Tuesday, 1 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 01.11.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  01 November  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ नोव्हेंबर २०२२    सायंकाळी ६.१०

****

·      राज्यातल्या सत्ता संघर्षावर आता २९ नोव्हेंबरला सुनावणी.

·      राज्याबाहेर जात असलेल्या उद्योगांच्या टीकेबाबतची खरी स्थिती जनतेसमोर यावी, यासाठी येत्या महिन्याभरात श्वेतपत्रिका काढण्याची उद्योग मंत्र्याची घोषणा.

·      मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची दादर पोलिस ठाण्यात सव्वा तास चौकशी.

·      अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार संपला, गुरुवारी मतदान.

·      जालन्यातील गीताई स्टील कारखान्यात लोखंड वितळण्याच्या भट्टीत भीषण स्फोट होऊन सहा ते सात कामगार गंभीर जखमी.

आणि

·      टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा न्युझीलंडवर २० धावांनी विजय तर श्रीलंकेकडून अफगाणिस्तानचा सहा गडी राखून पराभव.

****

राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयातल्या घटनापीठासमोरची सुनावणी आज पुढे ढकलण्यात आली, आता २९ नोव्हेंबरला ही सुनावणी होणार आहे. घटनापीठानं आज दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितलं. दोन्ही बाजूने कोणते मु्द्दे मांडण्यात येतील आणि कोणते वकील बाजू मांडतील याची माहिती देखील देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. त्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. न्यायालयानं त्यांना चार आठवड्याची मुदत दिली आहे. 

दरम्यान, वरिष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांनी मतदारांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. न्यायालयानं त्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांची ही याचिका मान्य केली आहे.

****

राज्याबाहेर जात असलेल्या उद्योगांच्या टीकेबाबतची खरी स्थिती जनतेसमोर यावी, यासाठी येत्या महिन्याभरात श्वेतपत्रिका काढणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितलं. मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले –

वेदांता  फॉक्सकॉन असेल, एअरबस असेल, सॅफ्रॉन असेल, सिनानमस असेल याची खरी वस्तूस्थिती महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी आम्ही येत्या महिनाभरामध्ये या सगळ्या प्रकल्पांबाबतची एक श्वेतपत्रिका जाहीर करणार आहोत. या श्वेतपत्रिकेमध्ये नक्की महाराष्ट्र शासनानं, उद्योग विभागानं, एमआयडीसीनं फॉरेनच्या कंपनीबरोबर केलेला पत्रव्यवहार असेल दाओद सारख्या ठिकाणी झालेल्या बैठका असतील, आणि या बैठका झाल्यानंतर याचं नक्की रेकॉर्ड उद्योग विभागाकडे आणि एमआयडीसीकडे किती आहे याचा पुरावा आम्ही श्वेतपत्रिकेतनं अख्या महाराष्ट्राला आणि विशेषतः युवा पिढीला देणार आहोत.

महाविकास आघाडीच्या काळात ठाकरे सरकारनं अनेक प्रकल्पांबाबत कंपन्यांशी सामंजस्य करार केले, मात्र त्यापुढची प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक असलेली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक चौदा महिन्यात घेतलीच नाही, असंही ते म्हणाले. ट्विटरवरून सातत्यानं आरोप करण्याऐवजी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आपणास भेटावं, आपण सगळी अधिकृत कागदपत्रं दाखवू आणि त्यांचे गैरसमज दूर करू, असं ते म्हणाले.

औरंगाबादमधील ऑरिक सिटीतला मेडिकल डिव्हाईस पार्क हा प्रकल्प तिथंच होणार असल्याची ग्वाही सामंत यांनी यावेळी दिली.

****

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणं आवश्यक असल्याचं मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रीय फळबाग कार्यशाळेचं उद्घाटन आज पुण्यात तोमर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणं आवश्यक आहे आणि ती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कटिबद्ध आहेत, असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच प्रक्रिया उद्योग आणि फलोत्पादन क्षेत्रातल्या संधींचाही लाभ करून घ्यावा, असं आवाहन तोमर यांनी यावेळी केलं. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेला राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, पणन मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह विविध राज्यांतले कृषी अभ्यासक आणि शेतकरी उपस्थित आहेत.

****

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची आज दादर पोलिस ठाण्यात जवळपास सव्वा तास चौकशी करण्यात आली. वरळी इथल्या झोपडपट्टी पुनर्वसन सदनिका घोटाळा प्रकरणासंदर्भात ही चौकशी करण्यात आली. माजी खासदार किरीट सोमैया यांनी यासंदर्भात पेडणेकर यांच्याविरुद्ध आरोप केले होते. कोणाच्याही आरोपांना आपण उत्तर देणार नसून, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याची प्रतिक्रिया पेडणेकर यांनी पोलिस चौकशीनंतर वार्ताहरांशी बोलतांना दिली.

