Wednesday, 2 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.11.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 November 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ नोव्हेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत दोन्ही बाजूने निर्णय अपेक्षित असलेले मुद्दे एकत्रित करुन लेखी स्वरुपात सादर करण्याचे घटनापीठाचे निर्देश, आता २९ नोव्हेंबरला सुनावणी

·      राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांच्या स्थितीवर महिन्याभरात श्वेतपत्रिका काढणार- उदय सामंत

·      अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार संपला, उद्या मतदान 

·      उस्मानाबाद जिल्ह्यात २०२० च्या अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीपोटी पीक विम्याचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

·      जालन्यातील गीताई रोलिंग मीलमधल्या लोखंड वितळण्याच्या भट्टीत झालेल्या स्फोटात सहा कामगार भाजून गंभीर जखमी

·      डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २२ नोव्हेंबर पासून पदवी अभ्यासक्रमाच्या परिक्षा

आणि

·      टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज झिम्बाब्वे आणि नेदरलँड तसंच भारत आणि बांगलादेश दरम्यान सामने  

****

दोन्ही बाजूने निर्णय अपेक्षित असलेले मुद्दे एकत्रित करुन लेखी स्वरुपात सादर करण्याचे निर्देश घटनापीठानं काल राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सुनावणी करतांना काल दिले. यावर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी वेळ मागितल्यामुळे न्यायालयानं चार आठवड्यांची मुदत देत ही सुनावणी पुढे ढकलली. आता २९ नोव्हेंबरला ही सुनावणी होणार आहे. घटनापीठानं काल दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितलं आहे. दोन्ही बाजूने निर्णय अपेक्षित असलेले मुद्दे एकत्रित करुन लेखी स्वरुपात सादर करावेत आणि कोणते वकील बाजू मांडतील याची माहिती देखील देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.

दरम्यान, वरिष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांच्या मार्फत डॉ. विश्वभंर चौधरी, रंजन बेलखोडे, सौरभ ठाकरे, यांनी मतदारांच्यावतीनं सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. बंडखोरी करताना मंत्री आणि आमदार राज्यातून बाहेर गेले, ही जनतेची फसवणूक असून न्यायालयानं अशा प्रकरणात ठोस निर्णय घेण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. न्यायालयानं त्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांची ही याचिका मान्य केली.

****

राज्याबाहेर जात असलेल्या उद्योगांच्या टीकेबाबतची खरी स्थिती जनतेसमोर यावी, यासाठी येत्या महिन्याभरात श्वेतपत्रिका काढणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. मुंबईत काल वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले....

वेदांता  फॉक्सकॉन असेल, एअरबस असेल, सॅफ्रॉन असेल, सिनानमस असेल याची खरी वस्तूस्थिती महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी आम्ही येत्या महिनाभरामध्ये या सगळ्या प्रकल्पांबाबतची एक श्वेतपत्रिका जाहीर करणार आहोत. या श्वेतपत्रिकेमध्ये नक्की महाराष्ट्र शासनानं, उद्योग विभागानं, एमआयडीसीनं फॉरेनच्या कंपनीबरोबर केलेला पत्रव्यवहार असेल दाओद सारख्या ठिकाणी झालेल्या बैठका असतील, आणि या बैठका झाल्यानंतर याचं नक्की रेकॉर्ड उद्योग विभागाकडे आणि एमआयडीसीकडे किती आहे याचा पुरावा आम्ही श्वेतपत्रिकेतनं अख्या महाराष्ट्राला आणि विशेषतः युवा पिढीला देणार आहोत.

****

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणं आवश्यक असल्याचं मत, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रीय फळबाग कार्यशाळेचं उद्घाटन काल पुण्यात तोमर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणं आवश्यक आहे आणि ती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कटिबद्ध आहेत, असं ते म्हणाले. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच प्रक्रिया उद्योग आणि फलोत्पादन क्षेत्रातल्या संधींचाही लाभ करून घ्यावा, असं आवाहन तोमर यांनी यावेळी केलं.

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना यावेळी बोलतांना, शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची गरज असून, या तंत्रज्ञानातूनच त्यांना समृद्धीकडे जाता येईल, असं मत व्यक्त केलं. द्राक्ष उत्पादनात तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग होत असून, देशाला दोन हजार तीनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त विदेशी चलन, राज्यातल्या द्राक्ष निर्यातीच्या माध्यमातून मिळतं, असंही सत्तार म्हणाले. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शेतकरी-अनुकूल धोरणं आणि योजना राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्याचं स्वतंत्र कृषि निर्यात धोरण तयार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे, अशी माहिती फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी यावेळी दिली. अनेक भाजीपाला आणि फळ उत्पादनातही राज्य प्रथम क्रमांकावर असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

ऑक्टोबर २०२२ या महिन्यात वस्तू आणि सेवा कराचं महसूल संकलन एक लाख एक्कावन्न हजार सातशे अठरा कोटी रुपयांच्या वर गेलं आहे. या कराचं हे आतापर्यंतचं दुसरं सर्वोच्च मासिक संकलन आहे. याआधी या वर्षीच्या एप्रिल महिन्यातही हे संकलन दीड लाख कोटी रुपयांच्या वर गेलं होतं. गेल्या सलग आठ महिन्यांपासून वस्तू आणि सेवा कराचं महसूल संकलन एक लाख चाळीस हजार कोटी रुपयांहून जास्त असल्याचं अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. या जीएसटी संकलनात महाराष्ट्र आघाडीवर असून राज्यानं गेल्या महिन्यात २३ हजार कोटी रुपयांचा जीएसटी दिला.  

