Thursday, 24 November 2022

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 24 November 2022

Time 07.10 AM to 07.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २४ नोव्हेंबर २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      सीमा भागातलं एकही गाव राज्याबाहेर जाणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

·      हृदयरोगावरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या स्टेंट्सचा राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांच्या यादीत समावेश

·      नव्या इथेनॉल अनुदान योजनेअंतर्गत, केंद्र सरकारची आणखी ९५ प्रकल्पांना तत्वतः मंजुरी

·      केंद्राची मदत घेऊन विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यास भाग पाडावं- विरोधी पक्षनेते अजित पवार यांची राज्य सरकारकडे मागणी

·      औरंगाबादच्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठाची समाजसेवक, साहित्यिक आणि विचारवंत अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर मानद डी.लिट पदवी जाहीर

·      हिंगोलीत मुंबईला जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरू करण्याकरता आंदोलन

·      औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची प्रारुप मतदार यादी जाहीर, चार हजार मतदार घटले

आणि

·      उस्मानाबादमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचे पुरुष आणि महिला संघ उपांत्य फेरीत दाखल

सविस्तर बातम्या

सीमा भागातलं एकही गाव राज्याबाहेर जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते काल शिर्डी इथं साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर बोलत होते. सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई असल्यानं, तिथल्या ४० ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला असून, या ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याचं विधान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर, बोलताना मुख्यमंत्री म्हणाले...

Byte…

पाण्यावाचून कुठलंही गाव इकडे तिकडे जाण्याचा विचार करणार नाही. आणि एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे त्या भागातील ज्या काही समस्या, प्रश्न आहेत, काही सोडवलेत, काही प्रलंबित आहेत ते लवकर युद्ध पातळीवर सोडवले जातील आणि कुणावरही अशी वेळ येणार नाही. आणि हा जो काही जुना वाद आहे, तो न्यायालयात प्रलंबित आहे. आणि न्यायालयीन लढाई तर सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये. परंतु त्याबरोबर हा विषय जो आहे, सामोपचाराने सोडवण्याची आमची भूमिका आहे.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही, जत तालुक्यातल्या ग्रामपंचायतींचा हा ठराव दहा वर्ष जुना असल्याचं नमूद केलं. त्यानंतर तिथे पाणीटंचाईवर उपाययोजना राबवण्यात आल्या होत्या, असं त्यांनी काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. कोणतंही गाव राज्यातून बाहेर जाणार नाही, उलट बेळगाव, कारवार निपाणीसह मराठी भाषिक गावंच राज्यात सामील करून घेणार असल्याचा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला. ते म्हणाले...

Byte…

२०१२ साली त्यांनी ठराव केला होता, आत्ता कोणीही अशी मागणी केलेली नाही, २०१२ ची मागणी आहे. एकही गाव महाराष्ट्रातलं कुठेही जाणार नाहीये. पण आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयात लढून आमचे जे बेळगाव, कारवार, निपाणीसहीत हे आमचे गावं आहेत, ते सगळे आम्ही पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत.

 

दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काल नागपूर इथं गोवारी हुतात्मा स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात या मागणीसाठी २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपुरात विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर गोवारी बांधवांनी मोर्चा आणला होता, या मोर्चात चेंगराचेंगरी होऊन ११४ गोवारी बांधव हुतात्मा झाले होते.

****

हृदयरोगावरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या स्टेंट्सचा राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारनं काल याबाबतची अधिसूचना जारी केली. विशेषज्ञांच्या समितीनं केलेल्या शिफारशींनंतर आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे स्टेंट्स ची उपलब्धता आणखी सुलभ होणार असून, राष्ट्रीय फॉर्मास्युटिकल मूल्यन प्राधिकरणाला कोरोनरी स्टेंटच्या किमती ठरवता येणार आहेत.

****

नव्या इथेनॉल अनुदान योजनेअंतर्गत, केंद्र सरकारनं आणखी ९५ इथेनॉल प्रकल्पांना तत्वतः मंजुरी दिली आहे. यामुळे देशातल्या वार्षिक इथेनॉल उत्पादन क्षमतेत सुमारे ४०० कोटी लिटरची वाढ होण्याची अपेक्षा आहे. इथेनॉल बनवणाऱ्या या प्रकल्पांपैकी ६८ प्रकल्प धान्यावर आधारित, २० प्रकल्प मळीवर आधारित तर उर्वरित सात प्रकल्प धान्यासह मळीवर आधारित असतील, अशी माहिती अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण विभागानं दिली आहे. हे प्रकल्प १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करुन रोजगाराच्या हजारो संधी ग्रामीण भागात निर्माण करतील. गेल्या एप्रिल महिन्यात या योजनेला मान्यता मिळाली असून २४३ प्रकल्पांना तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे.