****

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार काही वेळापूर्वी थांबला. एकूण सात उमेदवार ही पोटनिवडणूक लढवत असून येत्या गुरूवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान या निवडणुकीचं मतदान होणार आहे.

****

अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्यासोबतचा वाद संपुष्टात आणत असल्याचं सांगितलं. कडू यांच्या प्रहार संघटनेचा आज अमरावतीत मेळावा झाला. या मेळाव्यात बोलतांना त्यांनी ही पहिली वेळ असल्यामुळे माफ करतो. पण आमच्या वाट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही असा इशारा दिला. प्रहार संघटना इतर पक्षांपेक्षा वेगळी असून, सत्तेची पर्वा न करता आपण आतापर्यंत अनाथ आणि दिव्यांग यांच्या हक्कांसाठीच  लढलो, असा दावा कडू यांनी यावेळी केला. आमदार राणा आणि आमदार कडू यांच्यातील वादावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यांनी दोन दिवसापूर्वी मध्यस्थी केली होती. त्यानंतर आमदार राणा यांनी दिलगीरीही व्यक्त केली.

****

जालना औद्योगिक वसाहतीमधल्या गीताई स्टील कारखान्यात आज सकाळी लोखंड वितळण्याच्या भट्टीत भीषण स्फोट होऊन सहा ते सात कामगार गंभीररीत्या भाजले. पोलीस या घटनेचा पंचनामा करत असून, अपघातात जीवितहानी झाल्याची कुठलीही नोंद झाली नसल्याचं जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांनी सांगितलं. जखमी कामगारांवर जालना आणि औरंगाबाद इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औद्योगिक वसाहत हद्दीतल्या चंदनझिरा पोलीस ठाण्यात दुपारी साडेचार वाजेपर्यंत या घटनेची कुठलीही नोंद घेण्यात आलेली नव्हती, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

अवकाळी पावसामुळे चाळीतला साठवणीतला कांदा खराब झाल्यानं कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या कांदा बटाटा घाऊक बाजारात कांद्याचा दर प्रति किलो २८ ते ३२ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. परिणामी किरकोळ बाजारात हा दर ५० रुपये प्रति किलो असा झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. येत्या महिनाभरात नवीन कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर दरात घसरण होण्याची शक्यता बाजार समितीचे संचालक अशोक वाळुंज यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, दिवाळीमुळे बंद असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्या कालपासून सुरु झाल्यानंतर, काल कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल सुमारे ७०० रुपयांनी वाढ झाली.

****

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लंडनं न्युझीलंडचा २० धावांनी तर श्रीलंकेनं अफगाणिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना निर्धारीत २० षटकांत सहा बाद १७९ धावा केल्या. जोस बटलरनं ७३ तर हेल्सनं ५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्युझीलंडनं निर्धारीत २० षटकांत सहा बाद १५९ धावा केल्या. न्युझीलंडकडून ग्लेन फिलीप्सनं सर्वाधिक ६२ धावा तर कर्णधार केन विल्यम्सनं ४० धावा केल्या.

अन्य एका सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना निर्धारीत २० षटकांत आठ गडी बाद १४४ धावा केल्या. उत्तरादाखल श्रीलंकेनं धनंजय डी सिल्वाच्या नाबाद ६६ धावांच्या जोरावर १८ षटकं आणि तीन चेंडुत चार गड्यांच्या मोबदल्यात १४८ धावा केल्या.

या स्पर्धेत उद्या झिम्बाब्वे आणि नेदरलँड तसंच भारत आणि बांगलादेश दरम्यान सामने होणार आहेत.

****

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरमध्ये होणाऱ्या कार्तिकी यात्रेसाठी मध्य रेल्वेनं विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचं निर्णय घेतला आहे. यामध्ये सोलापूर-पंढरपूर, पंढरपूर-मिरज आणि लातूर - पंढरपूर या गाड्यांचा समावेश आहे.

लातूर- पंढरपूर ही विशेष गाडी आज, उद्या, शुक्रवारी तसंच सात आणि आठ नोव्हेंबर या तारखेला लातूरहून सकाळी साडेसातला निघून त्याच दिवशी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी पंढरपूरला पोहोचेल तर परतीच्या प्रवासात ही गाडी याच तारखांना पंढरपूरहून दुपारी अडीच वाजता सुटेल आणि संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी लातूरला पोहोचेल.

****

No comments:

Post a Comment