▼

Saturday, 22 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.10.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  22 October    2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ ऑक्टोबर २०२२   सायंकाळी ६.१०

****

·  प्रत्येक भारतीयाला मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी केंद्र सरकार कट्टीबद्ध-राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन.

·      राज्यात पोलीस दलातील १८ हजार जागांसाठी लवकर भरती-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस.

·      पीएफआय या बंदी घातलेल्या संघटनेच्या हस्तकाला जळगाव इथून अटक.

·   विधान परिषदेच्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी भाजपकडून किरण पाटील यांना उमेदवारी जाहीर.

आणि

·      आज धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमधून ग्राहकांची मोठी गर्दी.

****

प्रत्येक भारतीयाला मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी केंद्र सरकार कट्टीबद्ध असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राष्ट्रीय रोजगार मेळाव्याच्या उद्‌घाटन प्रसंगी दूरदृष्य प्रणाली द्वारे संवाद साधत होते. रोजगार मेळावा या कार्यक्रमांतर्गत देशभरातल्या ७५ हजार तरूण-तरूणींना केंद्र सरकारने नोकरीची नियुक्तीपत्र दिली. येत्या काळात फाइव्ह जी सेवेमुळे डिजिटल क्षेत्रात असंख्य रोजगार उपलब्ध होतील, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

मध्य प्रदेशात सतना इथं झालेल्या गृहप्रवेशम् कार्यक्रमात पंतप्रधान आभासी माध्यमातून सहभागी झाले. आजचा दिवस गृहप्रवेशासाठी अत्यंत शुभ असून, आपल्या हक्काच्या घराच्या गृहस्वामिनी झालेल्या महिलांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, पुणे इथं यशवंतराव चव्हण विकास प्रशासन प्रबोधिनी इथं आयोजित कार्यक्रमात केंद्रीय सुक्ष्म आणि लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते २०४ तरूण-तरूणींना नियुक्तीपत्र देण्यात आली.

****

राज्यात येत्या वर्षात ७५ हजार युवकांना नोकरी दिली जाणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज नागपूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. केंद्र सरकारकडून पुढील १८ महिन्यात १० लाख तरुणांना विविध शासकीय विभागामध्ये नोकरी दिली जाणार आहे, दीपोत्सवाच्या औचित्यावर आज झालेल्या रोजगार मेळाव्यात नागपूर इथं २१३ युवकांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

दरम्यान, लवकरच राज्यात पोलीस दलातील १८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून आठवडाभरात त्यासंदर्भात जाहिरात काढली जाईल, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले –

७५ हजार लोकांची भरती येत्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही पूर्ण करू. पुढच्या आठ दिवसांमध्ये १८ हजार पोलिसांच्या भरतीची आम्ही त्या ठिकाणी जाहिरात काढतो आहोत. त्याचप्रमाणे ग्रामविकासामध्ये दहा हजारांची भरती करणार आहोत. वेगवेगळ्या विभागांमधली भरती ते आता आम्ही सुरु केलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीमध्येही आमच्या तरुणाईला संधी देण्याचं काम हे महाराष्ट्रात आपण करतो आहोत.

****

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या दरम्यान बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन बीबीए या अभ्यासक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला. विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे उद्योग आणि छोट्या व्यवसायांना आवश्यक ज्ञान आणि अनुभव मिळणार आहे. किरकोळ उद्योगाशी संबंधित अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतांनाच कमावण्याची आणि अनुभव मिळवण्याची संधी मिळणार आहे.

****

दहशतवादविरोधी विभागाच्या नाशिक इथल्या पथकाने आज जळगाव इथून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया - पीएफआय या बंदी घातलेल्या संघटनेच्या एका हस्तकाला अटक केली आहे. राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने वेगवेगळ्या जिल्ह्यातून अटक केलेल्या ‘पीएफआय’ च्या पाच सदस्यांच्या मोबाइलमधील संभाषणाचा डेटा नष्ट केल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. उनैस उमर खय्याम पटेल असं या आरोपीचं नाव असून, त्याला आज जिल्हा - सत्र न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची एटीएस कोठडी सुनावली आहे.

