Tuesday, 4 October 2022

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.10.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०४ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

लातूर जिल्हयात महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर आणि सादरीकरण सत्र येत्या १४ तारखेला घेण्यात येणार आहे. शहरातल्या औसा रस्त्यावरील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन इथे हे सत्र घेण्यात येईल. या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचं संकेतस्थळ www.msins.in यावर नोंदणी करावी असं आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रानं केलं आहे.

***

राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक म्हणून जयश्री भोज यांची नियुक्ती झाली आहे. भोज यांनी काल दीपक कपूर यांच्याकडून महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला.

***

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या सातव्या फेरीला विद्यार्थ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे प्रवेशासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित तर तीन विशेष प्रवेश फेऱ्या घेण्यात आल्या आहेत. काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्यानं, सतत विशेष फेरी सुरू करण्यात आली असून, ही फेरी १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.

***

नंदुरबार पोलीसांनी कापसाच्या शेतात गांजाची शेती उद्वस्त केली असून या शेतातून जवळपास ११२ किलो गांजाची झाडे जप्त केली आहेत. शहादा तालुक्यातील सटापाणी गावात एका कापसाच्या शेतात गाजांच्या शेती बद्दलची माहिती पोलीसांना मिळाली. त्यावरुन त्यांनी ही कारवाई केली.

***

शेती व्यवसाय करतांना होणाऱ्या विविध अपघातामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावल्यास किंवा त्यांना अपंगत्व आल्यास संबंधित शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेमार्फत विमाछत्र प्रदान करण्यात येतं.  नांदेड जिल्ह्यात २०१८पासून आजपर्यंत ३९५ वारसदारांच्या खात्यावर ७ कोटी ४८ लाख रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे.

//**********//

No comments:

Post a Comment