****

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांची हाताळणी संवेदनशीलतेनं आणि तत्परतेनं करणार असल्याचं, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते, अजित पवार आणि अंबादास दानवे यांनी काल गोऱ्हे यांची भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न आणि स्त्रियांवरील अत्याचारांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन, सर्व विषयांवर संवेदनशीलतेनं आणि समन्वयाच्या भूमिकेतून मार्ग काढण्याचा दृष्टीनं या बैठकीत चर्चा झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. येत्या १९ डिसेंबरपासून नागपूर इथं हिवाळी अधिवेशन होणार आहे.

****

पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नसून, केंद्राची मदत घेऊन विमा कंपन्यांना रक्कम लवकरात लवकर देण्यास भाग पाडावं, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात बैठक घेणं आवश्यक असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यासाठी वेळ द्यावा, तसंच आगामी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, आदी मागण्याही पवार यांनी यावेळी केल्या. शेतकऱ्यांना न्यायालयात जाण्याची वेळ येऊ देऊ नये, असंही पवार यांनी म्हटलं आहे.

****

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले असतानाही, राज्य सरकारने प्रभाग रचनेचं काम सुरू करण्याचे आदेश दिल्यानं, याचिकाकर्ते पवन शिंदे यांनी राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. प्रभाग रचनेबाबतचे आदेश तातडीने मागे न घेतल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

****

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावली असून, त्यांना जीवनावश्यक प्रणालीवर ठेवण्यात आलं आहे. गोखले यांना काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विक्रम गोखले यांनी भूमिका साकारलेला ‘गोदावरी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र रुग्णालयातून त्यांना सुटी मिळताच त्यांनी चित्रीकरण पूर्ण केलं. गोखले यांच्या प्रकृतीबाबत त्यांचे कुटुंबीय माहिती देतील, असं दीनानाथ रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे युवा नेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली. या भेटीनंतर ठाकरे यांनी संविधान आणि लोकशाहीसाठी देशातल्या तरूणांनी संपर्कात राहून, एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. देशाचे युवा नेते म्हणून विविध विषयांवर एकत्र काम करू अशी खात्री असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी काल पाटणा इथं बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचीही सदिच्छा भेट घेतली.

****

औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन स्वयंअर्थसहायित विद्यापीठानं समाजसेवक, साहित्यिक आणि विचारवंत अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर मानद वाङ्गमय पंडित डी.लिट पदवी जाहीर केली आहे. विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा रविवार २७ नोव्हेंबरला होणार आहे. कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एमजीएम हे मराठवाड्यातलं पहिलं स्वयंअर्थसहायित विद्यापीठ २०१९ पासून कार्यन्वित झालं असून, २०२० ते २०२२ या शैक्षणिक वर्षादरम्यान विविध शाखेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यामध्ये १०९ पदवी, २९१ पदव्युत्तर पदवी आणि प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

****

बँक ऑफ महाराष्ट्रची फसवणूक करुन चार कोटी सत्तावन्न लाख रुपये लुबाडल्याच्या आरोपाखाली हैदराबादच्या विशेष सीबीआय न्यायालयानं दहा आरोपींना दोषी ठरवलं असून, त्यांना विविध रकमांचे दंड आणि एक ते सात वर्षापर्यंत कालावधीचा तुरुंगवास ठोठावला आहे. दोषींमधे दोन बँक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याखेरीज सहा खासगी कंपन्यांनाही दोषी ठरवण्यात आलं असून त्यांना पन्नास हजार ते एक लाख रुपये दंड ठोठावला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या सिकंदराबाद शाखेत बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन तो निधी इतरत्र वळवून बँकेला चार कोटी ५७ लाख रुपयांना फसवल्याचा आरोप या दहा जणांविरोधात होता.

****

औरंगाबाद महानगरपालिकेला खाम नदी पुनरुज्जीवन आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी केलेल्या कामगिरीबद्दल, फिक्की वॉटर पुरस्कारानं काल नवी दिल्लीत सन्मानित करण्यात आलं. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी, नमामि गंगेचे महासंचालक जी अशोक कुमार, फिक्की वॉटर मिशनच्या अध्यक्ष नैना लाल किदवई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

****

जालना जिल्ह्यात हंगामी स्थलांतरामुळे बाधित होणाऱ्या मुलांच्या संरक्षणबाबत संशोधन संस्थेचा अभ्यास अहवाल प्रकाशित झाला आहे. महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ यांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या उपक्रमात इंडियन इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन स्टडीज यांच्या वतीने जालना जिल्ह्यातल्या स्थलांतरामुळे बाधित होणाऱ्या मुलांचा अभ्यास करण्यात आला आहे.

