Tuesday, 4 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.10.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 October 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      औरंगाबाद आणि जालना थल्या रेल्वे पीटलाईनचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते भुमिपूजन, लातूरच्या रेल्वे डबे निर्मिती कारखान्यात, वंदे भारत रेल्वे डब्यांच्या बांधणीची घोषणा   

·      राज्यभरात ७०० बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानासुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      मुंबईतल्या  अंधेरी- पूर्व विधानसभा मतदारसंघासह देशभरातल्या ६ विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

·      भोकर तालुक्याजमिनीतून येणाऱ्या गूढ आवाजांची भूकंप मापक यंत्रावर कोणतीही नोंद नाही, नागरिकांनी घाबरून जाण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

·      राष्ट्रीय क्रीडा स्पर्धे६० पदकं मिळवत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर, धावपटू संजीवनी जाधवच्या सुवर्णपदकाबाबत आज निर्णय होणार  

·      भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान आज इंदुरमध्ये तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना

आणि

·      आशिया चषक महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा मलेशियावर ३० धावांनी विजय

****

औरंगाबाद आणि जालना थल्या रेल्वे पीटलाईनचं भुमिपूजन काल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं. यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यानिमित्तानं औरंगाबाद शहरात झालेल्या कार्यक्रमाच्यात बोलतांना मंत्री वैष्णव यांनी देशाच्या सर्व भागात वंदे भारत रेल्वे सुरु केल्या जाणार असून, मराठवाड्यातल्या लातूरच्या रेल्वे डबे निर्मिती कारखान्यात, या वंदे भारत रेल्वे डब्यांची बांधणी केली जात असल्याचं सांगितलं. ते म्हणाले…

“मराठवाडा के लातूर की फैक्टरी में वंदेभारतका निर्माण होगा, ऑलरेडी इसकेलिए टेंडर निकल चुका है. ऑलरेडी इसके जो मशीने लगनी है वो मशीने लगनेका काम चालू हो गया है, ऑलरेडी फैक्ट्रीमे मॉडिफिकेशन्स का काम चालू हो गया है और मराठवाडा मे भी हम सबके लिए बहोत बडे गर्व की बात है की वर्ल्डक्लास रेंज बनेंगी मराठवाडामें और नेश्चितही मराठवाडाके कोने कोने को, महाराष्ट्रके कोने कोने को भी वंदे भारत जोडेगी.’’

गतीशक्ती योजनेअंतर्गत महामार्ग, हवाईमार्ग आणि जिथे रेल्वेनं जोडायचे आहेत तिथे मराठवाड्यातले सर्व जिल्हे जोडण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. १८० कोटी रुपये खर्च करुन औरंगाबाद रेल्वे स्थानकाचा आणि १६७ कोटी रुपये खर्च करून जालना रेल्वेस्थानकाचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिली. देशात भारत गौरव यात्रेअंतर्गत महाभारत आणि शिर्डीच्या साईबाबा संकल्पनेवर आधारित रेल्वे सुरु करण्यात आल्या असून, भारताच्या संस्कृतीवर आधारित आणखी काही भारत गौरव यात्रा रेल्वे सुरु करण्याचा सरकारचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं. स्थानिक उत्पादनांना वाव मिळण्यासाठी सर्व रेल्वे स्थानकांवर रुफ प्लाझा तयार करण्यात येणार असल्याची माहितीही वैष्णव यांनी यावेळी दिली.

अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आपल्या भाषणात औरंगाबाद रेल्वे विभाग मध्य रेल्वेशी जोडण्यात यावा, औरंगाबाद ते अहमदनगर रेल्वेमार्ग मंजूर करण्यात यावा, औरंगाबाद-कन्नड-चाळीसगाव रेल्वेमार्गाचं सर्वेक्षण करण्यात यावं, तसंच मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन साठी जागा अधिग्रहित केलेली असून त्यास मंजुरी देण्यात यावी, आदी मागण्या केल्या.

खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या भाषणातून औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या विकासासाठी रेल्वेचं जाळं विस्तारण्यात यावं, आणि परताव्याचा विचार न करता रेल्वेचा विकास करण्यात यावा, अशी मागणी केली. औरंगाबाद रेल्वे स्थानकावर १६  ऐवजी २४ यानांची पीटलाईन करण्याची मागणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यावेळी केली

जालना शहरात झालेल्या कार्यक्रमात बोलतांना रेल्वेमंत्री वैष्णव यांनी जालना रेल्वे स्थानकाचा आदर्श स्थानक म्हणून दोनशे कोटी रूपये खर्चून विकास केला जात असल्याचं सांगितलं.

