▼

Wednesday, 23 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.11.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ नोव्हेंबर २०२२ सकाळी ११.०० वाजता

****

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू आणि तलासरी तालुक्यात आज पहाटे तीन पूर्णांक सहा रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. हा मध्यम स्वरूपाचा भूकंपाचा धक्का होता. यामुळे अद्याप कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही.

****

प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी काल आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या कर्मचाऱ्यांसाठी नवी दिल्लीतल्या आकाशवाणी इथं आयुर्वेद आरोग्य शिबिराचं उद्घाटन केलं. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाचे डॉक्टर मोफत सल्ला देऊन आरोग्य तपासणी करत आहेत.

****

राष्ट्रपती भवन येत्या एक डिसेंबरपासून आठवड्यातून पाच दिवस जनतेसाठी खुलं राहणार आहे. बुधवार ते रविवार सकाळी दहा ते चार या वेळेत लोकांना राष्ट्रपती भवनाला भेट देता येणार आहे. तसंच, मंगळवार ते रविवार या सहा दिवसात राष्ट्रपती भवन संग्रहालय संकुलाला देखील भेट देता येईल. याशिवाय, दर शनिवारी, राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सकाळी आठ ते नऊ या वेळेत चेंज ऑफ गार्ड  सोहळा पाहता येईल.

****

पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांच्या निर्देशानुसार राज्यातल्या कुक्कुटपालन व्यवसायासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. राज्यातले खासगी पद्धतीनं व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी आणि कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्या, यांना येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करणं, हे या समितीचं काम असेल.

****

पुण्यातल्या नवले पुलावर रविवारी रात्री झालेल्या अपघातात चोवीस वाहनांना धडकणाऱ्या ट्रकच्या फरार चालकाला पोलिसांनी काल चाकण इथून अटक केली. मणीराम यादव असं या चालकाचं नाव असून, तो अपघातानंतर पळून गेला होता. मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते.

****

गुळाला किमान तीन हजार ७०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी आक्रमक झाले असून, या मागणीखातर त्यांनी काल कोल्हापूर मार्केट यार्डमधले गुळाचे सौदे बंद पाडले. गुळाच्या व्यापाऱ्यांनी जाणीवपूर्वक गुळाचा दर पाडल्याचा या शेतकऱ्यांचा आरोप आहे. जोपर्यंत गुळाला अपेक्षित दर मिळत नाही’ तोपर्यंत गुळाचे  सौदे होऊ देणार नाही, असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.

****

No comments:

Post a Comment