Thursday, 3 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 03.11.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  03 November  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ नोव्हेंबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      महाराष्ट्र शासन राज्यातल्या बेरोजगारीचा प्रश्र्न प्राधान्यानं सोडवत असल्याचे पंतप्रधानांचे प्रशंसोद्गार.

·      राज्यात पात्र उमेदवारांना विभागनिहाय नियुक्तीपत्र देण्यात येणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

·      कार्तिकी यात्रेसाठी दोन लाखांवर भाविक पंढरपूरमध्ये दाखल.

आणि

·      औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आमदार सतिश चव्हाण यांची मागणी.

****

महाराष्ट्र शासन राज्यातला बेरोजगारीचा प्रश्न प्राधान्यानं सोडवत असून, अनेक क्षेत्रात रोजगाराच्या संधी युवकांसाठी उपलब्ध करुन देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दलित, अनुसूचित जाती जमाती आदिवासी, सामान्य वर्ग तसंच महिला अश्या सर्वांसाठी स्वयंरोजगार आणि रोजगार महाराष्ट्रात उपलब्ध होत असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं राज्यात २ लाख कोटी रुपयांचे २२५ प्रकल्प मंजूर केले असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं.

****

राज्यामध्ये पात्र उमेदवारांना विभागनिहाय नियुक्तीपत्रं देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्र वितरित करताना सांगितलं. ते म्हणाले –

तरुणांना रोजगार द्यायचं आणि म्हणून हा रोजगार मेळावा आपण सुरू केला आहे. एक पहिला टप्पा आहे. आणि या पहिल्या टप्प्यात आपण जवळपास दोन हजारांपेक्षा जास्तीच्या नोकऱ्या नियुक्त्या आपण या ठिकाणी देत आहोत. सहाशे नियुक्त्या इथं होतील. बाकी विभागवाईज आपल्या त्याठिकाणी होतील. आणि जसं पोलिस खात्यामधील देखील अठरा वीस हजार नोकऱ्या. ग्रामविकासमध्ये जवळपास दहा हजारांच्यापेक्षा जास्तीच्या नोकऱ्या आपण सगळ्याचं विभागातल्या रिक्त जागा आपण भरतोय एमपीएससीच्या माध्यमातून देखील आणि इतर ज्याकाही महत्वाच्या दोन एजन्सी आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्या विभागवाईज आपण सगळ्या भरतीला प्राधान्य दिलेलं आहे.

लवकरच १८५०० उमेदवारांची पोलीस विभागात तर १० हजार ५०० उमेदवारांची ग्रामविकास विभागात भरती करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ३१६ उमेदवारांना नियुक्ती पत्रांचं वाटप करण्यात आलं. नाशिक विभागात आज ४५६ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते या नियुक्ती पत्रांचं वाटप करण्यात आलं.

****

महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६ - अंधेरी पूर्व’ या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघातल्या सर्व २५६ मतदान केंद्रांवर आज मतदान झालं. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत २८ पूर्णांक ७७ टक्के मतदान झालं असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारानं यापूर्वीच निवडणुकीतून माघार घेतली आहे.

****

मुंबई उच्च न्यायालयाचं नाव बदलून ते महाराष्ट्र उच्च न्यायालय असं करण्याची मागणी करण्याची याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. हा निर्णय संसदेनं घ्यायचा असून संसदीय कामकाजात आपण हस्तक्षेप करू शकत नाही असं न्यायमूर्ती अनिरूद्ध बोस आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या पीठानं याचिका फेटाळतांना स्पष्ट केलं.

****

गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. राज्यात दोन टप्प्यात निवडणूक घेतली जाणार असून आगामी १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होईल अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी दिली.

निवडणूक वेळापत्रकानुसार, पहिल्या टप्प्यात गुजरातच्या पूर्व आणि दक्षिण भागातील ८९ विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात मध्य गुजरातमधील विधानसभेच्या ९३ जागांसाठी मतदान होणार आहे.

****

उद्याच्या कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर इथं दोन लाखांवर भाविक दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची महापूजा होणार आहे. सध्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग असून दर्शनासाठी १० ते १२ तासांचा अवधी लागत आहे. कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून शेकडोंच्या संख्येनं दिंड्या पंढरपुरात दाखल होत आहेत. दरम्यान, पंढरपूर इथे होणाऱ्या कार्तिकी यात्रेत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन येत्या आठ तारखेला पंढरपूर आणि मिरज दरम्यान मध्य रेल्वे विभाग विशेष रेल्वेगाड्या चालवणार आहे.

