Tuesday, 4 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.10.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  04 October  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ ऑक्टोबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      शिधापत्रिकाधारकांना राज्य सरकारचं दिवाळी पॅकेज; शंभर रुपयात मिळणार रवा, साखर, चणा डाळ आणि तेल.

·      कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या ११ हजार ७३६ कोटी ९१ लाख रुपयांच्या सुधारित खर्चाला मान्यता.

·      अनुदानास अपात्र ठरवलेल्या १९१ शाळांना १५ दिवसांत त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश.

आणि

·      नवरात्रौत्सवाचा उद्या विजया दशमीनं समारोप; साईबाबांच्या शतकोत्तर चौथ्या पुण्यतिथी उत्सवाला प्रारंभ.

****

राज्यातल्या शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत दिवाळी पॅकेज देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या पॅकेजमध्ये प्रत्येकी एक किलो रवा, हरभरा डाळ, साखर आणि तेल हे पदार्थ असतील. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेचा लाभ राज्यातल्या एक कोटी सत्तर लाख कुटुंबांना होणार आहे. खाद्यवस्तूंचा हा संच एक महिन्याच्या कालावधीकरता देण्यात येईल आणि त्याचं वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ४८६ कोटी ९४ लाख रुपये खर्चालाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देण्यासाठी या प्रकल्पाच्या ११ हजार ७३६ कोटी ९१ लाख रुपयांच्या सुधारित खर्चाला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परांडा, भूम, वाशी, कळंब, तुळजापूर, लोहारा, आणि उमरगा तर बीड जिल्ह्यातल्या आष्टी या आठ दुष्काळी तालुक्यांना फायदा होणार आहे.

पोलिस दलातल्या अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देण्याचा, तसंच नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाला गती देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

आपत्ती व्यवस्थापनातल्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला.

****

सरकारकडून विविध योजनांमार्फत वस्तू किंवा सेवा, मोफत किंवा अनुदानित किमतीला दिल्या जाण्याविषयी भारतीय स्टेट बँकेनं सावधानतेचा इशारा दिला आहे. अशा उपाययोजनांमुळे साधन संपत्तीचं गैरव्यवस्थापन तसंच खुल्या बाजारातल्या दरांमधे चढउतार अशा समस्या उद्भवतात आणि त्याचा आर्थिक फटका बसतो, असं स्टेट बँकेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. कोणत्याही राज्याच्या अशा प्रकारच्या कल्याणकारी योजनांची व्याप्ती, त्या राज्याच्या एकूण कर महसुलाच्या एक टक्का, किंवा राज्याच्या स्थूल अंतर्गत उत्पादनाच्या एक टक्का असावी, याकरता सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्त्वात विशेष समिती नेमावी असंही स्टेट बँकेनं या अहवालातून सुचवलं आहे.

****

गेल्या सरकारच्या कार्यकाळात त्रुटींमुळे अनुदानास अपात्र ठरवलेल्या १९१ शाळांना अनुदान देण्याची एक संधी राज्य सरकारने देऊ केली आहे. तसंच दोनशेहून अधिक शाळांच्या वाढीव तुकड्यांनाही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. संबंधित शाळांना १५ दिवसांत त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. खासगी प्राथमिक, माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडून फेरप्रस्ताव मागवून त्यांना अनुदान देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली आहे. यामध्ये औरंगाबाद, लातूर, पुणे, अमरावती, नागपूर, मुंबई, नाशिक, कोल्हापूर विभागातल्या शाळांचा समावेश आहे. या शाळांना पहिल्या टप्प्यात २० टक्के अनुदान मिळणार आहे. दुसरीकडे ६७ प्राथमिक तसंच माध्यमिक शाळांचं अनुदान ४० टक्के केलं जाणार आहे. या अनुदानापोटी सरकारला दरवर्षी अंदाजे दीडशे ते दोनशे कोटी रुपयांचा भार सहन करावा लागेल.

