Monday, 3 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.10.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  03 October    2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ ऑक्टोबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      लातूर इथल्या रेल्वे डबे निर्मिती कारखान्यात वंदे भारत रेल्वे डब्यांची बांधणी-रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा; औरंगाबाद तसंच जालना रेल्वे स्थानकात पीटलाईनची पायाभरणी.

·      राज्यात ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्याला सर्वोच्च प्राधान्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

·      पीएफआयवर बंदीचा नक्षलवाद्यांकडून विरोध; तर पीएफआयचे दहशतवाद्यांशी लागेबांधे उघड.

आणि

·      महिला टी ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत भारताचा मलेशियावर ३० धावांनी विजय.

****

देशाच्या सर्व भागात वंदे भारत रेल्वे सुरु केल्या जाणार असून, मराठवाड्यातल्या लातूर इथल्या रेल्वे डबे निर्मिती कारखान्यात, या वंदे भारत रेल्वे डब्यांची बांधणी केली जाणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली. औरंगाबाद इथं रेल्वे स्थानकात रेल्वे पीटलाईनचं भुमिपूजन आज वैष्णव यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

भारत गौरव यात्रेअंतर्गत महाभारत आणि शिर्डीच्या साईबाबा संकल्पनेवर आधारित रेल्वे सुरु करण्यात आल्या असून, भारताच्या संस्कृतीवर आधारित आणखी काही भारत गौरव यात्रा रेल्वे सुरु करण्याचा सरकारचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

देशात दर दिवशी १४ किलोमीटर रेल्वेमार्ग नव्यानं तयार करण्यात येत आहे. ६० हजार कोटी रुपये खर्चून देशातल्या २०० रेल्वे स्थानकांचा विकास सुरु आहे. पुढील पन्नास वर्षांचा विचार करुन हा विकास करण्यात येत असल्याचं, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

 

स्थानिक उत्पादनांना वाव मिळण्यासाठी सर्व रेल्वे स्थानकांवर रुफ प्लाझा तयार करण्यात येणार असल्याचं देखील वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. गतीशक्ती योजनेअंतर्गत महामार्ग, हवाईमार्ग आणि जिथे रेल्वेनं जोडायचं आहे तिथं मराठवाड्यातले सर्व जिल्हे जोडण्यात येणार असल्याचं वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी आतापर्यंत ११ हजार कोटी रुपये निधी देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी बोलताना रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी, १८० कोटी रुपये खर्च करुन औरंगाबाद रेल्वे स्थानकाचा आणि १६७ कोटी रुपये खर्च करून जालना रेल्वेस्थानकाचा विकास करण्यात येणार असल्याचं सांगितलं.

औरंगाबाद रेल्वे विभाग मध्य रेल्वेशी जोडण्यात यावा, औरंगाबाद ते अहमदनगर रेल्वेमार्ग मंजूर करण्यात यावा, औरंगाबाद-कन्नड-चाळीगाव रेल्वेमार्गाचं सर्वेक्षण करण्यात यावं, तसंच मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन साठी जागा अधिग्रहित केली असून त्यास मंजूरी देण्यात यावी, आदी मागण्या अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी यावेळी केल्या.

औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या विकासासाठी रेल्वेचं जाळं विस्तारण्यात यावं, आणि परताव्याचा विचार न करता रेल्वेचा विकास करण्यात यावा, अशी मागणी खासदार जलील यांनी यावेळी केली. तर १६ कोच ऐवजी २४ कोचची पिटलाईन करण्याची मागणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यावेळी केली

 

जालना रेल्वेस्थानकाच्या परिसरात कोच देखभाल सुविधांसाठी उभारण्यात येत असलेल्या पीटलाईनची पायभरणी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झाली. जालना स्थानकाचा मॉडेल स्थानक म्हणून दोनशे कोटी रूपये खर्चून महानगरातील स्थानकाप्रमाणे विकास होणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे, आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

राज्यात ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही दिली. राज्यभरात सुमारे ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार असून, मुंबईत ५० ठिकाणी कालपासून ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असून, खासगी संस्थांच्या मदतीने आरोग्याच्या पायाभूत सुविधांचं बळकटीकरण करण्यावर भर दिला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया–पीएफआय’ या वादग्रस्त संघटनेवर केंद्र सरकारने घातलेल्या बंदीचा नक्षलवादी संघटनांनी विरोध केला आहे. याबाबत नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने केंद्र सरकारला पत्र पाठवून दुर्बलांवर अत्याचाराचा आरोप केला आहे.  बंदीचा हा निर्णय क्रूर असून हिंदुत्त्वाच्या अजेंड्याचा भाग असल्याचं नक्षलवाद्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