****

महिला पत्रकारानं कपाळाला टिकली लावली नाही म्हणून प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यामागील भूमिकेचा खुलासा सादर करण्याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संभाजी भिडे यांना पत्र लिहिलं आहे. स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तृत्वानं सिद्ध होत असतो. आपलं वक्तव्य स्त्री सन्मानता आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहचवणारं आहे. आपल्या वक्तव्याबाबत समजातल्या सर्व स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं त्याची दखल घेतली आहे. या संदर्भातल्या आपल्या भूमिकेचा खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायद्यानुसार तात्काळ सादर करावा, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी या लेखी पत्रात म्हटलं आहे.

****

राज्य सरकारला साथ देण्याच्या हेतूनं भारतीय जनता पक्षानं युवतींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. हा उपक्रम गावोगाव पोहोचावा, अशी अपेक्षा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याच्या उद्‌घाटनावेळी व्यक्त केली. महिलांना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण मिळण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. पक्ष संघटना त्यासाठी पाठबळ देईल, असं ते म्हणाले. स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाच्या मोहिमेसोबत नवमतदारांच्या नोंदणीची मोहीमसुद्धा सुरू केली पाहिजे, असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या खरीप पिकांचं परतीच्या पावसात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्यानं जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करुन ही मागणी केली आहे. मागील तीन-चार वर्षांपासून मराठवाडा सातत्यानं अतिवृष्टीचा सामना करत आहे. यंदा सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं विभागातली १९ लाख हेक्टरवरची पिकं बाधित झाली असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सहा लाख ७१ हजार ४२६ हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी झाली होती. मात्र सततच्या पावसामुळं जिल्ह्यात चार लाख ९३ हजार ७३२ हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

****

राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते नंदुरबार शहरातल्या नंदूरबार उपवनसंरक्षक यांच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा आज झाला. जिल्हा निर्मितीनंतर तब्बल २४ वर्षानंतर उपवनसंरक्षक यांचं कार्यालय नंदूरबारला आलं आहे. वनविभागाशी निगडीत या भागातली कामं तप्तरतेनं होतील असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला. वनविभागाच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन मंत्री गावित यांनी यावेळी दिलं. जिल्ह्यातल्या वनपर्यटन क्षेत्रांचा विकास करून स्थानिक आणि पर्यटकांना आकर्षित करण्याच्या तसंच वनहक्क कायद्या अंतर्गत सामुहिक वनहक्क धारक गावांमध्ये जंगल संवर्धन आणि जतनाचं कामही जोमानं करण्याच्या सुचना गावित यांनी यावेळी केल्या.

****

विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा अंमलात आणला जाणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. याविषयी अभ्यास सुरू असल्याचं त्यांनी सावंतवाडी इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं. राज्यात धर्मांतर करणाऱ्या कृतींना वेळीच आळा घालण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही राणे यांनी सांगितलं.

****

दिवाळीनंतर सिंधुदुर्गवासीयांना आता गावोगावच्या वार्षिक जत्रोत्सवांचे वेध लागले आहेत. उद्यापासून जिल्ह्यात गावोगावच्या वार्षिक जत्रोत्सवांना प्रारंभ होत आहे. कुडाळ तालुक्यात आवळेगावच्या श्री लक्ष्मी नारायणाच्या वार्षिक जत्रोत्सवानं जिल्ह्यातल्या जत्रोत्सवाला दरवर्षी सुरुवात होते. या जत्रोत्सवानंतर जिल्हाभरातील गावागावांतील मंदिरं वार्षिक जत्रोत्सवान गजबजतील, अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. 

****

पुण्यातल्या वडगाव शेरी भागात असलेल्या भंगारच्या गोदामाला आज दुपारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि तासभरात या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. वडगाव शेरी इथल्या सोपान नगरमध्ये पाच ते सहा हजार चौरसफूट मध्ये असलेल्या प्लास्टिकच्या भंगार मालाच्या गोदामाला आग लागल्याची माहिती १२ वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला मिळाली. गोदामात असलेल्या १० ते १२ सिलेंडरचा स्फोट ही झाला त्यामुळे आग भडकली. आग लागण्याचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही.

****

No comments:

Post a Comment