****

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयानं सक्त वसुली संचालनालय-ईडीने दाखल केलेल्या एका प्रकरणात आज जामीन मंजूर केला, मात्र, ईडीने या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं सांगितल्यावर उच्च न्यायालयानं या जामिनाला येत्या तेरा तारखेपर्यंत स्थगिती दिली असल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

दरम्यान, देशमुख यांना ईडीच्या गुन्ह्यात हा जामीन मिळाला असला तरीही, केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मिळालेला नाही, त्यामुळे सध्या देशमुख यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका होण्याची शक्यता नसल्याचंही वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यानं केलेल्या शंभर कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपाखाली, तसंच काळा पैसा वैध केल्याप्रकरणी अनिल देशमुख यांना ईडी आणि सीबीआयनं अटक केली होती. गेल्या अकरा महिन्यांपासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

****

नवरात्रौत्सवाचा उद्या विजया दशमीनं समारोप होत आहे. आज महानवमीला ठिकठिकाणी षड्‌रस भोजनाचा नेवैद्य दाखवून घटोत्थापन केलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या जनतेला महानवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दसरा हा सण वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींचा विजय दर्शवतो, तसंच लोकांचा धर्मावरचा किंवा नैतिकतेवरचा विश्वास जागृत करतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विविध माध्यमातून साजरा होतो. शारदीय नवरात्रौत्सवाचं उत्थापन, सरस्वती पूजन, शस्त्रपूजा दिन, सीमोल्लंघनाचा दिवस, या पारंपरिक सांस्कृतिक कारणांबरोबरच राजकीय आणि सामाजिक संघटनांचे महत्त्वाचे कार्यक्रमही या दिवशी होत असतात.

विजयादशमीनिमित्त मुंबईत शिवसेनेचे दोन्ही गट उद्या वेगवेगळे मेळावे घेणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातला गट शिवसेनेच्या परंपरेनुसार शिवाजी मैदानावर दसरा मेळावा घेणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातला गट बांद्रा कुर्ला संकुलातल्या मैदानात आपला पहिला दसरा मेळावा घेणार आहे.

****

श्री संत साईबाबा यांच्या शतकोत्तर चौथ्या पुण्यतिथी उत्सवाला आजपासून शिर्डी इथं प्रारंभ झाला. हा उत्सव येत्या सात तारखेपर्यंत साजरा केला जाणार आहे. या उत्सवानिमित्त आज साईप्रतिमा, पोथी आणि वीणेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी श्री साईचरित्र या ग्रंथाच्या अखंड पारायणालाही सुरुवात झाली. अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सपत्निक साईबाबांची पाद्यपूजा केली. या उत्सवानिमित्त समाधी मंदिर उद्या दसऱ्याला दिवसा आणि रात्रीही सुरू राहणार आहे.

****

बांगलादेशात सुरू असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने संयुक्त अरब अमिरात संघावर १०४ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत, वीस षटकांत पाच बाद १७८ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करणारा युएईचा संघ वीस षटकांत चार बाद ७४ धावाच करू शकला.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या तीन ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज इंदूर इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल. या मालिकेत भारतानं याआधीच दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह, पाठीच्या दुखापतीच्या कारणामुळे येत्या सोळा तारखेपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

****

लातूर - उदगीर रस्त्यावरील लोहारा गावाजवळ राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस आणि एका चारचाकी गाडीच्या झालेल्या अपघातात चार चाकीतल्या पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. उदगीरमधील एका बाल रुग्णालयातील पाच कर्मचारी तुळजापूरहून दर्शन घेऊन परत येताना हा अपघात झाला. या अपघातात मोटारगाडीचा चालक आणि इतर दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर दोघांचा दवाखान्यात नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला. मृतात तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.

****

वंजारी समाजाला भटक्या जमाती प्रवर्गातून इतर मागासवर्गीय प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी या समाजातल्या तरुणांनी शासनाचा पाठपुरावा करावा, असं आवाहन भाजपा नेते ज्ञानोबा मुंढे यांनी केलं आहे. संत भगवान बाबा विवेक विचार मंचच्या वतीनं औरंगाबाद शहरात वंजारी समाज विचार मंथन मेळावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

****

No comments:

Post a Comment