Wednesday, 2 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.11.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 November 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

मोठ्या प्रमाणात सुधारणा, पायाभूत सुविधा आणि सर्वोत्कृष्ट प्रतिभा यांच्या सहाय्याने आपण न्यू इंडियाचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. इन्व्हेस्ट कर्नाटक २०२२ या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचं आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. संभाव्य गुंतवणूकदारांना आकर्षित करणं आणि पुढील दशकातील विकासाचा आराखडा तयार करणं, हे या परिषदेचं उद्दीष्ट आहे. भारताला प्रगतीच्या दिशेनं पुढे जायचं असेल तर राज्यांनी प्रगती करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गेल्या काही वर्षात ८४ अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक भारतात आली असून, जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरी संपूर्ण जग भारताकडे आशेनं पाहत असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारतात ड्रोन तंत्रज्ञान, अंतराळ, संरक्षण क्षेत्रात गुंतवणूकीला चालना दिली जात असून, पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी वेगानं काम सुरु असल्याचं ते म्हणाले. या परिषदेमुळे हजारो कोटींची भागीदारी आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

****

मुंबईत चैत्यभूमी इथल्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथला स्तूप जीर्ण झाला असून, त्यातल्या बाबासाहेबांच्या अस्थी सुरक्षित राहाव्यात यासाठी या स्तूपाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून दीक्षाभूमी प्रमाणे भव्य स्तूप उभारावा, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापारिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी इथं शासनाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या सेवा सुविधा आणि नियोजनाच्या आढावा बैठकीत बोलत होते. चैत्यभूमीजवळचा रस्ता १५ फूट अधिक वाढवण्यासाठी आणि या परिसराचा विकास करण्याच्या दृष्टीनं सीआरझेडच्या परवानगीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयात बैठक घेऊन प्रयत्न करू असं आश्वासनही आठवले यांनी दिलं.

****

आता वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे. आतापर्यंत एक जानेवारी, या अर्हता दिनाला किंवा त्याआधी अठरा वर्षं पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येत असे. मात्र आता जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना नोंदणी करता येईल, असं त्यांनी सांगितलं.

****

नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला आज सकाळी सिन्नर जवळील माळवाडी इथं आग लागली. चालकाने बस मधून धूर निघाल्याचं बघून बस थांबवताच प्रवासी तातडीने बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर ही बस जळून खाक झाली.

****

नांदेड जिल्ह्यातल्या किनवट इथल्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता माहिती आणि मार्गदर्शन केंद्रात आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आलं आहे. विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेणाऱ्या या सत्रासाठी येत्या एक डिसेंबरपासून प्रवेश देण्यात येणार आहेत.

****

बीडमध्ये उद्या पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. बीड शहरातल्या गुरुकुल इंग्लिश शाळेमध्ये होणार्या या मेळाव्यात, औरंगाबाद आणि बीड इथल्या कंपन्या आणि संस्थांकडून मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी महास्वयम या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून उपस्थित रहावं, असं आवाहन, बीडच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुशील उचले यांनी केलं आहे.

****

ऑस्ट्रेलिया इथं सुरु असलेल्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना बांगलादेश सोबत होणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही देशांसाठी हा सामना महत्वाचा आहे.

****

सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथं सुरू असलेल्या बत्तीसाव्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत काल यजमान महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली असून कोल्हापूरच्या मुलांच्या संघानं आणि विदर्भच्या मुलींनीही उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यफेरीत महाराष्ट्राचे किशोर कोल्हापूर विरुद्ध तर महाराष्ट्राच्या किशोरी राजस्थान विरुद्ध लढणार आहेत.

****

देशासह महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्यानं थंडीचा कडाका कमी राहणार असून, डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कडाक्याची थंडी राहील. अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्र यांनी दिली.

दरम्यान, नाशिक मध्ये थंडीचा कडाका वाढू लागला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी नाशिकचं तापमान १२ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस नोंदवलं गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवला आहे.

//**********//

No comments:

Post a Comment