****

विधान परिषदेच्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने किरण पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारतीय जनता पार्टीकडून राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्ष फोडण्याचा कोणताही प्रयत्न होत नाही. मात्र, या दोन पक्षांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वाबद्दल प्रचंड नाराजी असून ते पक्ष राजकीयदृष्ट्या स्वतःहून बुडतील, असंही बावनकुळे यांनी सांगितलं.

****

धनत्रयोदशी आज साजरी होत आहे. निरोगी दीर्घायुष्यासाठी आज धन्वंतरी पूजन तसंच यम दीप दानाची प्रथा आहे. या पार्श्वभूमीवर फटाके, कपडे, फराळाचे जिन्नस तसंच गृहसजावटीसह विविध साहित्य खरेदीसाठी सकाळपासूनच बाजारपेठांमधून ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दीपोत्सवाचं हे तेज सगळ्यांच्याच आयुष्यात चैतन्य आणि ऊर्जेचे पर्व घेऊन येवो. आपल्या आशा-आकांक्षांना पंख देणारे, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे क्षण घेऊन येवो, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

****

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या “आनंदाचा शिधा” किटच्या वाटपाला औरंगाबाद जिल्ह्यात सुरवात झाली. आनंदाच्या शिधा या उपक्रमातून सर्वसामान्यांची दिवाळी आनंदाची व्हावी अशा शुभेच्छा शिधा वाटप कार्यक्रमात पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिल्या. आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिवाळी निमित्त जिल्ह्यात जवळपास साडेसहा लाख शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा किटचं वाटप करण्यात येत आहे. शंभर रुपयांच्या या किट मध्ये एक किलो चनादाळ, एक किलो साखर, एक किलो रवा, एक लीटर पामतेल याचा समावेश आहे.

****

शासनानं ओला दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. राज्यात अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी केल्यानंतर ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. अतिवृष्टीनं शेतमालाचं मोठं नुकसान झालं आहे. तरीही सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला. पीकविमा कंपन्याही शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देत नाहीत तसंच या कंपन्या अतिवृष्टीचे पंचनामे करत नसल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाच्या वतीनं दिवाळीनिमित्त गोर गरिबांना स्वस्त धान्य दुकानामार्फत देण्यात येणारा आनंदाचा शिधा किटवर मंत्र्यांचे छायाचित्र छापण्याच्या आग्रहामुळे हे किट वाटण्यात विलंब झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला.

दरम्यान, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची ते पाहणी करणार आहेत.

****

राज्यात आतापर्यंत अतिवृष्टीमुळे ३७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल ५ हजार ९१ जनावरं दगावल्याची माहिती एका वृत्तसंस्थेनं दिली आहे. दरम्यान, राज्यात आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, पुढील पाच दिवस पावसाची चिन्हे नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

****

क्रिकेट

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज पर्थ इथं इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. त्याआधी सिडनी इथं आज झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं यजमान ऑस्ट्रेलियाचा ८९ धावांनी पराभव केला. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना उद्या मेलबर्न इथं पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध होणार आहे.

****

लातूर जिल्ह्यात संजय गांधी अनुदान योजनेअंतर्गत मार्च २०२२ अखेर दाखल केलेल्या पात्र लाभार्थींचं ऑक्टोबर अखेरपर्यंतचं अनुदान मंजूर झालं आहे. ग्रामीण भागातील लाभार्थींचे अनुदानापोटी ७ कोटी ८७ लाख ३३ हजार ८०० रुपये तर लातूर शहरातील पात्र लाभार्थींचे ४ कोटी ५८ लाख ९ हजार ४०० रुपये इतके अनुदान लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात आलं आहे. सर्व लाभार्थ्यांनी आपापल्या खात्यावर जमा करण्यात आलेली अनुदान रक्कम उचलून घ्यावी, असं आवाहन संजय गांधी निराधार योजना समिती तसंच तहसील प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड ते हडपसर दरम्यान तिसरी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी २६ तारखेला संध्याकाळी आठ वाजून ५० मिनिटांनी नांदेड इथून सुटेल आणि पूर्णा, परभणी, लातूर रोड, उस्मानाबाद, कुर्डूवाडी, दौंड मार्गे हडपसर इथं दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी हडपसर इथून २७ तारखेला दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी सुटेल आणि नांदेडला दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता पोहोचेल.

****

No comments:

Post a Comment