****

हिंगोली ते मुंबई रेल्वे फेरी सुरू करण्यासाठी काल हिंगोली रेल्वे स्थानकावर हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समिती, व्यापारी आणि पत्रकार बांधवांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. हिंगोली -मुंबई रेल्वे सुरू होत नाही तोपर्यंत रुळावरून उठणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. या मागणीसाठी आंदोलकांनी अमरावती - तिरुपती एक्स्प्रेस रोखून धरली होती. आपल्या मागण्यांचं निवेदन आंदोलकांनी रेल्वे प्रशासनाला सादर केलं. या आंदोलन प्रकरणी रेल्वे कायद्या नुसार १७ आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

****

औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या अधिसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी चार गटात एकूण १२२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. प्राप्त अर्जांपैकी तर १३ जणांचे अर्ज अवैध ठरले असून, यादी संदर्भात एकूण ४० अपीलं दाखल झाली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी ही माहिती दिली. विद्या परिषदेच्या जागांसाठी दाखल सर्वच ३८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. अधिसभा, विद्या परिषद आणि विविध अभ्यास मंडळासाठी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात पदवीधर प्रवर्गातून निवडून येणाऱ्या १० जागांची निवडणूक २६ नोव्हेंबरला होणार आहे.

****

शेतातली विहीर ही शेतकऱ्यांची खरी श्रीमंती असून ती टिकवून ठेवावी, तसंच जास्त पाणी लागणारी पिकं घेण्यापेक्षा कमी पाण्यावर जास्त उत्पादन देणाऱ्या नगदी पिकांची लागवड करून समृद्धी साधावी, असं आवाहन, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्ह्यात ७५ ठिकाणी, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या विविध योजनेतून लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या विहिरींचं, काल जल पूजन करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. शेतकऱ्यांनी पाण्याचं संरक्षण, संवर्धन आणि जपवणूक करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून वेळेत वैद्यकीय सुविधा रुग्णांना पुरवण्याचे आदेश परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले आहेत. गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय, पालम आणि पूर्णा ग्रामीण रुग्णालयाची तपासणी केल्यानंतर त्या काल बोलत होत्या. मुख्यालयात न थांबणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर योग्य ती कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

****

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची प्रारुप मतदार यादी काल प्रसिद्ध करण्यात आली. २०१७च्या तुलनेत या मतदारसंघात तीन हजार ९९७ मतदार कमी झाल्याचं आढळून आलं. या यादीसंदर्भात दावे आणि हरकती नऊ डिसेंबर पर्यंत दाखल करता येतील, असं मतदार नोंदणी अधिकार्यांनी कळवलं आहे. 

****

उस्मानाबाद इथं सुरु असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे . उपांत्य फेरीत राज्याच्या पुरुष संघाचा सामना कोल्हापूर सोबत, तर महिला संघाचा सामना दिल्ली सोबत होणार आहे. काल झालेल्या पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्रानं ओडिशावर १६-८ असा एक डाव ८ गुणांनी विजय मिळवला तर महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्रानं केरळचा १०-७ असा एक डाव ३ गुणांनी पराभव केला.

****

कतार मध्ये सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल बेल्जयमनं कॅनडाचा एक - शून्य असा, तर स्पेननं कोस्टारिकाचा सात - शून्य असा पराभव केला. जपाननं चार वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या जर्मनीला दोन - एक असं पराभूत केलं, तर मोरोक्को आणि क्रोएशिया यांच्यातला सामना बरोबरीत सुटला.

****

औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास आणि प्राचीन भारतीय संस्कृती विभागतर्फे, जागतिक वारसा सप्ताहानिमित्त इतिहास आणि प्राचीन संस्कृती विभागामध्ये आज दुपारी, डॉ.जे.सिंधु यांचं, ’बौध्द मुर्तिशास्त्र-एक अवलोचन,’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असं आवाहन विभागप्रमुख डॉ.पुष्पा गायकवाड यांनी केलं आहे.

****

जागतिक वारसा स्थळ सप्ताहानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यात तेर इथं आज हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे. तेर इथल्या ऐतिहासिक पुरातन वास्तू, आणि सांस्कृतिक वारशाकडे लक्ष वेधण्यासाठी पुरातत्व विभाग आणि पर्यटन जनजागृती संस्था या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. संत गोरोबा काका मंदिर, पाण्यात तरंगणाऱ्या विटा, उत्खननात आढळलेला बौध्द स्तूप, त्रिविक्रम मंदिर, वस्तू संग्रहालय अशा विविध स्थळांचा समावेश या हेरिटेज वॉकमधे करण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment