▼

Sunday, 23 October 2022

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २३ ऑक्टोबर २०२२ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ ऑक्टोबर २०२२ सकाळी ११.०० वाजता

****

ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेकरिता मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतिबंध अंतिम करण्यासाठी  गठीत करण्यात आलेल्या समितीच्या  अध्यक्षपदावर  सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची निवड करण्यात आली आहे. शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर केले आहेत अशा सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदं वगळता अन्य पदं ५० टक्के भरण्यासही अनुमती देण्यात आली आहे.

****

राज्यात आतापर्यंत अतिवृष्टीमुळे ३७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल ५ हजार ९१ जनावरं दगावल्याची माहिती एका वृत्तसंस्थेनं दिली आहे. राज्यात पुढील पाच दिवस पावसाची चिन्हे नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

****

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकार हिची १९ वर्षांखालील इंडिया ए संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली आहे. १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय आयोजित महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या चॅलेंजर ट्रॉफी साठी ही निवड करण्यात आली आहे.

****

 उत्तर महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रातील भीष्माचार्य  डॉ.भाईदास पाटील यांचं वृद्धापकाळामुळे काल धुळे इथं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते.त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

****

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाचा काल मृत्यू झाला. काल रात्री ही घटना घडली. या पार्श्वभूमीवर पोलिसांची अतिरिक्त कुमक पुणे रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आली आहे.

//***********//

No comments:

Post a Comment