Wednesday, 2 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.11.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०२ नोव्हेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून इन्व्हेस्ट कर्नाटक २०२२ या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. संभाव्य गुंतवणूकदारांना आकर्षित करणं आणि पुढील दशकातील विकासाचा आराखडा तयार करणं, हे या परिषदेचं उद्दीष्ट आहे.

****

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ - सीबीडीटीनं जनतेचं मत जाणून घेण्यासाठी एकसमान आयकर परताव्याचा प्रपत्र मसुदा जारी केला आहे. प्रस्तावित मसुदा आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार तयार केला असून, आयकर परतावा भरण्याच्या प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचं यामागचं उद्दीष्ट असल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

जम्मू-काश्मीरमध्ये काल संध्याकाळी सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले. पुलवामा जिल्ह्यातल्या अवंतीपोरा मध्ये खांडीपोरा गावात मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर मुख्तार अहमद याचा समावेश असल्याचं अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी सांगितलं. चकमकीच्या ठिकाणाहून एके-47 आणि एके-56 रायफल जप्त करण्यात आल्या. श्रीनगर पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना अटक केली असून त्यांच्याकडून हातबॉम्ब आणि स्फोटकं जप्त करण्यात आली.

****

राज्यातली पोलीस ठाणी आणि पोलीस निवासस्थानांच्या कामांना प्राधान्य असून, ती वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाला दिले आहेत. मुंबईत काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दोन जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-२०२१ चा निकाल जाहीर झाला आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना हा निकाल पाहता येईल.

****

नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत "वाचन कट्टा" हा वाचकमंच सुरू करण्यात आला आहे. चला वाचू या, स्वतःला घडवू या, असं या वाचन कट्टा उपक्रमाचं ब्रीदवाक्य असून, यात दर महिन्यातल्या चौथ्या शुक्रवारी 'मी वाचलेलं साहित्य' या विषयावर संवाद होणार आहे.

//*********//

No comments:

Post a Comment