▼

Tuesday, 22 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.11.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ नोव्हेंबर २०२२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रोजगार मेळाव्यात देशभरातल्या ७१ हजार कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली. आभासी माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान सर्व कर्मचाऱ्यांना संबोधित करत आहेत. देशभरात ४५ ठिकाणी ही नियुक्तीपत्रं कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रदान करण्यात येत आहेत. या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांच्या हस्ते कर्मयोगी प्रारंभ मॉड्यूललाही सुरवात होत आहे. नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा प्रशिक्षण अभ्यासक्रम आहे.

****

गोव्यात आयोजित भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरमाचं उद्धाटन काल माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते झालं. पृथ्वी कोनानूर दिग्दर्शित हादिनेलेंटू या कन्नड चित्रपटानं भारतीय पॅनोरमाची सुरुवात झाली तर, कथाबाह्य चित्रपटांच्या श्रेणीत दिव्या कावसजी दिग्दर्शित शो मस्ट गो ऑन हा चित्रपट सर्वप्रथम दाखवण्यात आला. दक्षिण आशियातली चित्रपटांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या फिल्म बाजाराचं उद्धाटनही ठाकूर यांनी केलं.

****

राष्ट्रीय तपास यंत्रणेनं कुख्यात दहशतवादी कुलविंदरजीत सिंग उर्फ खानपुरिया याला नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ इथून अटक केली. बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि खलिस्तान लिबरेशन फोर्ससह अन्य दहशतवादी संघटनांशी तो संबंधित आहे. २०१९ पासून फरार असलेला हा आरोपी पंजाबमध्ये हत्या घडवून आणण्याच्या कटासह अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये सामील होता.

****

राज्यातल्या तीन विद्यालयांना २०२१-२२ या वर्षासाठीच्या स्वच्छ विद्यालय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने नवी दिल्लीत नुकतेच हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. सातारा जिल्ह्यात जावळी तालुक्यातल्या ओझरे इथली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाटण तालुक्यातली पाटण व्हॅली इंग्ल‍िश मीडियम स्कूल आणि रायगड जिल्ह्यात खारघर इथली रामशेठ ठाकूर पब्ल‍िक स्कूल या विद्यालयांना यावेळी गौरवण्यात आलं. पाणी, शौचालय, हात धुण्यासाठी साबण, संचालन आणि देखभाल, आणि कोविड-19 च्या काळातली तयारी अशा विविध सहा मानकांवर हे मूल्यांकन करण्यात आलं.

//**********//

 

No comments:

Post a Comment