▼

Friday, 21 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.10.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  21 October  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ ऑक्टोबर २०२२   सायंकाळी ६.१०

****

·      शेतकऱ्यांच्या कायमस्वरुपी विकासासाठी विशेष कृती आराखडा-मुख्यमंत्र्यांची घोषणा.

·      अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक विकासासाठी बचत गटांच्या निर्मितीला मान्यता.

·      दीपावलीनिमित्त औरंगाबादसह सहा ठिकाणी “लखलख चंदेरी” कार्यक्रमाचं आयोजन.

आणि

·      जादा भाडे आकारणाऱ्या खाजगी वाहतुकदारांविरुध्द कारवाई करण्याचे बीड उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे निर्देश.

****

शेतकऱ्यांचा कायमस्वरुपी विकास व्हावा यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नाशिक सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या मदत योजनांचा आढावा घेतला. ते म्हणाले –

जे तातडीचे पाच हजार रूपये आपण देत होतो, घरांमध्ये नुकसान झालं, धान्य भिजलं, कपडे भिजले, तिथे देखील आपण पंधरा हजार केले. हे केवळ शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपण करतोय. हे तर नुकसान भरपाईचं झालं. परंतू कायमस्वरूपी, शेतकऱ्यांना यामध्ये फायदा झाला पाहिजे यासाठी देखील सरकार आपलं, विशेष कृती आराखडा तयार करतीयेय.

छत्रपती शाहू महाराज, संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ‘सारथी’ या संस्थेच्या नाशिक विभागीय कार्यालयाचं उद्‌घाटनही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी, तरुणांचे भविष्य घडवण्याचं उदात्त धोरण अंगीकारणाऱ्या सारथी संस्थेला शासनामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल, असं आश्वासन दिलं.

****

अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक विकासासाठी १५ जिल्ह्यांमध्ये नवीन २ हजार ८०० बचत गटांची निर्मिती करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. यात मराठवाड्यातल्या औरंगाबाद, हिंगोली, जालना, उस्मानाबाद, लातूर, बीड या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याच बरोबर, ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या विशेष मोहिमेत महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी प्रत्येक जिल्ह्याला २ कोटी रुपये निधी देण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातल्या १८ वर्षांवरील महिला, माता तसंच गर्भवतींची आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्यात येणार आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच महिलांच्या आरोग्याकडेही राज्य सरकार लक्ष देत असल्याचं भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटलं आहे.

****

केंद्रीय अन्वेषण विभाग- सीबीआय या तपास यंत्रणेला राज्यात कारवाई करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही, असा निर्णय शासनानं घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने २१ ऑक्टोबर २०२० रोजी राज्यात कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयने राज्य सरकारची परवानगी घेणं आवश्यक असल्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सीबीआयला राज्यात पुन्हा तपास करण्याचे अधिकार मिळाले आहेत.

****

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. गोरेगाव इथल्या पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालय - ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर राऊत यांनी जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने जामीन अर्जावर निर्णय न देत, पुढची सुनावणी दोन नोव्हेंबरला ठेवली आहे. त्यामुळे राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत दोन नोव्हेंबरपर्यंत वाढ झाली आहे.

****

१०० कोटी कथित वसुली प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय कोर्टाने फेटाळला आहे. देशमुख यांना या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयानं ईडी प्रकरणात जामीन मंजूर केला होता. सीबीआयकडे दाखल प्रकरणात देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र देशमुख हे जामीनावर सुटल्यास या प्रकरणातल्या पुराव्याबरोबर छेडछाड करु शकतात असं म्हणत सीबीआयने त्यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला होता. देशमुख यांना गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली आहे.

****

आज पोलिस स्मृती दिन. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख इथं चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या दहा पोलिसांनी प्राणाची आहुती दिली होती. तेव्हापासून २१ ऑक्टोबर हा दिवस ‘पोलिस हुतात्मा दिन’ म्हणून पाळण्यात येतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली इथल्या राष्ट्रीय पोलिस स्मृति स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं.

मुंबईत नायगाव पोलिस मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा पोलिसांच्या स्मृतीस अभिवादन केलं.

अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं पोलीस मुख्यालयातील स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यात आलं. जिल्ह्यातल्या हुतात्मा झालेल्या २६१ पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांना जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं हवेत २१ फैरी झाडून अभिवादन करण्यात आलं.

****

परतीच्या पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं हेक्टरी ५० हजार रुपयांची भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. राज्य सरकारनं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट भरीव मदत जाहीर करावी, तसंच, विमा कंपन्यांनी खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानापोटी पीक विम्याची रक्कम तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

****

पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानासाठी परभणी जिल्ह्यात सहा तालुक्यांतल्या आठ मंडळात ७३ हजार ८१४ सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना ४० कोटी ७१ लाख १२ हजार रुपये एवढी अग्रीम विमा भरपाई मंजूर करण्यात आली आह लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा रक्कम जमा करण्यास कंपनीकडून सुरुवात झाली असल्याचं, जिल्हा माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

                                   ****

नांदेड जिल्ह्यात हंगामातल्या प्रतिकूल परिस्थितीनुसार नुकसानीच्या पंचवीस टक्के आगाऊ पीक विमा मंजूर झाल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी या पिकांसाठी जवळपास ४०० कोटी रुपये नुकसान भरपाई रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.

****

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दीपावलीनिमित्त राज्यात औरंगाबाद, मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर आणि अमरावती या सहा ठिकाणी “लखलख चंदेरी” या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. दीपावली पहाट आणि दीपावली संध्या या स्वरूपात हा कार्यक्रम होणार आहे. औरंगाबाद इथं २५ आणि २६ तारखेला हा कार्यक्रम होणार आहे. शहरातल्या तापडिया नाट्यमंदिरात २५ तारखेला संध्याकाळी ६ वाजता दीपावली संध्या कार्यक्रमात अभिजीत कोसंबी, अभिषेक नलावडे, दीपाली देसाई, संज्योती जगदाळे यांच्यासह इतर कलाकार सहभागी होणार असून, २६ तारखेला सकाळी ६ वाजता दीपावली पहाट या कार्यक्रमात मंगेश बोरगांवकर आणि रसिका नातू आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून रसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन मुनगंटीवार यांनी केलं आहे.

****

बीड जिल्ह्यात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जादा बस भाडे आकारणाऱ्या खाजगी प्रवासी बस वाहतुकदारांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांनी दिले आहेत. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात आज जिल्हा प्रवासी बस वाहतूक संघटनेची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. दिवाळी सणानिमित्त एसटी महामंडळाच्या बस भाड्याच्या दीड पटीपेक्षा अधिक भाडे आकारु नये यासोबतच प्रवासी वाहतुक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतुक करु नये आदी सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

****

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या ब गटातील पात्रता सामन्यात आयर्लंड संघानं वेस्ट इंडीजचा ९ गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर वेस्ट इंडीज संघाचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी ५ गडी बाद १४६ धावा केल्या. विजयासाठी दिलेल्या १४७ धावांचं आव्हान आयर्लंडनं १७ षटकं तीन चेंडूत १ गडी गमावून पूर्ण केलं.

****

No comments:

Post a Comment