Thursday, 3 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.11.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 November 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ नोव्हेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      ऑक्टोबरमध्ये पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

·      इथेनॉलच्या वाढीव दरांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीची मंजुरी

·      नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांसाठी केंद्र सरकारचं ५१ हजार ८७५ कोटी रुपयांचं अनुदान

·      अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

·      पैठणच्या जायकवाडी धरणावर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांचे संकेत

·      खागी दूध उद्योग संघांच्या दुखरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची घट

आणि

·      टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत रोमहर्षक सामन्यात भारताचा बांगलादेशवर पाच धावांनी विजय

राज्यातल्या शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी आत्तापर्यंत चार हजार ७०० कोटी रुपयांची वाढीव दरानं मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबर २०२२ मध्ये पावसानं झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. ऑक्टोबरमध्ये पावसामुळे राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुमारे २५ लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालं आहे. पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला दिले आहेत. जून-जुलै पासून सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या ४० लाख १५ हजार ८४७ शेतकऱ्यांना सुमारे चार हजार ७०० कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. ही मदत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या निकषापेक्षा दुपटीने जास्त आणि दोन ऐवजी तीन हेक्टर अशी वाढीव आहे. 

****

राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशनच्या चौथ्या टप्प्यास देखील काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधल्या सर्व ग्रामीण, आदिवासी, शहरी प्रकल्पांतर्गत शून्य ते सहा वर्षे वयोगटातल्या बालकांमधलं कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. त्यानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय संनियंत्रण समिती गठित करण्यात येणार आहे.

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा या योजनेत घ्यावयाची कामं, अंमलबजावणी आणि इतर निकष सुधारित करण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

****

इथेनॉलच्या वाढीव दरांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मंजुरी दिली आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. क श्रेणीतल्या मळीपासून तयार केलेल्या इथेनॉलचा दर प्रतीलिटर ४६ रुपये ६६ पैशांवरून, ४९ रुपये ४१ पैसे केला आहे. तर अ श्रेणीतल्या मळीपासून तयार केलेल्या इथेनॉलचा दर, ५९ रुपये ८ पैशांवरून ६० रुपये ७३ पैसे केला आहे. येत्या एक डिसेंबरपासून ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंतच्या आगामी साखर हंगामासाठी ही मंजुरी दिली असल्याचं पुरी यांनी सांगितलं.

****

यंदाच्या रब्बी हंगामाकरता नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांसाठी अनुदानाच्या दरांना केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. पुढच्यावर्षी ३१ मार्चपर्यंत हे नवे दर लागू राहतील. ५१ हजार ८७५ कोटी रुपयांचं खत अनुदानही मंत्रिमंडळानं मंजूर केलं. जलसंपदा विकास आणि व्यवस्थापनच्या क्षेत्रात सहकार्याबाबत डेन्मार्कशी झालेल्या सामंजस्य करारालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

****

स्वतःचा स्थायी पत्ता, ओळखपत्र, विविध कागदपत्रं नसल्यामुळे मतदानापासून वंचित राहीलेल्या देशातल्या भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या नागरिकांना लवकरच मतदानाचा घटनात्मक अधिकार मिळणार आहे. राष्टीय भटके विमुक्त जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकुजी इदाते यांनी काल नागपुरात ही माहिती दिली. या समाजातले नागरिक जिथे आहेत, तिथेच मतदानाचा हक्क बजावू शकतील, तसंच सरकारच्या विविध योजनांचा लाभही घेऊ शकतील, असं इदाते यांनी सांगितलं.

****

राज्य सरकार येत्या दहा दिवसांत श्वेतपत्रिका काढणार असून, मागच्या सरकारमध्ये कोणी काय उद्योग केले, ते सर्व स्पष्ट होईल, असा सूचक इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दिला आहे. ते काल गोंदिया इथं बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच याबाबत माहिती दिली. त्यामुळे कोणाच्या सरकार मध्ये कोणते उद्योग गेलेत, हे लवकरच स्पष्ट होणार असल्याचं विखे पाटील म्हणाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री आदित्य ठाकरे, तसंच विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नुकत्याच केलेल्या काही विधानांवरही विखे पाटील यांनी कडाडून टीका केली.

