Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 October 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३
ऑक्टोबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
देशाच्या सर्व भागात वंदे भारत रेल्वे
सुरु केल्या जाणार असून, मराठवाड्यातल्या लातूर शहरातल्या रेल्वे डबे निर्मिती कारखान्यात, या
वंदे भारत रेल्वे डब्यांची निर्मिती केली जाणार असल्याचं, केंद्रीय
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. औरंगाबाद रेल्वे स्थानकात रेल्वे पीटलाईनचं
भुमिपूजन आज वैष्णव यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री
रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, औरंगाबादचे खासदार इम्तियाज
जलिल, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास
दानवे यावेळी उपस्थित होते.
भारत गौरव यात्रेअंतर्गत महाभारत आणि शिर्डीच्या साईबाबा संकल्पनेवर आधारित रेल्वे सुरु करण्यात आल्या असून, भारताच्या संस्कृतीवर आधारित आणखी काही
भारत गौरव यात्रा रेल्वे सुरु करण्याचा सरकारचा विचार असल्याचं
वैष्णव यांनी सांगितलं.
देशात दर दिवशी १४ किलोमीटर रेल्वेमार्ग
नव्यानं तयार करण्यात येत आहे. ६० हजार
कोटी रुपये खर्चून देशातल्या २०० रेल्वे स्थानकांचा विकास सुरु आहे. पुढील पन्नास वर्षांचा विचार करुन हा विकास करण्यात येत असून,
स्थानिक उत्पादनांना वाव मिळण्यासाठी सर्व रेल्वे
स्थानकांवर रुफ प्लाझा तयार करण्यात येणार असल्याचं देखील
वैष्णव यांनी यावेळी सांगितलं.
गतीशक्ती योजनेअंतर्गत महामार्ग, हवाईमार्ग आणि जिथे रेल्वेनं जोडायचं आहे तिथं मराठवाड्यातले सर्व जिल्हे जोडण्यात येणार असल्याचं वैष्णव
यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी आतापर्यंत ११ हजार कोटी रुपये निधी देण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
यावेळी बोलताना रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी, १८० कोटी रुपये खर्च करुन औरंगाबाद रेल्वे स्थानकाचा आणि १६७ कोटी रुपये खर्च
करून जालना रेल्वेस्थानकाचा विकास करण्यात येणार असल्याचं सांगितलं.
औरंगाबाद रेल्वे विभाग मध्य रेल्वेशी जोडण्यात
यावा, औरंगाबाद
ते अहमदनगर रेल्वेमार्ग मंजूर करण्यात यावा, औरंगाबाद-कन्नड-चाळीगाव
रेल्वेमार्गाचं सर्वेक्षण करण्यात यावं, तसंच मुंबई ते नागपूर
बुलेट ट्रेन साठी जागा अधिग्रहित केली असून त्यास मंजूरी देण्यात
यावी, आदी मागण्या अर्थ राज्यमंत्री
भागवत कराड यांनी यावेळी केल्या.
औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या विकासासाठी
रेल्वेचं जाळं विस्तारण्यात यावं, आणि परताव्याचा विचार न करता रेल्वेचा विकास करण्यात
यावा, अशी मागणी खासदार जलिल यांनी यावेळी केली. तर
१६ कोच ऐवजी २४ कोच ची पिटलाईन करण्याची मागणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली.
जालना रेल्वे स्थानकात देखील पीटलाईनचं भुमिपूजन वैष्णव
यांच्या हस्ते आज होत आहे.
****
राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट
करण्यासाठी सराकरचं सर्वोच्च
प्राधान्य असून आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी दिली. एका खासगी वृत्तवाहिनीच्या ‘स्वस्थ बनेगा इंडिया’ या कार्यक्रमात ते बोलत
होते. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय
महाविद्यालय सुरू करणं, राज्यभर सुमारे ७००, ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणं, बाल आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत करणार
असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं
२१८ कोटी मात्रांचा
टप्पा पार केला आहे. काल एक लाख ७० हजार २३४ नागरीकांचं लसीकरण झालं.
दरम्यान, देशात काल नव्या तीन हजार ११ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर चार हजार
३०१ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ३६
हजार १२६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ह्यूमन - अफ्रोह
या संघटनेच्या वतीने ज्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर नेमले गेले, अशा कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं राज्यव्यापी उपोषण मागे घेतलं आहे. नागपूर इथं हे उपोषण सुरु होतं,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उपोषणकर्त्यांना भेट देऊन या
मागण्यांच्या संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण
मागे घेण्यात आलं.
****
सरकारने राज्यातल्या ग्रंथालय कर्मचाऱ्यांचं अनुदान वेळेत वितरित करण्याचं आवाहन महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचे अध्यक्ष सदाशिव बेडगे
यांनी केलं आहे. ग्रथालयांना मिळणारं ३०
कोटी अनुदान तसंच ६० टक्के वाढीव अनुदानाची
फाईल सरकारकडे प्रलंबित असल्याचं बेडगे यांनी यासंदर्भातल्या
पत्रात म्हटलं आहे.
****
स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती आज साजरी होत आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ उद्धव भोसले
यांनी स्वामीजींच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण
करुन अभिवादन केलं.
****
गुजरातमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा
स्पर्धेत आज झालेल्या स्क्वॉश स्पर्धेत महाराष्ट्र संघाने तेलंगणा संघाला तीन
- शून्य असं हरवून उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे.
//**********//
No comments:
Post a Comment