला. या अपघातात मोटारगाडीचा
चालक आणि इतर दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर दोघांचा दवाखान्यात नेत
असतांना
रस्त्यात मृत्यू झाला. मृतात तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
***
जम्मू काश्मिरच्या कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत कुमार लोहिया यांचा
मृतदेह रहस्यमय परिस्थितीत त्यांच्या निवासस्थानी काल आढळला. त्यांचा सेवक फरार असून
या सेवकानं त्यांची हत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीसांनी या प्रकरणी
तपास सुरु केला असून फरार असलेल्या सेवकाचा शोध घेण्यात येत असल्याचं जम्मू क्षेत्राचे
अप्पर पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितलं आहे.
***
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत
२१८ कोटी ८० लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. काल ३ लाख ४४ हजारांहून अधिक
नागरिकांचं लसीकरण झालं. दरम्यान, काल नव्या
एक हजार ९६८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३ हजार ४८१ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ३४ हजार ५९८ रुग्णांवर उपचार सुरु
आहेत.
//**********//
No comments:
Post a Comment