****

शिक्षकांच्या वाढीव टप्पा अनुदानाचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे. वेतन अनुदानाचं सूत्र पूर्वीप्रमाणे लागू करावं, या मागणीसाठी शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून आंदोलन करत असलेल्या संबंधित शिक्षक प्रतिनिधींसोबत, केसरकर यांनी काल मंत्रालयात बैठक घेतली. हा प्रलंबित प्रश्न सोडवण्याबाबत शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल आणि अनुदानाच्या विविध टप्प्यांवरच्या पात्र शिक्षकांची संख्या, त्यासाठी येणारा खर्च याबाबत सविस्तर माहिती घेऊन, मुख्यमंत्री येत्या १५ तारखेला याबाबतचा निर्णय जाहीर करतील, असं केसरकर यांनी सांगितलं. याप्रश्नी संबंधित शिक्षकांनी सुरू केलेलं आंदोलन थांबवावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. रमेश लटके यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवरून महाविकास आघाडीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांच्यासह सात अपक्ष उमेदवार ही निवडणूक लढवत आहेत. भारतीय जनता पक्षानं, लटके यांच्या विरोधातला आपला उमेदवार मागे घेतना आहे. अंधेरीसह बिहारमध्ये दोन तर हरियाणा, तेलंगणा, उत्तरप्रदेश आणि ओडिशा राज्यात प्रत्येकी एक विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी देखील आज मतदान होत असून, मतमोजणी येत्या रविवारी होणार आहे.

****

दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशनच्या स्वयंसहायता गटांचं परस्पर सामर्थ्य वाढवण्यासाठी, आणि त्याचा लाभ घेण्यासाठी, ग्रामीण विकास मंत्रालय आणि पतंजली यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. महिला बचत गटांनी बनवलेल्या निवडक उत्पादनांची  या करारांतर्गत पतंजली स्टोअर्सद्वारे विक्री केली जाईल. ग्रामीण स्वयंसहायता गटातल्या महिलांना वार्षिक किमान एक लाख रुपयांचं उत्पन्न मिळण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं ग्रामीण विकास मंत्री गिरिराज सिंह यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणावर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे संकेत, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी दिले आहेत. ते एका खासगी वृत्तसंस्थेशी बोलत होते. या प्रकल्पासंदर्भात आपण पूर्वी दिलेल्या प्रस्तावावर गेल्या सरकारने गांभीर्याने विचार केला नाही. मात्र आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत प्रस्ताव दिला असून, त्याबाबत अभ्यास सुरू आहे. हा प्रकल्प मराठवाड्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास कराड यांनी व्यक्त केला. ते म्हणाले...

प्रकल्प होईल. काही अडचण येणार नाहीये. कारण केंद्र शासन पर्टीक्युलरली एनटीपीसी हा प्रकल्प करण्यासाठी उत्सुक आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही भेटलो आणि त्यांनी ताबडतोब सेक्रेटरीला फोन केला. आणि आम्हाला पत्र मिळालं की तुम्ही यावरती स्टडी करा. तर स्टडी करतोय आम्ही. त्यातून प्रकल्प झाला तर मराठवाड्याला खूप फायदा होईल.

दरम्यान, माजी मंत्री जयंत पाटील यांनी कराड यांचे या सौर ऊर्जा प्रकल्पाबाबतचे आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकल्पाबाबत केंद्राच्या राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळ - एनसीपीटीकडून प्रस्ताव यायला हवा होता, परंतू कराड यांनी राज्य सरकारला पत्र दिलं, तरी आम्ही त्यांच्या पत्राची दखल घेत समिती स्थापन केली होती, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या खासगी दूध उद्योग संघांनी दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर एक रुपयानं कमी केला आहे. जागतिक बाजारपेठेतल्या दूध भुकटीच्या दरामुळे ही कपात करण्यात आली असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र राज्यातल्या संघटीत दूध उद्योगांच्या नफेखोरीमुळे दर कपात झाली असल्याचं तज्ज्ञांचं मत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्य शासनानं दूध भुकटीला वापरण्यात येणाऱ्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला, मात्र एक वर्षानंतर अनुदान मिळत नसल्याचं कारण देत खासगी संस्थांनी या योजनेतून माघार घेतली होती.

****

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत नऊ नोव्हेंबर पर्यंत वाढ झाली आहे. त्यांनी दाखल केलल्या जामीन अर्जा प्रकरणी काल न्यायालयात सुनावणी होणार होती. आता ही सुनावणी ९ तारखेला होणार आहे. गोरेगाव इथल्या पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालय - ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा विकास करत असताना तिरुपती बालाजी, शिर्डी, शेगाव आदींच्या देवस्थानचा अभ्यास दौरा करुनच येत्या तीन महिन्यात तुळजापूरचा विकास आराखडा सादर करण्यात येईल, असं संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी सांगितलं आहे. संस्थानच्या विकास आराखड्यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या विकास आराखड्यात भाविकांसाठी पुरेशा सोयी - सुविधा करण्यात येणार असून, यात आरोग्य विषयक सोयी, शौचालयं, निवास व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, ठिकठिकाणी पथदर्शक मार्गदर्शिका, दर्शनासाठी रांगेत होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण यासारख्या सोयी अत्याधुनिक पद्धतीनं करण्यात येणार असल्याचं ओम्बासे यांनी सांगितलं.