****

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची काल दादर पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात आली. वरळी इथल्या झोपडपट्टी पुनर्वसन सदनिका घोटाळा प्रकरणासंदर्भात ही चौकशी करण्यात आली. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात पेडणेकर यांच्याविरुद्ध आरोप केले होते. कोणाच्याही आरोपांना आपण उत्तर देणार नसून, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याची प्रतिक्रिया पेडणेकर यांनी वार्ताहरांशी बोलतांना दिली.

****

मुंबईतल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार काल संपला. एकूण सात उमेदवार ही पोटनिवडणूक लढवत असून, उद्या सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान मतदान होणार आहे.

****

मुंबईत काल महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या विद्यापीठात इंग्रजी, हिंदीसह इतर भाषांमध्येही शिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती, पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. या विद्यापीठामुळे राज्यात पाच लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

****

मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला ६० हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन,  प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था - सारथी अंतर्गत वसतीगृह,  शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल आढावा बैठक झाली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेने सर्व जिल्ह्यांमध्ये डिसेंबर पासून शंभर मुलांचं वसतीगृह सुरु होईल याचं नियोजन करावं, असं पाटील यांनी यावेळी सांगितलं. 

****

राज्यात महामंडळ वाटपाबाबत भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना नेत्यांची काल बैठक झाली. १२० महामंडळांची वाटणी कशी करायची यावर यात चर्चा झाल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

****

अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्यासोबतचा वाद संपुष्टात आणत असल्याचं सांगितलं. कडू यांच्या प्रहार संघटनेचा काल अमरावतीत मेळावा झाला, या मेळाव्यात बोलतांना त्यांनी, ही पहिली वेळ असल्यामुळे माफ करतो, मात्र आमच्या वाट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही असा इशारा दिला. आमदार राणा आणि आमदार कडू यांच्यातल्या वादावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी मध्यस्थी केली होती. त्यानंतर आमदार राणा यांनी दिलगीरीही व्यक्त केली होती.

****

२०२० च्या खरीप हंगामात उस्मानाबाद जिल्ह्यात अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात, पीक विमा रकमेचा सहा हजार सहाशे एकोणचाळीस रुपयांचा पहिला हप्ता काल जमा झाल्याचं आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी सांगितलं. उस्मानाबाद इथं काल ते पत्रकारांशी बोलत होते. २०२०च्या या हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी राज्य सरकारच्या पातळीवर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे आम्ही न्यायालयात दाद मागितली, न्यायालयानं शेतकऱ्यांच्या बाजूनं निर्णय देत, पीक विमा कंपनीला दोनशे कोटी रुपयांची रक्कम जमा करायला लावली, असं आमदार पाटील यांनी सांगितलं. प्रति हेक्टर अठरा हजार रुपये प्रमाणे भरपाई मंजुर झाली आहे, त्यातला सहा हजार सहाशे एकोणचाळीस रुपयांचा हा पहिला हप्ता जमा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

****

जालना अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमधल्या गीताई रोलिंग मीलमधल्या लोखंड वितळण्याच्या भट्टीत काल दुपारी झालेल्या स्फोटात, भट्टीजवळ काम करत असलेले सहा कामगार गंभीर भाजले. विवेककुमार राजभर, अजिंक्य काकडे, माहेश्वरी पांडे, संतोष मेवालाल, अजयकुमार राजभर, परवींद सिंगासन अशी जखमी कामगारांची नावं आहेत. यातल्या चौघांवर जालना इथल्या संजीवनी रुग्णालयात, तर अन्य दोघांवर औरंगाबाद शहरातल्या बेंबडे रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांनी दिली. चंदनझिरा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं सांगितलं.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या परिक्षा २२ नोव्हेंबर पासून सुरु होणार आहेत. परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.गणेश मंझा यांनी ही माहिती दिली. बी.ए., बी.एस्सी आणि बी.कॉम अभ्यासक्रमाची द्वितीय आणि तृतीय वर्षाची परीक्षा नोव्हेंबरपासून सुरु होईल, तर प्रथम वर्ष आणि अन्य व्यावसायिक पदवी, अभ्यासक्रम, पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा डिसेंबर मध्ये होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

देश डिजीटल झाला, मात्र राज्यातल्या साखर कारखान्याचे तराजू डिजीटल का होत नाही, असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री इथं आयोजित पहिल्या ऊस परिषदेत ते काल बोलत होत. गतवर्षी साखरेला बाजारात चांगला भाव मिळाला, इथेनॉलच्या माध्यमातून चांगलं उत्पादन झालं, मात्र शेतकऱ्यांना चांगला उस दर दिला नाही. गतवर्षीचा २०० तर यंदाच्या हंगामात तुटणाऱ्या उसाला ३५० रास्त आणि किफायतशीर दर- एफआरपीपेक्षा जास्त भाव मिळाला पाहिजे. यासाठी १५ नोंब्हेबर रोजी पुणे इथं साखर आयुक्त कार्यालयात महामोर्चा काढण्यात येणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं.