 

दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए आणि दहशतवाद विरोधी पथक एटीएसने अटक केलेल्या पीएफआयच्या हस्तकांच्या चौकशीतून नवनवे खुलासे समोर येत आहेत. औरंगाबाद इथून पकडण्यात आलेल्या पीएफआय हस्तकाच्या तपासातून या संघटनेचे दहशतवाद्यांशी लागेबांधे असल्याचं समोर आलं आहे. शारिरीक प्रशिक्षणाच्या नावाखाली या हस्तकांना दहशतवादाचं शिक्षण देण्यात येत असल्याचं निष्पन्न झालं आहे. पीएफआयच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून व्यवहार झाल्याचा दावाही एटीएसने न्यायालयात केला आहे.

****

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज स्वदेशी हलके लढाऊ हॅलिकॉप्टर्स वायू सेनेमध्ये समाविष्ट करुन घेतले. राजस्थानात जोधपूर वायू सेना केंद्र इथं झालेल्या या कार्यक्रमात ही हेलिकॉप्टर्स वायू सेनेत सामील केल्यामुळे वायू सेनेची युद्धाची क्षमता वाढेल, तसंच हे स्वावलंबी भारताकडे टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले.

****

स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती आज साजरी होत आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांनी स्वामीजींच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

परवा साजरा होणाऱ्या सहासष्टाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्ताने आज नागपूर इथं दीक्षाभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि भिक्खू संघाच्या नेतृत्वात धम्मदीक्षा सोहळा पार पडला. यावेळी शेकडो नागरिकांनी बौद्ध धम्मदीक्षा घेतली. आज पासून सुरू झालेला हा धम्मदीक्षा सोहळा ३ दिवस चालणार आहे.

****

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानातंर्गत औरंगाबाद विमानतळावर आज “स्वच्छता ही सेवा” मोहीम राबवण्यात आली. भारतीय विमानतळ प्राधिकरण, एअर इंडिया आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी कर्मचारी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांनी विमानतळाचा परिसर स्वच्छ केला. त्यानंतर उपस्थित सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली.

****

महिला टी ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाने मलेशिया संघाचा ३० धावांनी पराभव केला. बांगलादेशात सुरू असलेल्या या मालिकेत आज मलेशिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत, निर्धारित २० षटकांत चार बाद १८१ धावा केल्या. मलेशिया संघाने या धावसंख्येचा पाठलाग करताना दोन बाद १६ धावा केल्या असताना, सहाव्या षटकात पाऊस सुरू झाल्याने खेळ थांबवावा लागला. अखेरीस डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे भारतीय संघाला ३० धावांनी विजयी घोषित करण्यात आलं.

****

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष खो-खो संघानं उपांत्य फेरीत कर्नाटक संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महाराष्ट्र संघानं उपांत्य लढत २६-२४ एक डाव आणि ४ अशी जिंकली.

महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीराम हिने महिलांच्या तीन मीटर्स स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. तिने स्प्रिंग बोर्ड वरून सूर मारताना अचूकता आणि लवचिकता याचा सुरेख समन्वय दाखवीत सर्वांना मंत्रमुग्ध केले. याच क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या ईशा वाघमोडे हिने कांस्य पदक पटकावलं.

****

इंडोनेशियात बाली इथं नुकत्याच झालेल्या तिसऱ्या जागतिक पिकलबॉल अजिंक्यपद स्पर्धेत औरंगाबदच्या अनुराग कुलकर्णी यानं एकेरी लढतीत रौप्यपदक तर दुहेरीत अनुराग आणि कृष्णा मंत्री जोडीनं कांस्यपदक पटकावलं. या यशाबद्दल या दोघांचं औरंगाबादच्या क्रीडाविश्वातून अभिनंदन होत आहे. पिकलबॉल खेळासाठी प्रशिक्षक अरविंद प्रभू, निखिल माथूरे, यशोधन देशमुख, महेश परदेशी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केलं आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं शारदीय नवरात्रोत्सवात आज आठव्या माळेला श्री तुळजाभावानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा बांधण्यात आली. दैत्यांचा राजा महिषासुराने स्वर्गातून सर्व देवतांना हाकलून दिले त्यावेळी पार्वतीचा अवतार असलेल्या तुळजाभवानी मातेने महिषासुराचा वध केल्याची आख्यायिका आहे. या पौराणिक घटनेचं स्मरण म्हणून तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते.

****

No comments:

Post a Comment