Sunday, 2 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.10.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  02 October  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ ऑक्टोबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      महात्मा गांधी आणि पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी.

·      खाद्यतेलांवरच्या आयात शुल्क सवलतीला ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ.

·      राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा समारोप; तसंच हॅलोऐवजी वंदे मातरम् अभियानाचा प्रारंभ.

आणि

·      रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्या औरंगाबाद आणि जालना इथं पीटलाईनची पायाभरणी.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५३ वी जयंती तर देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची ११८ वी जयंती आज साजरी होत आहे. या निमित्तानं या दोन्ही राष्ट्रपुरुषांना देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन केलं जात आहे.

आज नवी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधी स्थळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा घेण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसंच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गांधीजी आणि शास्त्रीजींना ट्विट संदेशाद्वारेही आदरांजली वाहिली. भारतात हरित आणि धवल क्रांती घडवण्यात शास्त्रीजींनी मोठं योगदान दिलं, शास्त्रीजींची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी देशातल्या नागरिकांसाठी एक प्रेरणास्रोत आहे, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

 

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात, यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, गांधी जयंतीला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचं म्हटलं आहे. सर्वांनी बापूजींच्या आदर्शांचं पालन करावं. बापूंना श्रद्धांजली वाहायची असेल तर खादी आणि देशात तयार केलेल्या हस्तशिल्पाच्या वस्तू खरेदी कराव्यात, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

शास्त्रीजींच्या जयंती दिनी पंतप्रधानांनी दिल्लीतील पंतप्रधान संग्रहालयातली लाल बहादूर शास्त्रीजींची काही छायाचित्रं ट्विटरवर सामायिक केली. शास्त्रीजींचा जीवनप्रवास आणि पंतप्रधान म्हणून साध्य केलेली कामगिरी त्यातून दिसते. या संग्रहालयाला भेट द्यावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी लाल बहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहिली. साधेपणा, सौम्य व्यक्तिमत्व आणि अत्यंत सहजतेनं जगाला भारताच्या शक्तीची जाणीव करून देणाऱ्या आणि जय जवान-जय किसान चा नारा देऊन देशात नवीन ऊर्जेचा संचार करणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांना कोटी कोटी प्रणाम असं, अनुराग ठाकूर यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

राज्यातही आज गांधीजी आणि शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात येत असून विविध कार्यक्रम होत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन इथं गांधीजी आणि शास्त्रीजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महात्मा गांधी आणि शास्त्रीजींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सोलापूर इथं या दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

 

सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्य लढ्याशी जोडून बापूजींनी तो लढा खऱ्या अर्थाने एका मोठ्या जनआंदोलनात परावर्तित केला असल्याचं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.राष्ट्रपिता माहात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आज वर्धा इथं राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा समारोप तसंच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ नद्यांची परिक्रमा, हॅलोऐवजी वंदे मातरम् अभियानाचा प्रारंभ उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी जाणिवेने काम केलं जात आहे म्हणून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा सर्वार्थाने औचित्यपूर्ण असल्याचं फडणवीस म्हणाले.

 

नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज साजरी करण्यात आली. सहाय्यक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी या दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

औरंगाबाद इथं महानगरपालिकेच्या वतीने शहागंज इथं महात्मा गांधी यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर मनपा मुख्यालयात शास्त्रीजींच्या प्रतिमेस आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

महात्मा गांधी अभिमत विद्यापीठाच्या वतीनं स्वच्छता अभियान, संगीत आणि स्वदेशी वसन महोत्सव, रक्तदान शिबीर, तसंच तंत्रज्ञान आणि कल्पक प्रकल्पांच्या माध्यमातून गांधीजी, आणि शास्त्रीजींना यांना आदरांजली वाहण्यात आली.

 

औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया, मराठवाडा ट्रेड अँड चेंबरचे, सचिव जगन्नाथ काळे, यांच्यासह व्यापारी संघटनांच्या वतीने गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

 

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या वतीनं आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचं वितरणही आज करण्यात आलं.

****

परभणी इथं महात्मा गांधी जयंती निमित्त “फिट इंडिया फ्रीडम रन” घेण्यात आली. सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी हिरवा झेंडा दाखवून या दौडची सुरुवात करण्यात आली. नागरिक मोठ्या संख्येनं या दौडमध्ये सहभागी झाले.

****

बुलडाणा जिल्ह्यात गांधी जयंती निमित्त अभिवादनासह विविध कार्यक्रम घेण्यात आले. शाळांमध्ये विद्यार्थी स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2022 आणि जल जीवन अभियान कामगिरी मूल्यमापन पुरस्कार प्रदान करण्यात आले. छोटे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अंदमान आणि निकोबारला प्रथम पुरस्कार मिळाला. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार दादरा नगर हवेली आणि दीव दमणला प्राप्त झाला असून सिक्कीम राज्याला तिसरा पुरस्कार मिळाला आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील तीन लाख गावांमध्ये घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनाचे काम सुरू असल्याचं राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी सांगितलं.

****

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने खाद्यतेलांवरील आयात शुल्काची सवलत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत तेलाचा पुरवठा वाढवणं आणि किंमती नियंत्रणात ठेवणं, हा या निर्णयामागचा उद्देश आहे. खाद्यतेलाचे जागतिक स्तरावरील घसरलेले दर आणि कमी आयात शुल्क यामुळे भारतातही खाद्यतेलाच्या किरकोळ किंमतीतही मोठी घसरण झाली आहे.

****

‘प्रगतीकडून पर्यावरण रक्षणाकडे’ या मुंबई ते डेहराडून पर्यावरण जागृती सायकल यात्रेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन इथून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. ६७ वर्षीय ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि हिमालय पर्यावरण अध्ययन आणि संवर्धन संस्थेचे संस्थापक डॉ अनिल प्रकाश जोशी या सायकल यात्रेचं नेतृत्व करत आहेत. या यात्रेमध्ये १५ जण सहभागी झाले असून ही यात्रा ४० दिवसांत दहा हजार लोकांशी संपर्क साधेल तसंच एक कोटी लोकांना निसर्ग रक्षणाचा संदेश देत दोन हजार किलोमीटर अंतर पार पडणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं. 

****

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उद्या औरंगाबाद आणि जालना दौऱ्यावर येत आहेत. औरंगाबाद आणि जालना रेल्वे स्थानकांवर कोच देखभाल सुविधांच्या विकासासाठी पीटलाईनची पायाभरणी रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. औरंगाबाद रेल्वेस्थानकावर सकाळी साडे नऊ वाजता तर जालना रेल्वे स्थानकावर सकाळी साडे अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यावेळी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठीचं आवश्यक नियोजन रेल्वे विभागाकडून करण्यात येत आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेला आज श्री तुळजाभावानी देवीची भवानी तलवार अलंकार पूजा मांडण्यात आली. नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर भवानी तलवार अलंकार महापूजा झाली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन धर्म रक्षणासाठी भवानी तलवार देऊन आशीर्वाद दिला असं मानलं जातं, या घटनेची आठवण म्हणून ही पूजा मांडण्यात येते.

****

३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रोलिंग प्रकारात महाराष्ट्राच्या विपुल घरटे आणि ओंकार म्हस्के यांनी रौप्य पदक पटकावलं. राज्याचं या प्रकारात हे पहिलंच पदक आहे. नाशिकच्या मृण्मयी साळगावकरने महिलांच्या एकेरी स्कलमध्ये अंतिम फेरी गाठत एक पदक निश्चित केलं आहे. जिम्नॅस्टिक्समध्ये इशिता रावळेनं कांस्य पदक मिळवलं.

****

No comments:

Post a Comment