****

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरु असलेली भारत जोडो यात्रा येत्या सात नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यातल्या देगलुर मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काल नांदेड इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. ही यात्रा नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यातून मध्य प्रदेशात जाणार आहे.

****

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज झिम्बाब्वे आणि नेदरलँड तसंच भारत आणि बांगलादेश दरम्यान सामने होणार आहेत. दुपारी १ वाजेनंतर आकाशवाणीवरुन भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या सामन्याचं धावतं वर्णन आपण ऐकू शकाल.

दरम्यान, या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यांमध्ये इंग्लंडनं न्युझीलंडचा २० धावांनी, तर श्रीलंकेनं अफगाणिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना निर्धारीत २० षटकांत सहा बाद १७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्युझीलंडनं निर्धारीत षटकांत सहा बाद १५९ धावा केल्या.

अन्य एका सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना निर्धारीत २० षटकांत आठ गडी बाद १४४ धावा केल्या. उत्तरादाखल श्रीलंकेनं चार गड्यांच्या मोबदल्यात १४८ धावा केल्या.

****

हिंगोली जिल्ह्याभ्रष्टाचाराबाबत जनजागृतीसाठी 'दक्षता जनजागृती सप्ताह' राबवण्यात येत आहे. यामध्ये काल आखाडा बाळापूर, वारंगा आणि बोल्डा या ठिकाणच्या बाजारपेठेत, भाजीमंडईत, चौकाचौकामध्ये नागरिकांशी संवाद साधून जागृती करण्यात आली. हिंगोली शहरातही जनजागृती करण्यात आली. लाच देणं आणि घेणं हा गुन्हा असून यापासून सावध राहण्यासाठी नागरिकांनी दक्ष असावं, यासाठी शहरातल्या व्यापारपेठ, दुकानं, भाजीमंडई अशा ठिकाणी पत्रकं वाटण्यात आली.

****

अल्पवायीन मुलांचा भिक मागण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. तुळजापुर तीर्थक्षेत्र ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीक मागणाऱ्यांची वाढती संख्या पाहता यावर प्रशासकीय कार्यवाही व्हावी आणि बाल भिक्षेकरी यांना शैक्षणिक प्रवाहात आणलं जावं, यासाठी समाजसेवक संजयकुमार बोंदर अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. यावर प्रथमच मोठ्या कार्यवाहीची भूमिका जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. पोलीस प्रशासन, मंदिर प्रशासन, नगर परिषद, महिला आणि बालकल्याण विभाग, चाईल्ड लाईन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कृती दल स्थापन करणार असल्याची माहिती तहसीलदार सौदागर तांदळे यांनी यावेळी दिली.

****

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या जांब समर्थ इथल्या समर्थ रामदास स्वामी मंदीरातल्या चोरीला गेलेल्या तीन मूर्ती पोलिसांनी काल हस्तगत केल्या. काही मूर्ती यापूर्वीच ताब्यात घेण्यात आल्या होत्या. आतापर्यंत चोरी झालेल्या १३ मूर्ती जप्त करण्यात आल्या असून, अधिक तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीनं येत्या नऊ तारखेपासून शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या बसची विशेष तपासणी मोहिम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेतल्या तपासणीत दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. बसमध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचं आढळून  आल्यास त्यासाठी संबंधित स्कूल बस चालक, मालक आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येईल, असंही परिवहन अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

****

परभणी इथल्या जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक दोन च्या जलसंपदा विभागातल्या कार्यकारी अभियंता कार्यालयातला लिपिक प्रल्हाद गिरी याला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल पकडण्यात आलं. वडीलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावरील कालवा चौकीदार वर्ग चार पदाच्या नोकरीसाठीचा प्रस्ताव पाठवण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

अवकाळी पावसामुळे चाळीतला साठवणीतला कांदा खराब झाल्यानं कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या कांदा बटाटा घाऊक बाजारात, कांद्याचा दर प्रति किलो २८ ते ३२ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. परिणामी किरकोळ बाजारात हा दर, ५० रुपये प्रति किलो असा झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. येत्या महिनाभरात नवीन कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर दरात घसरण होण्याची शक्यता बाजार समितीचे संचालक अशोक वाळुंज यांनी व्यक्त केली आहे.

****

No comments:

Post a Comment