****

राज्यस्तरीय महाॲग्रो कृषी प्रदर्शन येत्या १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान, औरंगाबाद इथल्या पैठण महामार्गावर असलेल्या कृषी विज्ञान केंद्र परिसरात भरवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञान, नवे वाण आणि नव्या योजनांची माहिती व्हावी यासाठी हे कृषी प्रदर्शन भरवण्यात येत असल्याची माहिती, महाॲग्रो कृषी प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक विधिज्ञ वसंत देशमुख यांनी दिली. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रदर्शनात विविध विषयांवरचे चर्चासत्र, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री, शेती अवजारे आणि यंत्रे, बियाणे, खत किटकनाशके आदीचा अंतर्भाव असेल, असं त्यांनी सांगितलं.

****

औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी पदवीधर प्रवर्गातून कालपर्यंत एकूण ४५ अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात पदवीधर प्रवर्गातून निवडून येणाऱ्या १० जागांसाठी २६ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

****

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारतानं बांगलादेशवर पाच धावांनी विजय मिळवला. भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकांत १८४ धावा केल्या. के एल राहुलच्या ५०, सूर्यकुमार यादवच्या ३०, विराट कोहलीच्या नाबाद ६४ तर रविचंद्रन अश्विनच्या नाबाद १३ धावा वगळता, कर्णधार रोहित शर्मासह अन्य भारतीय फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेल्या बांगलादेशच्या फलंदाजांनी सात षटकांत बिनबाद ६६ धावा केलेल्या असताना, सामना पावसामुळे थांबवावा लागला. पाऊस थांबल्यावर १६ षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय झाला. डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेश संघाला १६ षटकांत १५१ धावांचं लक्ष्य देण्यात आलं.

बांगलादेशच्या फलंदाजांनी उत्कृष्ट खेळ केला, मात्र ठराविक अंतरानं फलंदाज बाद होत गेले, त्यामुळे बांगलादेशचा संघ निर्धारित १६ षटकांत १४५ धावाच करू शकला. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्यानं प्रत्येकी दोन, तर मोहम्मद शमीनं एक बळी घेतला. विराट कोहली सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

काल झालेल्या अन्य एका सामन्यात नेदरलंडने झिम्बॉब्वेचा पाच गडी राखून पराभव केला.

या स्पर्धेत आज पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिका संघासोबत सामना होणार असून, भारताचा पुढचा सामना रविवारी झिम्बॉब्वे सोबत होणार आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त केला. अमृत नगर इथल्या दिलदार अबरार पठाण यांच्या घराची झडती घेऊन ८४ हजार ६०५ रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारीचा अवैध साठा जप्त करण्यात आला. पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

****

निवृत्ती वेतनधारक तसंच कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाण दाखला जमा करण्याचं आवाहन, औरंगाबादच्या अप्पर कोषागार अधिकाऱ्यांनी केलं आहे. प्रत्यक्ष बँक शाखेत हजर राहून किंवा बायोमॅट्रीक पद्धतीने जीवनप्रमाण दाखला संबंधित संकेतस्थळावर सादर करावा, हा दाखला सादर न केल्यास डिसेंबर महिन्यापासून निवृत्तीवेतन मिळणार नाही, अशी सूचना कोषागार कार्यालयाकडून करण्यात आली आहे.

****

केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची लातूर शहरात पथविक्रेत्यासाठी अंमलबजावणी करण्यात येत आहे. एक वर्षाच्या परतफेड मुदतीसह दहा हजार रुपयांचं खेळतं भांडवली कर्ज घेण्यास आणि त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास हे पथविक्रेते पात्र असतील. पात्र पथविक्रेत्यांनी १५ नोव्हेंबरपूर्वी अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन महानगरपालीका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केलं आहे. आतापर्यंत लातूर शहरातल्या तीन हजार २१३ लाभार्थींना प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे तीन कोटी २१ लाख रुपये कर्ज मंजूर झालं आहे.

****

उद्या कार्तिकी एकादशीच्या यात्रेनिमित्त पंढरपूर इथं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले. वाहनचालकांनी याची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

कार्तिकी यात्रेसाठी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन एक ते आठ नोव्हेंबर दरम्यान लातूर - पंढरपूर, पंढरपूर - मिरज आणि सोलापूर - पंढरपूर दरम्यान विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि विभागाच्या संकेतस्थळावर या विशेष गाड्यांच्या आरक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

****

शेतकरी संघटनेची पाळेमुळे रुजवणारे ज्येष्ठ शेतकरी नेते माधवराव मोरे यांचं काल नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातल्या पिंपळगाव बसवंत इथं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. माधवराव मोरे यांनी १९८०-८१ च्या काळात शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशी यांच्या सोबतीने संघटनेची स्थापना करून शेतकरी संघटना रुजवली. या संघटनेच्या माध्यमातून शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा, कृषिमूल्य आयोग बरखास्त करावा तसंकांद्याला मंदी तर उसाला बंदीअशा मागण्यांसाठी राज्यभर भर आंदोलन उभारलं होतं.

****

No comments:

Post a Comment