****

राज्यात ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही दिली. राज्यभरात सुमारे ७०० बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानासुरू करणार असून, मुंबईत ५० ठिकाणी कालपासून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानासुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असून, खासगी संस्थांच्या मदतीनं आरोग्याच्या पायाभूत सुविधांचं बळकटीकरण करण्यावर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

मुंबईतल्या अंधेरी- पूर्व विधानसभा मतदारसंघासह देशभरातल्या ६ विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या ७ ऑक्टोबरला निवडणुकीची अधिसूचना जारी होईल. १४ ऑक्टोबरपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ३ नोव्हेंबरला मतदान तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे.

****

राज्यातील लम्पी बाधितांपैकी ५० टक्के पशुधन रोगमुक्त झाल्याचं पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितलं आहे. विविध जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत लसीच्या  १०९ लाख ३१ हजार मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून १०५ लाख ६२ हजार जनावरांचं मोफत लसीकरण करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. अकोला, जळगांव, कोल्हापूर, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झालं असल्याची माहिती सिंह यांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यात ९१४ जनावरांना या रोगाची लागण झाली, त्यापैकी ६० जनावरं दगावली तर ५७६ जनावरं रोगमुक्त झाली आहेत.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे २८० रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख २२ हजार ४३२ झाली आहे. काल या संसर्गानं कोणाचाही  मृत्यू झाला नाही. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार ३४४ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल ३५७ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ७१ हजार ३४३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन हजार ७३९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या ५ तर  औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

****

स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती काल साजरी झाली. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांनी स्वामीजींच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

अंबाजोगाई इथं योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या महात्मा गांधी अध्ययन केंद्रांच्या वतीने गांधी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. काल स्वामी रामानंद तीर्थ जयंती निमित्त लातूर इथले डॉ. राजशेखर सोलापुरे यांनी स्वामीजींच्या विचार आणि कार्यावर प्रकाश टाकला. स्वामीजींच्या द्रष्टेपणामुळे मराठवाडयात शिक्षणाचा प्रसार झाला, असं मत डॉ सोलापुरे यांनी व्यक्त केलं.

****

मराठा समाजाला इतर मगासवर्गीय - ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी बीड जिल्ह्यातल्या शिरुर कासार इथं काल सकल मराठा समाजाच्यावतीनं मोर्चा काढण्यात आला. बीड, जालना, उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेडसह अहमदनगर आणि इतर जिल्ह्यातून मराठा समाजाचे नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. आपल्या विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदार श्रीराम बेंडे यांना यावेळी देण्यात आलं.

****

माजी कुलगुरु डॉक्टर सुधीर गव्हाणे यांना आंतरराष्ट्रीय हवामान रक्षक- प्रोटेक्टर ऑफ क्लायमेट हा पुरस्कार घोषित झाला आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर एज्युकेशनल डेव्हलपमेंट या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या परिषदेनं या पुरस्काराची घोषणा केली आहे.

****

मुंबईतल्या केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा बाबुराव सामंत संघर्ष पुरस्कार औरंगाबादमधील सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोमटे यांना जाहीर झाला आहे. ५० हजार रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या १५ तारखेला मुंबईत लोमटे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

****

नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यातील पांडुर्णा, बोरगडवाडी, समुद्रवाडी या परिसरात जमिनीतून येणाऱ्या गूढ आवाजांची भूकंप मापक यंत्रावर कोणतीही नोंद नसल्याचं स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठातील तज्ज्ञांनी म्हटलं आहे. अशा पद्धतीची कंपनं  भूजल पातळीत होणाऱ्या पुनर्भरण अथवा उपसा यामुळे निर्माण होणाऱ्या हायड्रोस्टॅटिक दबावामुळे होत असल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे.

****

गुजरातमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत ६० पदकं मिळवत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. यात १४ सुवर्ण, १५ रौप्य तर ३१ कांस्यपदकांचा समावेश आहे. काल महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीराम हिनं महिलांच्या तीन मीटर्स स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. याच क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या ईशा वाघमोडे हिने कांस्य पदक पटकावलं. भारोत्तोलन मध्ये अहमदनगरची खेळाडू कोमल वाकळे हिने ८७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. तिनं स्नॅच मध्ये ९४ किलो तर क्लीन आणि जर्कमध्ये ११६ किलो असे एकूण २१० किलो वजन उचललं.

जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत महिला गटात राही पखालेनं सुवर्णपदक जिंकले तर सिद्धी ब्रीड हिनं कांस्य पदक जिंकलं.

ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आदर्श भोईरनं सुवर्णपदक पटकावलं. ट्रॅम्पोलिन प्रकाराचा प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आलेला आहे.

जलतरण स्पर्धेत महिला संघानं चार बाय शंभर मीटर्स मिडले रिले शर्यतीत रुपेरी कामगिरी केली. हॉकी स्पर्धेतील पुरुषांच्या गटात महाराष्ट्रानं यजमान गुजरात संघाचा २०-१ अशा फरकानं पराभव  केला. तलवारबाजीईप्पी प्रकारात पुरुष संघानं रौप्यपदक तर मुलींच्या संघानं फॉइल प्रकारात कांस्य पदक पटकावलं. टेनिस मध्ये ऋतुजा भोसले आणि वैष्णवी आडकर यांनी महिलांच्या दुहेरीत अंतिम फेरी गाठली आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव हिच्या सुवर्णपदकाचा आज निर्णय होणार आहे. काल सकाळी झालेल्या दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत संजीवनीनं सुवर्णपदक जिंकलं. मात्र, हरियाणाच्या संघ व्यवस्थापनानं तिच्या पदकाबाबत आक्षेप घेतला आणि त्यानंतर तिला तांत्रिक कारणास्तव शर्यती मधून बाद करण्यात आलं. मात्र, महाराष्ट्र संघ व्यवस्थापनानं या निर्णयाबाबत अपील केलं असून त्यासंदर्भात आज तांत्रिक समितीची बैठक होणार आहे.

****

इंडोनेशियात बाली इथं नुकत्याच झालेल्या तिसऱ्या जागतिक पिकलबॉल अजिंक्यपद स्पर्धेत औरंगाबादच्या अनुराग कुलकर्णी याने एकेरी लढतीत रौप्यपदक तर दुहेरीत अनुराग आणि कृष्णा मंत्री जोडीनं कांस्यपदक पटकावलं. या यशाबद्दल या दोघांचं औरंगाबादच्या क्रीडाविश्वातून अभिनंदन होत आहे.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला अखेरचा तिसरा सामना आज इंदूर इथं होणार आहे. मालिकेतले पहिले दोन्हीही सामने जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, आशिया चषक महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल भारतीय महिला संघानं मलेशिया संघावर ३० धावांनी विजय मिळवला. बांगलादेशात सुरू असलेल्या या मालिकेत काल मलेशिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत, निर्धारित २० षटकांत चार बाद १८१ धावा केल्या. मलेशिया संघाने या धावसंख्येचा पाठलाग करताना दोन बाद १६ धावा केल्या असताना, सहाव्या षटकात पाऊस सुरू झाल्याने खेळ थांबवावा लागला. अखेरीस डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे भारतीय संघाला ३० धावांनी विजयी घोषित करण्यात आलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं शारदीय नवरात्रोत्सवात आज महानवमी निमित्त दुपारी १२ वाजता होमहवनादि धार्मीक विधी, घटोत्थापन तसंच अहमदनगरहून येणाऱ्या पलंग पालखीची रात्री मिरवणूक होणार आहे. काल जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते सपत्निक शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली

दरम्यान, काल आठव्या माळेला तुळजाभावानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा बांधण्यात आली. दैत्यांचा राजा महिषासुराने स्वर्गातून सर्व देवतांना हाकलून दिलं त्यावेळी पार्वतीचा अवतार असलेल्या तुळजाभवानी मातेने महिषासुराचा वध केल्याची आख्यायिका आहे. या पौराणिक घटनेचं स्मरण म्हणून तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते.

अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीच्या नवरात्रोत्सवात काल पुर्णाहूती झाली. अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर आणि त्यांचे पती नवीन केल्लोड यांनी योगेश्वरी देवीची विधीवत महापूजा केली. दरम्यान राज्यभरातून विशेषत: कोकणातून भाविक मोठ्या संख्येनं योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी अंबाजोगाई इथं दाखल होत आहेत. देवल कमिटीच्या वतीनं भाविकांना विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महानवमीनिमित्त आज ठिकठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये घटोत्थापनेसह विविध धार्मिक विधी होणार आहेत.

****

उद्या साजऱ्या होणाऱ्या सहासष्टाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्तानं काल नागपूर इथं दीक्षाभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि भिक्खू संघाच्या नेतृत्वात धम्मदीक्षा सोहळा पार पडला.

****

No comments:

Post a Comment